गेल्या अनेक दशकांपासून युएई हे लाखो भारतीयांचे घर बनले आहे. अनेक जण त्यांचे करिअर घडवण्यासाठी, आर्थिक स्थिरतेच्या शोधात किंवा जग अनुभवण्याच्या उद्देशाने येथे स्थायिक झाले आहेत. मात्र अशा बऱ्याच जणांना यापुढे परदेशात राहणे हे सध्या शास्वत वाटत नाहीये. असाच काहीसा प्रकार लीबा सुबिन या महिलेबरोबर घडला. ही महिला नुकतेच युएईमधून भारतात परत स्थलांतरित झाली आहे. लीबा यांनी आपल्या कुटुंबाला घेऊन भारतात, केरळमध्ये परतण्याचा निर्णय का घेतला याची १० कारणे इन्स्टाग्रामवर सांगितली आहेत. “हा निर्णय घाईगडबडीत घेतलेला नव्हता,” असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की “हे सर्व अचूक वेळे, जुळून आलेली स्थिती आणि मानसिक शांततेबाबत होते.”

एक विराम आणि सगळ बदलून गेलं

पहिला विचार हा अनपेक्षितपणे आला. त्यांच्या व्हिसाचे नूतनिकरण आणि घर भाड्याचे नूतनिकरण करणे दोन्ही एकाच वेळी बाकी होते. या स्थितीने त्यांच्या कुटुंबाला काही वेळ थांबून त्यांच्या आयुष्याचे अधिक प्रामाणिकपणे मूल्यांकन करण्यास भाग पाडले. “त्या थोडा वेळ थांबल्याने आम्हाला एक कुटुंब म्हणून आणि विशेषतः पार्टनर्स म्हणून सर्व गोष्टींकडे शांतपणे, व्यावहारिकपणे आणि प्रामाणिकपणे पाहण्यास भाग पाडले,” असे लीबा यांनी सांगितले. वाढत चाललेला राहणीमानाचा खर्च ही आधीच काळजीचा विषय बनला होता, पण त्या क्षणाने त्यांना त्यांच्या लाँग-टर्म प्रायोरिटीजचा नव्याने विचार करण्यास भाग पाडले.

मुलांचे शिक्षण

या निर्णयात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका राहिली. या कुटुंबाला त्यांच्या केरळमधील घराच्या जवळच एक इंटरनॅशनल स्तराची शाळा सापडली, ही शाळा फक्त ३ किमी अंतरावर होती. वर्ग सकाळी साडेआठला सुरू होत होते आणि तेथे पोहोचायला फक्त १० मिनिटांचा वेळ लागत होता. याउलट युएईमध्ये त्यांच्या मुलाला रोज सकाळी ६ वाजता घर सोडावे लागत असे आणि जवळजवळ दीड तास प्रवास करावा लागत असे.

घरी परतण्याचं सुख

मायदेशी परत येणाऱ्या बहुतांश लोकांप्रमाणे त्यांना, भारतात आल्यावर राहाणार कुठे हा विचार करायचा नव्हता. त्यांनी २०२१ मध्येच केरळमध्ये त्यांच्या स्वतःच्या व्हिलाचे बांधकाम पूर्ण करून घेतले होते. त्यामुळे भाडे देण्याची कटकट त्यांना नव्हती आणि त्यांना स्वतःचे स्वतंत्र घर मिळणार होते.

कर्ज आणि ईएमआयपासून सुटका

भारतात परत येण्याने झालेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांना मिळालेला आर्थिक दिलासा. केरळमध्ये स्थलांतर केल्याने त्यांना त्यांचे उरलेले गृहकर्ज बंद करता आले. “आज, आम्ही कर्जमुक्त आणि ईएमआयमुक्त स्थितीत आहोत,” असे लीबा यांनी सांगितले. “त्या मानसिक स्वातंत्र्याचे महत्त्व आम्हाला त्या वेळेला जाणवले त्यापेक्षाही जास्त होते,” असेही त्या म्हणाल्या.

वृद्ध आई-वडिलांसाठी उपलब्ध असणे

लीबा आणि त्यांच्या जोडीदारासाठी कुटुंब हा विषय खूप प्रॅक्टिकल होता. कारण त्यांचे आई-वडील सत्तर आणि ऐंशी वर्षाचे आहेत. “त्यांच्या शारीरिकदृष्ट्या जवळ असणे हे जबाबदारीपेक्षा एक प्रीव्हिलेज वाटते,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे परत येण्याच्या त्यांच्या निर्णयात कुटुंबाचाही वाटा राहिला.

मुलांच्या भविष्याचा विचार

या कुटुंबाने त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचारही केला. लीबा यांनी सांगितले की अनेक एनआरआय कुटुंब १०वी किंवा १२ झाल्यानंतर त्यांच्या मुलांना परत भारतात पाठवतात. “माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येकजण उच्च शिक्षणासाठी परदेशातच जात नाही,” असे लीबा म्हणाल्या. जर आंतरराष्ट्रीय शिक्षण आवश्यक झाले, तर त्यासाठी ते तयार आहेत. परंतु लवकर परतल्यामुळे त्यांच्या मुलांना नंतर अचानक धक्का न बसता भारतीय संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक जीवनाशी हळूहळू जुळवून घेता येईल.

भारतातून काम करणं शक्य होतं…

व्यावसायिकदृष्ट्या, कामातील लवचिकतेमुळे त्यांना भारतात स्थलांतरित होणे शक्य झाले. लीबा आठ वर्षांपासून एका ऑनलाइन व्यवसायाच्या सह-संस्थापक आहेत, ज्यामुळे त्यांचे काम एखाद्या विशिष्ट जागेशी निगडीत नाही. त्या कुठूनही काम करू शकतात, भारतात राहणीमानाचा जास्तीचा खर्च न करता त्यांना त्याच सर्व संधी उपलब्ध होत होत्या. भारतातूनही त्यांचे काम तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होऊ शकते असे त्यांनी सांगितले.

पैसा खर्च करण्याच्या पद्धतीत बदल

यापूर्वी त्यांच्या बचतीचा एक मोठा भाग पालकांना भेटण्यासाठी केलेल्या प्रवासावर खर्च होत असे. आता, तो खर्च होत नाही. कुटुंब आता तो पैसा नवीन ठिकाणे पाहणे, कमी कालावधीसाठी फिरायला जाणे किंवा भारतात एकत्र प्रवास करण्यासाठी वापरू शकते.

वेळ, स्पष्टता आणि काहीतरी नवं उभारण्याची संधी

आर्थिक आणि लॉजिस्टिक यासंबंधी गोष्टींच्या पलीकडे, घरी परतल्याने अधिक मौल्यवान काहीतरी त्यांना गवसले, ते म्हणजे वेळ. एकत्र राहण्यासाठी, शांतपणे आणि स्पष्ट विचार करण्यासाठी, आणि कायम दबावाखाली न राहाता काहीतरी नवीन उभारण्याचा वेळ त्यांना मिळाला. “या निर्णयामुळे आम्हाला आमच्या गतीने काहीतरी नवीन तयार करण्यासाठी स्पेस आणि मानसिक स्पष्टता मिळाली आहे,” असे लीबा यांनी सांगितले

आधी नियोजन मग कृती

लीबा यांनी स्पष्ट केले की हा बदल घाईने करण्यात आलेला नाही. हा निर्णय घेण्याच्या आधी कुटुंबाने सहा ते सात महिन्यांचा एमर्जन्सी फंड तयार करून ठेवला होता. हेल्थ इन्शुरन्स काढला होता, रिटायरमेंट प्लॅनिंगदेखील सुरू केले होते. “मी शेअर करत असलेला हा काही फॉर्म्युला नाही, हे आमचं वास्तव आहे,” असे त्या म्हणाल्या.”कधीकधी, निर्णय हा जीवन कुठे चांगले दिसते याबद्दलचा नसतो, तर ते प्रत्यक्षात कोठे शाश्वत वाटते याबद्दलचा असतो,” असे त्यांनी सांगितले.