एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या वडिलांसोबतच लग्न केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. टिकटॉकवरील व्हायएस अमरी नावाचं हॅण्डल असणाऱ्या तरुणीने प्रियकराच्या वडिलांसोबतच लग्न करण्याच्या आपल्या निर्णयामागील कारण सांगितलं आहे.

या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या प्रियकराची आई वारल्यामुळे तो फार दु:खात होता. त्यामुळेच या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या प्रियकराला मदत करण्यासाठी आपण काहीही करायला तयार होतो असं या महिलेने म्हटलं आहे. आईच्या विरहाने निराश झालेल्या प्रियकराला पुन्हा आईचं प्रेम मिळावं म्हणून या तरुणीने चक्क आपल्या प्रियकराच्या वडिलांशी लग्न केलं.

“माझ्या प्रियकराची आई वारली. त्याने यामुळे दु:खी होऊ नये असं मला वाटतं असल्याने मी त्याच्या वडिलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून मला माझ्या प्रियकराला आई परत करता आली,” असं या महिलेने म्हटलं आहे. या तरुणीने प्रियकरासाठी घेतलेल्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिलाय. मात्र अनेकांनी हा निर्णय जरा जास्तच विचित्र असल्याचं मत नोंदवलंय. त्याचप्रमाणे काहींनी हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न विचारत या निर्णयावरुन टीका केलीय.

यापूर्वीही घडलाय असा प्रकार…
मात्र अशाप्रकारे मुलाच्या किंवा मुलीच्या जोडीदारासोबत पालकांनीच लग्न करण्याची किंवा पळून जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी इंग्लंडमध्ये याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ४४ वर्षीय महिला आपल्या गरोदर मुलीच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. जेस अॅल्ड्रीजी या २४ वर्षीय गरोदर तरुणीचा प्रियकर रायन शेल्टॉन हा प्रेयसी आणि तिची आई जॉर्जिनासोबत रहायला आला होता. त्याचवेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते कोणालाही काहीही न सांगता पळून गेले. या तरुणीचे वडील म्हणजेच पळून गेलेल्या जॉर्जिनाचा पती एरिक हा करोनाचा संसर्ग झाल्यामुळे तो दुसऱ्या घरी क्वारंटाइन होता.

जेस जेव्हा बाळाला जन्म देऊन घरी परतली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची आई आणि प्रियकर घर सोडून पळून गेले आहेत. जेसच्या आईने तिच्यासाठी सोडलेल्या चिठ्ठीमध्ये, “आपण कुणाच्या प्रेमात पडू शकतो हे सांगता येत नाही,” असं म्हटलं होतं. सध्या जेसवर दोन मुलांची जबाबदारी आलीय.