Shocking viral video : रेल्वे हा देशातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रमुख प्रवासमार्ग असला, तरी अलीकडच्या काळात रेल्वेमधील चोरीच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढताना दिसत आहेत. प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत काही टोळ्या किंवा व्यक्ती क्षणात मोबाईल, पर्स, बॅग अशा मौल्यवान वस्तू हिसकावून पळ काढतात. प्रवासात थकलेले किंवा गप्पा मारण्यात गुंग झालेले प्रवासी अशा चोरट्यांच्या जाळ्यात सहज अडकतात. रेल्वे प्रवास करताना सावधान राहणं किती आवश्यक आहे, याचं ताजं उदाहरण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

एक महिला प्रवासी खिडकीजवळ बसून मोबाईल वापरत असताना तिच्या हातातील फोन एका चोराने क्षणात हिसकावून नेला. ही घटना इतक्या वेगाने घडली की पाहणारे थक्क झाले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोक या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका रेल्वे डब्यातील आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला प्रवासी खिडकीजवळ बसलेली आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पहात आहे. बाहेर एक फेरीवाला खिडकीजवळ उभा आहे आणि बोलण्याच्या हेतूने प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. तो महिला प्रवाशाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला ‘पॉवर बँक’ दाखविण्याचे नाटक करतो आणि त्याच वेळी महिला क्षणभर बाजूला बघते. याच संधीचा फायदा घेत तो चोर झटक्यात खिडकीतून हात घालून तिचा मोबाईल हिसकावतो आणि पळून जातो.

व्हिडीओमध्ये संपूर्ण चोरीची प्रक्रिया अत्यंत स्पष्ट दिसते. चोराने चेहरा आधीपासूनच झाकलेला असतो. तो जणू काही वस्तू विकायला आला आहे, असा भास निर्माण करतो आणि निष्काळजी प्रवाशांचे लक्ष विचलित करतो. महिलेचे काही सेकंदांसाठी मोबाईलपासून लक्ष विचलित होते आणि एवढ्याच वेळेत चोर तिचा फोन हिसकावून पळ काढतो. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील वापरकर्ते थक्क झाले आहेत. काहींनी म्हटलं की, चोराची चालाकी आणि वेग अविश्वसनीय आहे.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओवर नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, तर काहींनी प्रवाशांना अधिक जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने कमेंट केली – “ट्रेनमध्ये सावधान राहा, सतर्क राहा. त्या व्यक्तीने चेहरा झाकलेला होता, त्यामुळे आधीच शंका घ्यायला हवी होती.” दुसऱ्या युजरने लिहिलं – “अशा घटना पाहून फार वाईट वाटतं, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टींना अजिबात सहन केलं जाऊ नये; महिलांची सुरक्षा आणि सन्मान ही सर्वांची जबाबदारी आहे.”

काहींनी असेही नमूद केले की, अशा घटना सतत वाढत आहेत आणि प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू वापरताना विशेष दक्षता घ्यावी. रेल्वे पोलिसांनीदेखील प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे – अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना, खिडकीजवळ बसताना किंवा आपलं सामान हाताळताना काळजी घ्या. हा व्हिडीओ फक्त चोरीचा दाखला नाही तर प्रत्येक प्रवाशासाठी एक इशारा आहे की, निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते.