Woman Putting Baby In Scooter Diggi Video Viral: आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांना काय चांगलं, काय वाईट हे शिकवण्याचं काम आईचं असतं; कारण आई-वडिलांच्या वागण्या- बोलण्यातून लहान मुलं शिकत असतात, त्यामुळे त्यांचं वागणं हे नेहमी संस्कारी असलं पाहिजे. जर आईनेच मुलांना घडवताना चूक केली तर भविष्यात मुलांचे भविष्य धोक्यात येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक आईच आपल्या मुलाबरोबर अतिशय धक्कादायक कृत्य करताना दिसतेय.
व्हिडीओमध्ये एक आई आपल्या पोटच्या गोळ्याला चक्क स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवताना दिसतेय. इतकंच नाही तर डिकी बंद करून ती स्कुटी चालवत निघून जाते. रीलसाठी तिने केलेल्या कृत्यावर आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अनेकांनी अशी आई नसलेली बरी असं म्हटलंय.
बाळाला स्कुटीच्या डिकीत ठेवलं अन्…
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आई घराबाहेर एका लहान बाळाला घेऊन उभी असल्याचे दिसून येते. काही सेकंदांनंतर ती पार्क केलेल्या स्कुटीची सीट वर उचलते आणि बाळाला स्कुटीच्या डिकीत ठेवते. नंतर हसूनच डिकी बंद करते आणि स्कुटी चालू करून निघून जाते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रील कंटेंटसाठी बाळाचा जीव धोक्यात घातल्याबद्दल महिलेला फटकारले.
स्कूटरची नंबर प्लेट “MP” ने सुरू होते, जी सामान्यतः मध्य प्रदेशात नोंदणी दर्शवते. पण, व्हिडीओ रेकॉर्डिंगचे स्थान आणि वेळ अस्पष्ट आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या निर्दयी आईवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. अनेकांनी असे निदर्शनास आणून दिले की, स्कुटीची डिकी हेल्मेट, लहान बॅग किंवा वस्तू ठेवण्यासाठी असते, मुलांना घेऊन जाण्यासाठी नाही.. दुसऱ्याने प्रश्न उपस्थित केला की, “ते बाळ कसे श्वास घेईल?” तिसऱ्याने लिहिले की, “या आईला थोडी अक्कल असायला हवी, जर बाळाला श्वास घेता येत नसेल तर तुम्ही काय कराल?” आणखी एकाने लिहिले की, “हे धोकादायक आहे; फक्त मनोरंजनासाठी असे करू नका.”
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, ज्यात काहींनी म्हटले की स्कुटीच्या डिकीमध्ये राहून बाळाचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो आणि जास्त उष्णता जाणवल्यास ते भाजलेदेखील जाऊ शकते. काहींनी असेही म्हटले आहे की, रीलच्या व्यसनामुळे लोकांवर इतका परिणाम झाला आहे की त्यांना बरे होण्यासाठी आता व्यसनमुक्ती केंद्रांची आवश्यकता भासेल.
हा धक्कादायक व्हिडीओ @jahar_bhaiya नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. या अकाउंटवरून तिने आणखी असे काही व्हिडीओ पोस्ट केलेत, ज्यातील एका व्हिडीओत ती बाळाला बॅगेत भरून स्कूटर चालवताना दिसतेय, यावरून ती आपल्या पोटच्या मुलाबद्दल किती निष्काळजी आहे हे दिसून येते.
