करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूची दहशत संपूर्ण जगावर आहे. अनेक देशांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संदर्भ घेत काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात नव्या विषाणूबद्दल लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकेतील एका महिलेचा करोना रिपोर्ट विमान प्रवासादरम्यान पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. यासाठी महिलेनं सतर्कता दाखवत स्वत:ला टॉयलेटमध्ये आयसोलेट केलं.

मारिसा फोटिओ या पेशाने शिक्षिका असून शिकागो येथे राहणाऱ्या आहेत. नुकत्याच त्या शिकागोतून आइसलँडचा प्रवास विमानाने करत होत्या. त्यांना विमानात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी याची माहिती फ्लाइट अटेंडेंटला दिली. त्यांनी मारिसाची करोना चाचणी केली. या चाचणीत मारिसा यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच मारिसा यांनी संयम ठेवत इतर प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी स्वत:ला पाच तास टॉयलेटमध्ये आयसोलेट केलं. या घटनेचा व्हिडिओ मारिसा यांनी टिकटॉक अकाउंटवर अपलोड केला आहे. आता हा व्हिडिओ इतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. “माझे करोना लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. त्याचबरोबर बुस्टर डोसही घेतला आहे. लस न घेतलेल्या लोकांमध्ये मी काम करत असल्याने सातत्याने करोनाची चाचणी करत होती. मी ज्या पहिल्या फ्लाइट अटेंडंटला भेटले. त्याचं नाव रॉकी होतं. मी रडत होते. मला माझ्या कुटुंबीयांची काळजी वाटत होती. मी नुकतंच त्यांच्यासोबत जेवण केलं होतं. इतर लोकंही या बातमीने घाबरले होते. पण त्यांनी मला धीर दिला.” असं फोटिओ यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं.

नवीन वर्षाचं स्वागत करताना जरा सांभाळूनच; गाडीत दारू पिताना पकडलं तर इतका दंड

विमान आइसलँडमध्ये लँड होताच फोटिओ क्वारंटाइन करण्यात आलं. तिच्या भावाला आणि वडिलांना कोणतीच लक्षणं नसल्याने स्वित्झर्लंडला त्यांचे कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यास मोकळे केलं. फोटिओ यांची विमानतळावर रॅपिड आणि पीसीआर दोन्ही चाचणी करण्यात आल्या, त्या दोन्ही पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर तिला रेडक्रॉस हॉटेलमध्ये नेण्यात आले तिथे १० दिवस क्वारंटाइन केले. डॉक्टरांनी दिवसातून तीन वेळा तिची तपासणी केली. तिला जेवण आणि औषधे सहज उपलब्ध होत होती. “या सर्व व्यवस्थेबद्दल विमान अटेंडंट आणि आइसलँडमधील लोकांचे आभार”, असं फोटिओ यांनी सांगितलं.