Viral Video: आईस्क्रीम म्हणजे लहान मुलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. आईस्क्रीम म्हटलं की, कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही असं होणार नाही. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सारेच आईस्क्रीमचे वेडे असतात. त्यातच आता विविध चवींचे, आकारांचे, रंगांचे आईस्क्रीम बाजारात उपलब्ध असल्याने प्रत्येक जण या पदार्थाची मागणी करताना दिसतात. पण, हे आईस्क्रीम कोणत्या दुकानातून घ्यायचं हे प्रत्येकाचे ठरलेले असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक आईस्क्रीम विक्रेता आणि एका तरुणीची खास गोष्ट व्हायरल होत आहे.

द गुड न्यूज मूव्हमेंटने सांगितल्याप्रमाणे दिना नावाच्या तरुणीचे वडील अगदी कमी वयातच देवाघरी गेलेले असतात. पण, ती आईस्क्रीम विक्रेत्यामध्ये स्वतःच्या वडिलांना पाहते. हे आईस्क्रीम विक्रेता दररोज तरुणीला मोफत आईस्क्रीम द्यायचे. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी तरुणीला पाहिले तेव्हा ते प्रेमाने आणि उत्साहाने तिचे स्वागत करायचे. आज यांच्या या खास नात्याला जवळजवळ २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणून सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आईस्क्रीम विक्रेता बाबा आणि अज्ञात लेकीची ही अनोखी गोष्ट तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…हृदयस्पर्शी! संकटात अडकलेल्या श्वानाची ‘त्याने’ केली मदत; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी तिच्या ठरलेल्या जागेवर उभी असते. तेव्हा तेथे आईस्क्रीम विक्रेता यांची गाडी येते. तरुणी आनंदी होऊन त्यांचे स्वागत कारण्यासाठी गाडीपाशी धावत जाते आणि त्यांना मिठी मारते. विक्रेता गाडीत जाऊन तरुणीच्या आवडीचे आईस्क्रीम तिला खिडकीमधून देताना दिसतो. आईस्क्रीम घेतल्यानंतर स्वतःच्या स्टाईलमध्ये तरुणी त्यांना धन्यवाद म्हणते आणि मग विक्रेता तेथून गाडी घेऊन निघून जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ द गुड न्यूज मूव्हमेंटच्या @goodnews_movement या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

बाबांनी आपल्यासाठी एखादा नवीन पदार्थ चाखायला आणला आणि तो आपल्याला प्रचंड आवडला तर बाबा आठवणीने तो पदार्थ आपल्यासाठी सारखं घेऊन येतात, ही प्रेम व्यक्त करण्याचीच बाबांची एक पद्धतच असते. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी विक्रेत्याच्या कृतज्ञता आणि दयाळूपणाच्या कृतीने प्रभावित झाले आहे व विविध शब्दांत कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.