Colony Woman Helps Sanitation Worker: पहाटेचे ६ वाजले होते… बहुतेक लोक अजून गाढ झोपेत होते. परिसरात मंद प्रकाश, रस्त्यावर हलकी धुक्याची चादर आणि कुठेतरी झाडू फिरण्याचा आवाज. रोजच्यासारखंच दृश्य; पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं, ज्यानं हजारो नव्हे, तर लाखो लोकांच्या मनांना स्पर्श केला.
सोशल मीडियावर सध्या एक भावूक करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या परिसरातील सफाई काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला सकाळी ६ वाजता गरमागरम चहा देताना दिसते. साधा प्रसंग… पण त्यामागची भावना इतकी मोठी की, पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येईल.
व्हिडीओमध्ये दिसते की, सफाईकर्मी महिला रोजच्याप्रमाणेच पहाटेच कामाला लागलेली असते. गल्लीबोळ स्वच्छ करताना तिच्या हातात झाडू, चेहऱ्यावर कष्टाची छटा व कामाबद्दलची निष्ठा स्पष्ट जाणवते. त्याच वेळी घरातून एक महिला ट्रेमध्ये चहाचा कप घेऊन बाहेर येते. व्हिडीओवर लिहिलेले शब्द मनाला भिडतात, “सकाळी ६ वाजता बाहेर पडतात… आपली गल्ली स्वच्छ करतात… तर एक कप चहा तरी बनतो.”
ती महिला सफाईकर्मीच्या जवळ जाऊन आदरपूर्वक चहा देते. दोघींमध्ये काही क्षण संवाद होतो. सफाईकर्मी रस्त्याच्या कडेला शांतपणे बसून चहा पिते. त्या क्षणात तिच्या चेहऱ्यावर उमटलेला समाधानाचा भाव सर्व काही सांगून जातो. हा प्रसंग केवळ चहा देण्याचा नव्हता; तो होता कृतज्ञता, सन्मान आणि माणुसकीचा.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_cg_ratna या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला असून, कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. अनेकांनी लिहिले की, सफाईकर्मी रोज पहाटे उठून आपला परिसर स्वच्छ ठेवतात; पण त्यांच्या कष्टांचे कौतुक फारसे होत नाही. समाजात अशा छोट्या कृतींमधूनच सकारात्मक बदल घडू शकतो.
या व्हिडीओची खासियत नेमकी काय? कदाचित तो आपल्याला आरशासमोर उभं करतो. आपण रोज ज्यांच्यामुळे स्वच्छ रस्त्यांवरून चालतो, त्या लोकांकडे आपण किती वेळा कृतज्ञतेनं पाहतो? एक साधा चहाचा कप एखाद्याचा दिवस उजळवू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट होते. मोठमोठ्या घोषणांपेक्षा छोट्या कृती अधिक प्रभावी ठरतात, याची जाणीव हा व्हिडीओ करून देतो.
येथे पाहा व्हिडीओ
आजच्या धावपळीच्या जगात संवेदनशीलता कमी होत चालल्याची तक्रार केली जाते. मात्र, अशा घटनांमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा दिलासा मिळतो. एका महिलेच्या साध्या कृतीनं समाजाला दिलेला हा संदेश दूरवर पोहोचला आहे. सन्मान देण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; मनापासून केलेली छोटी कृतीही पुरेशी असते.
(सूचना: ही बातमी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या आशयाची स्वतंत्र पडताळणी करण्यात आलेली नाही.)
