मध्य प्रदेशातील एक महिला पोलीस अधिकारी अलीराजपूर जिल्ह्यातील एका हेलिपॅडवर कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या तिच्या दीड वर्षाच्या मुलीला बेबी कॅरियर बॅगमध्ये ठेवले होते. मोनिका सिंह असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून तैनात आहे. मोनिका सिंग या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडवर तैनात होत्या.

जोबत विधानसभेसाठी आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन दिवसांच्या प्रचारासाठी मंगळवारी अलीराजपूर येथे आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी महिला पोलीस उपअधीक्षकांचे त्यांच्या कामाप्रती असलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री शिवराज यांनी महिला पोलीस उपअधीक्षकांचे मुलीसोबतचे फोटो ट्विटर पोस्ट केले आहेत. “माझ्या अलीराजपूर भेटीदरम्यान, मी डीएसपी मोनिका सिंगला तिच्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन जाताना पाहिले. कर्तव्याप्रती तिचे समर्पण कौतुकास्पद आहे. मध्यप्रदेशला तुझा अभिमान आहे. मी तिच्या धाकट्या मुलीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो,” असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री लहान मुलीच्या डोक्यावर हात ठेवून विचारपूस करताना दिसत आहेत. शिवराज सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, ती आपल्या मुलीला घेऊन अलीराजपूरला आली कारण तिला दोन दिवस घरापासून दूर राहावे लागले. मंगळवारी सकाळी ती अलिराजपूर येथे कर्तव्यासाठी जात असताना, तिची मुलगी उठली आणि तिने सोबत जाण्याचा आग्रह धरला. मोनिका सिंग या संदर्भात म्हणाल्या, “मला एक आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि माझे कर्तव्यही पूर्ण करायचे होते.”

काहींनी आई आणि पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावल्याबद्दल मोनिका सिंगचे कौतुक केले आहे.  तर काहींनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी एका महिला अधिकाऱ्याला एका लहान मुलीसह हेलिपॅडवर तैनात केल्याबद्दल सरकारवर टीकाही केली आहे.