कल्पना करा की बर्फाळ पर्वत रांगामध्ये भरधाव वेगात एक तरुणी स्नो बोर्डिंग करत आहे तेही सुंदर साडी नेसून. शुभ्र बर्फामध्ये तिची साडी उठून दिसत आहे. भरधाव वेगाने स्नो बोर्डिंग करताना तिचा पदरही वाऱ्यावर उडत आहे. स्वत:वर नियंत्रण ठेवून येणारे सर्व अडथळे ती पार करत आहात…..तुम्हाला वाटेल, हे दृष्य एखाद्या चित्रपटातील असेल पण असे प्रत्यक्षात घडले आहे.

सोशल मीडियावर सध्या दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यांनी अश्यक वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. चक्क साडी नेसून स्नो बोर्डींग या दोन्ही तरुणींनी केले आहे. या व्हिडिओने इंटरनेटवरील अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून, पारंपरिक पोशाख आणि साहसी खेळ यांचा सुंदर मेळ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हिवाळ्यात बर्फाळ पर्वत रांगामध्ये स्नो बोर्डिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण हेच काम पारंपरिक भारतीय साडी नेसून करणे म्हणजे अफलातून कामगिरी म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही. कारण साडी नेसली तरी सांभाळणे हे फार अवघड काम आहे विशेषत: ज्यांना रोज साडी नेसण्याची सवय नाही त्यांच्यासाठी. असे असूनही या तरुणींनी अत्यत आत्मविश्वासाने ही कामगिरी करून दाखवली आहे. स्नो बोर्डिंग अन् भारतीय पोशाख यांचा संगम दाखवणारा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे

बर्फाळ पर्वतरांगामधून तरुणींनी केले स्नोबोर्डिंग

व्हिडिओमध्ये भारतीय स्नोबोर्डर Urmila आणि स्वित्झर्लंडची Linda या दोघी बर्फाळ पर्वतरांगामधून स्नोबोर्डिंग करत उतरताना दिसतात. दोघींनी रंगीबेरंगी साड्या नेसल्या असून पांढऱ्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा लूक अधिकच आकर्षक दिसतो.

व्हिडिओच्या सुरुवातीला दोघी साडीच्या निऱ्या पदर नीट करताना दिसतात. त्यानंतर त्या आत्मविश्वासाने स्नोबोर्डवर उभ्या राहून पर्वताच्या उतरावरून खाली सो बोर्डिंग करताना दिसतात. धोकादायक उतार असूनही त्यांची हालचाल अतिशय संतुलित आणि नियंत्रित दिसते.

स्नोबोर्डिंग करताना साडीचा हलणारा पदर वाऱ्यासह उडताना दिसतो, ज्यामुळे संपूर्ण दृश्याला एक सिनेमॅटिक प्रभाव मिळतो.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “Saree not sorry. Snowboarding edition.”

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्समध्ये या दोघींचे कौतुक केले. काहींनी हा व्हिडिओ महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.

एका यूजरने लिहिले, “हे पाहून प्रत्येक महिलेला आनंद झाला असेल.” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली, “जणू सुपरवुमन बर्फावरून उडत आहेत.”

अनेक प्रेक्षकांनी पारंपरिक भारतीय साडी आणि साहसी क्रीडा यांचा केलेला संगम हा या व्हिडिओचा सर्वात खास भाग असल्याचे म्हटले. काहींनी रंगीबेरंगी साड्या आणि पांढरा बर्फ हे दृष्य अत्यंत आकर्षक असल्याचेही नमूद केले.

परंपरा आणि आधुनिक साहस यांचा असा अनोखा संगम दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Live Updates