World’s Most Dangerous Airport Video Goes Viral: जगात अनेक अशी ठिकाणं आहेत जी लोकांना रोमांचित करतात. काही ठिकाणी लोक पुन्हा-पुन्हा जायला उत्सुक असतात, तर काही ठिकाणी एकदाच गेलं तरी पुरेसं वाटतं. पण काही ठिकाणं अशीही आहेत, जिथे पोहोचतानाच धडधड वाढते आणि श्वास रोखला जातो. अशाच एका थरारक ठिकाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो आहे जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक!

इथलं उड्डाण म्हणजे थराराचे शिखर!

विमानप्रवास अनेकांना आवडतो. आकाशात झेपावण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. पण, जगात काही विमानतळ असे आहेत, जिथून प्रवास करणं म्हणजे थेट थरारक अनुभव असतो. अशाच एका विमानतळाचं नाव ऐकलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो.

हा विमानतळ नेपाळमध्ये असून त्याचं नाव आहे तेनजिंग-हिलारी विमानतळ (लुकला). हा विमानतळ समुद्रसपाटीपासून सुमारे ९,३८३ फूट उंचीवर वसलेला आहे. उंच डोंगर, अरुंद धावपट्टी आणि अचानक बदलणारे हवामान या सगळ्यांमुळे इथलं लँडिंग आणि टेकऑफ अत्यंत आव्हानात्मक मानलं जातं.

धावपट्टी की दरी? क्षणभरात बदलतो सीन!

या विमानतळाची धावपट्टी खूपच लहान आणि उतारावर आहे. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा परिस्थितीत पायलटला अचूक वेळी आणि अचूक वेगाने विमान उडवावं लागतं. जरा जरी चूक झाली तरी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

व्हिडीओमध्ये दिसतं की, विमान उड्डाण घेताना अगदी काही सेकंदांतच धावपट्टी संपते आणि पुढे खोल दरी सुरू होते. हा क्षण पाहताना प्रेक्षकांचाही श्वास रोखला जातो.

व्हिडीओ पाहून डोळे विस्फारतील!

हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील arbaazvlogs या पेजवर तो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, दहा लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणत आहेत, “असं दृश्य कधी पाहिलंच नव्हतं!” तर काहीजण म्हणतात, “हे खूपच धोकादायक आहे, इथे जाण्याची हिंमतच होणार नाही!”

धाडस की वेडेपणा?

हे विमानतळ अनेक साहसी प्रवाशांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे जाणाऱ्या ट्रेकर्ससाठी हे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते, त्यामुळे रोज अनेक विमानं इथून उड्डाण घेतात आणि उतरतात.

तरीही इथला प्रत्येक उड्डाणाचा क्षण हा थराराने भरलेला असतो. पायलटचे कौशल्य, हवामानाची साथ आणि अचूक वेळ-या सगळ्यावरच इथल्या प्रवासाचं यश अवलंबून असतं.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्ही कराल का असा प्रवास?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकच प्रश्न मनात येतो, तुम्ही अशा विमानतळावरून प्रवास करायला तयार आहात का?

धाडस असेल तरच हा अनुभव घ्यावा… कारण इथे प्रत्येक उड्डाण म्हणजे एक रोमांचकारी साहस आहे!