सुप्रसिद्ध आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. ते एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनोख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवत असतात. तर आज त्यांनी एका खास तरुणीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. भारताची एक १६ वर्षाची तरुणी जगातील पहिली हात नसलेली धनुर्धारी ठरली आहे. तसेच सुप्रसिद्ध आनंद महिंद्रा यांनी शीतल देवी या तरुणीचे कौतुक करत तिला एक खास गोष्ट देण्याचे आश्वासनही केलं आहे.

शीतल देवी असं या तरुणीचं नाव असून, ती सध्या १६ वर्षांची आहे. तसेच तिनं अलीकडेच चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. शीतल देवी हिनं देशासाठी सुवर्ण व रौप्य अशी दोन पदकं जिंकली आहेत. तसेच ती जगातील पहिली हात नसलेली धनुर्धारी ठरली आहे. तिच्यासाठी एक विशेष धनुष्य तयार करण्यात आलं आहे; जे हातानं नाही तर पायानं चालवलं जातं. १६ वर्षीय शीतल देवीला हात नाहीत; पण त्यामुळे खचून न जाता तिनं पायांच्या मदतीनं तिरंदाजी करून हे यश मिळवलं आहे. शीतल देवी या तरुणीची गोष्ट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…माझ्यातील साधेपणा हा माझ्या जन्मभूमीमुळे – सुधा मूर्ती

पोस्ट नक्की बघा :

आनंद महिंद्राचे ट्वीट :

१६ वर्षीय शीतल देवीची उत्तम कामगिरी पाहता, सुप्रसिद्ध आनंद महिंद्रा यांनीसुद्धा शीतल देवीचं कौतुक केलं आहे आणि व्हिडीओ शेअर करून लिहिलंय की, मी माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल आता कधीही तक्रार करणार नाही. शीतल तू आम्हा सर्वांसाठी एक शिक्षिका आहेस. कृपया तू आमच्या रेंजमधील एखादी गाडी निवड. मग ती आम्ही तुला बक्षीस म्हणून देऊ आणि ती तुझ्या वापरण्यायोग्य करून देऊ; असं आश्वासन आनंद महिंद्रा यांनी दिलं आणि तशी खास कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. सर्व अडथळ्यांवर मात करून देशाला अभिमान मिळवून देणाऱ्या शीतलच्या तिरंदाजीनं आनंद महिंद्रा प्रभावीत झाले. तसेच शीतलला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी तिला कार भेट म्हणून देण्याचं आश्वासनही दिलं आहे. तसेच या पोस्टवर मेघना गिरीश यांनी कमेंट केली आहे, “धन्यवाद! आनंद महिंद्रा सर. आम्ही तिला पहिल्यांदा बंगळुरूला घेऊन गेलो तेव्हा शीतलनं तिचा पाय कारच्या स्टेअरिंगवर ठेवला आणि म्हणाली, ‘एक दिवस मीही कार चालवेन. स्वप्नं पूर्ण होतात…” अशी कमेंट केली आहे.