Teacher CPR Incident: एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली, तर मदतीसाठी धावून जाणं ही माणुसकीची भावना आहे. मात्र, योग्य माहिती नसताना केलेली मदत कधी कधी मोठं नुकसानही करू शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका शिक्षिकेला मदत करण्याच्या प्रयत्नात अशी चूक झाली की, त्याचा गंभीर परिणाम त्यांनाच सहन करावा लागला. नेमकं काय घडलं, याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील कैलारस परिसरातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक शिक्षिका रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसतात. दावा असा केला जात आहे की, त्या स्कूटीवरून जात असताना अचानक खाली पडल्या. त्यानंतर परिसरातील नागरिक तातडीनं त्यांच्या मदतीसाठी धावले.

याच वेळी गर्दीतून दोन तरुण पुढे आले. शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा त्यांचा समज झाला. कोणतीही वैद्यकीय खात्री न करता, त्यांनी लगेच सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) देण्यास सुरुवात केली. मदत करण्याचा त्यांचा हेतू चांगला असला तरी सीपीआर देण्याची पद्धत चुकीची ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिक्षिका बेशुद्ध असल्यानं त्यांना त्या क्षणी काहीच समजलं नाही. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली. चुकीच्या पद्धतीनं सीपीआर दिल्यामुळे त्यांच्या दोन बरगड्या तुटल्याचं डॉक्टरांच्या तपासणीत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करीत, त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर सोशल मीडियावर सीपीआरबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणांचा हेतू चुकीचा नव्हता, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देताना लिहिलं की, संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे येणं महत्त्वाचं आहे. मात्र, प्रत्येकाला सीपीआर देण्याची योग्य पद्धत शिकवली गेली पाहिजे. शाळा, महाविद्यालयं आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्येही याचं प्रशिक्षण दिलं जाण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

काही डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या निमित्तानं महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यास सर्वप्रथम तिची नाडी आणि श्वास सुरू आहे का, याची खात्री करणं आवश्यक असते. त्यानंतर तातडीनं रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधावा. केवळ सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून किंवा अपुरी माहिती घेऊन सीपीआर देण्याचा प्रयत्न करणं धोकादायक ठरू शकतं.

ही घटना खरी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात असला तरी अशा प्रसंगातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. कोणालाही मदत करताना योग्य प्रशिक्षण आणि अचूक माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे; अन्यथा मदत करण्याच्या उद्देशानं केलेलं पाऊलही संबंधित व्यक्तीसाठी गंभीर ठरू शकतं. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत शांत राहून तज्ज्ञांची मदत घेणं आणि योग्य पद्धतीनं प्रथमोपचार करणं हेच सर्वांत सुरक्षित ठरतं.

येथे पाहा व्हिडीओ