रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी बंदी आणलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५००० रुपयांहून अधिक रक्कम ३० डिसेंबरपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार असल्याचा आदेश जारी केला होता. तसेच ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही याचे स्पष्टीकरण देणेही बंधनकारक करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकीय नेते योगेंद्र यादव मंगळवारी त्यांच्या बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. ही रक्कम ५००० रूपयांहून अधिक असल्याने यादव यांना रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे ही रक्कम भरण्यास इतका उशीर का झाला, याचे कारण लेखी स्वरूपात द्यावे लागले. यावेळी योगेंद्र यादव यांनी पत्राद्वारे दिलेले हटके पण संयत स्पष्टीकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. योगेंद्र यादव यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहलेल्या या पत्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला ऐकूनच यापूर्वी बँकेत न आल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांनी ३० डिसेंबरपर्यंतचा अवधी असल्यामुळे नागरिकांना बँकांमध्ये लगेच गर्दी करू नका, असा सल्ला दिला होता. पंतप्रधानांचा हाच सल्ला ऐकून  रांगा टाळण्यासाठी मी यापूर्वी पैसे भरण्यासाठी बँकेत आलो नाही. मी ८ नोव्हेंबर २०१६ पासून एकदाही बँकेत पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे आता बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी मला वेगळे कारण द्यावेसे वाटत नाही. मी शक्यतो रांगेत उभे राहण्याचे टाळतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे माझ्याकडे पैसे जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतचा अवधी होता. मी असे गृहीत धरले होते, असे यादव यांनी पत्रात म्हटले आहे. योगेंद्र यादव यांचे हे पत्र फेसबुक आणि ट्विटरवर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाले. त्यानंतर अनेक नेटिझन्सकडून योगेंद्र यादव यांनी पत्रात लिहलेल्या स्पष्टीकरणाचे कौतूक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा ३० डिसेंबपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करता येतील, असे म्हटले होते. त्यासाठी रकमेचे काही बंधन नव्हते. मात्र १७ डिसेंबरला सरकारने राजपत्रित सूचना जारी करून बँकेत पैसे जमा करण्यावर बंधन लादले आहे. आता जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटांमधील ५ हजारांपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पाच आठवडे उलटले आहेत. एव्हाना बहुतांशी नागरिकांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत भरल्या असाव्यात. त्यामुळे बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.