How To Turn Defeat Into Victory : यशाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाच्या आयुष्यात यश व अपयशाचे टप्पे येत असतात. या प्रवासात मिळणारे अनुभवच शेवटी व्यक्तीच्या विजयाची किंवा पराभवाची दिशा ठरवतात. मात्र, आचार्य चाणक्यांनी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या योग्य वेळी आचरणात आणल्यास तुमचे अपयशही यशात बदलण्यास मदत करू शकतात.

आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती खूप लोकप्रिय आहे. चाणक्य नीती जीवनातील अनेक समस्यांवर उपाय देते. तर आज आपण जीवनात आचार्य चाणक्य यांची शिकवण अंगीकारण्याचे फायदे जाणून घेऊयात…

पराभवाचे विजयात होईल रूपांतर

पराभवातून शिकून पुढे जाणे, कठीण परिस्थितीतही संयम राखणे, योग्य वेळेची वाट पाहणे, कठोर परिश्रम करणे, नकारात्मक विचार टाळणे आणि योग्य लोकांसोबत राहणे आदी अनेक गोष्टी तुम्ही कठीण काळात लक्षात ठेवल्यास पराभवाचे विजयात रूपांतर करू शकता.

पैसा ठरेल बॅकअप प्लॅन

आचार्य चाणक्य सल्ला देतात की, तुम्ही नेहमी वाईट काळासाठी पैसे साठवून ठेवले पाहिजेत. जेव्हा वाईट काळ येतो, तेव्हा सर्वजण तुम्हाला सोडून जातात. पण, तुम्ही बचत केलेले पैसे नेहमी तुमच्या मदतीला येतात. यामुळे तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर पडणे सोपे जाते.

अजिबात ठेवू नका अशा ठिकाणी पाऊल

चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे की, जिथे तुमचा आदर केला जात नाही. अशा ठिकाणी तुमचा कितीही फायदा झाला तरी जाऊ नये. कारण – जर एखाद्या ठिकाणी तुमचा आदर होत नसेल, तर त्या ठिकाणाहून मिळणारे फायदे निरर्थक ठरतात.

काही गोष्टी ठेवा गुपित

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीशास्त्रात म्हणतात की, जोपर्यंत तुमची ध्येये साध्य होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ती इतरांना सांगू नयेत. कारण कधीकधी, जर तुम्ही ती साध्य करण्यात अयशस्वी झालात, तर तुम्ही चेष्टेचा विषय बनता. किंवा कधीकधी, इतरांना सांगण्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये अडथळा येऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)