उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थांची पहाण करण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. २२ मे रोजी योगी आदित्यनाथ मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सैफईमधील आयोग्य व्यवस्थेची पहाणी करण्यासाठी पोहचले होते. योगींनी येथे करोना रुग्णालय, ऑक्सिजन प्लॅण्ट आणि गीजा गावामधील आरोग्य व्यवस्थांची पहाणी केली. सैफईमधून योगी परतल्यानंतर समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने योगी आदित्यानाथ ज्या ठिकाणी गेले, जिथे जिथे त्यांनी पावलं ठेवली तिथे गंगाजल शिंपडून जमीन ‘शुद्ध’ केली. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.

डोक्यावर लाल रंगाची गांधी टोपी घाललेल्या या युवकाने योगी आदित्यनाथ यांनी ज्या हेलीपॅडवर लॅण्डींग केली तिथंपासून ते योगींनी भेट दिलेल्या जागांवर गंगाजल शिंपडलं. ही व्यक्ती स्वत:ला समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगत होती, असं आजतकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. योगी जिथे जिथे गेले त्या जागा मी गंगाजल शिंपडून स्वच्छ केल्याचा दावा या तरुणाने केलाय. हा तरुण मैनपुरी जनपदमधील भोगाव परिसरातील महोली खेडा येथे राहतो. या मुलाचं नाव रोहित यादव असं असल्याचं समजतं.

व्हायरल व्हिडीओमधील या कार्यकर्त्याने आपण असं का करत आहोत याचं कारणही सांगितलं आहे. २०१७ साली योगींनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रं हाती घेतली तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कालिदास मार्गवरील सरकारी बंगल्यामध्ये गंगाजल शिंपडून तो साफ केला होता. यामुळे आपल्याला फार त्रास होता. म्हणूनच मी आता योगी सैफई दौऱ्यादरम्यान जिथे जिथे गेले तिथे गंगाजल शिंपडलं. योगींच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहितने येथील स्डेडियमवर जाऊन हेलीपॅडवरही गंगाजल शिंपडले.

अन्य एका तरुणानेही अशाच पद्धतीचा व्हिडीओ शूट केला आहे. मात्र इटावा समाजवादी पक्षाचे इटावा जिल्हाध्यक्ष गोपाल यादव यांनी या दुसऱ्या व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही इटावा मधील समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.