Workplace Chanakya Strategies : आजकालच्या धावपळीच्या कॉर्पोरेट जगतात (Corporate World) फक्त रात्रीचा दिवस करून, घाम गाळून आणि प्रामाणिकपणे काम करणं पुरेसं उरलेलं नाही. तुम्ही तुमच्या कामात १००% प्रामाणिक आहात, वेळेवर काम पूर्ण करता ही खूप चांगली गोष्ट आहे; पण जेव्हा तुमच्या याच प्रामाणिकपणाचा आणि कष्टांचा वापर करून भलतेच लोक स्वतःचं प्रमोशन करून घेतात किंवा बॉससमोर बाजी मारून नेतात, तेव्हा वेळीच सावध होण्याची गरज असते.

ऑफिसच्या वातावरणात बऱ्याचदा अतिसरळ, मनमिळाऊ आणि शांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केलं जातं आणि त्यांच्या मेहनतीचं संपूर्ण क्रेडिट (Credit) दुसरेच घेऊन जातात. अशा प्रकारच्या घाणेरड्या ऑफिस पॉलिटिक्समुळे (Office Politics) अनेक सक्षम आणि प्रामाणिक कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचतात आणि स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरतात. पण जर तुम्हाला या कॉर्पोरेट जगात टिकून राहायचं असेल, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल आणि सहकाऱ्यांचा त्रास कमी करून योग्य सन्मान मिळवायचा असेल, तर केवळ हार्ड वर्क नाही तर ‘स्मार्ट गेम’ खेळणं गरजेचं आहे. अशा वेळी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवलेली आचार्य चाणक्यांची धोरणं तुम्हाला ऑफिसमधला एक परिपूर्ण ‘स्मार्ट प्लेयर’ बनवू शकतात.

जर तुमचीही आयडिया चोरीला जात असेल किंवा कामाचं क्रेडिट दुसरं कोणी मारून नेऊन तुम्हाला गृहीत धरत असेल, तर चाणक्य नीतीचे हे ५ सुवर्णनियम तुमची विचार करण्याची पद्धत आणि पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील.

१. आपल्या कमकुवतपणा कोणालाही सांगू नका (Do Not Disclose Your Weaknesses)

चाणक्य नीतीनुसार, स्वतःच्या कमकुवतपणा (Weaknesses) आणि भीती कधीही प्रत्येकासमोर उघड करू नये. ऑफिसमध्ये काम करताना अनेक लोक इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी किंवा व्यावसायिक कमकुवतपणा सहकाऱ्यांशी शेअर करतात. नंतर हेच लोक तुमच्या या गोष्टींचा गैरवापर करून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्या कमकुवतपणा नेहमी गुप्त ठेवा आणि फक्त पूर्णपणे विश्वासू व्यक्तींशीच चर्चा करा.

२. गरजेपेक्षा जास्त सरळ असणे ठरू शकते नुकसानकारक (Excessive Straightforwardness Can Be Harmful)

आचार्य चाणक्यांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे – “जंगलात सर्वात आधी सरळ झाडेच कापली जातात.” ऑफिसच्या वातावरणातही खूप जास्त सरळ असणे किंवा प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणे तुमच्यासाठी महाग पडू शकते. जेव्हा तुम्ही इतरांच्या अयोग्य गोष्टी मानू लागता, तेव्हा लोक तुमच्या सीमांचा (Boundaries) आदर करणे सोडतात. नम्र असणे चांगली गोष्ट आहे, पण जिथे चुकीचे घडत असेल तिथे ‘नाही’ (Say No) म्हणायला शिका. जर तुम्ही स्वतःच्या सीमा ठरवल्या नाहीत, तर सहकारी त्यांच्या कामाचा बोजाही तुमच्यावर टाकतील.

३. आपल्या भविष्यातील योजना आणि रणनीती गुप्त ठेवा (Keep Your Future Plans and Strategies Secret)

ऑफिसमध्ये आपल्या नवीन कल्पना (Ideas), करिअर प्लॅन किंवा कोणत्याही प्रोजेक्टची रणनीती वेळेआधी जाहीर करू नका. काम पूर्ण होईपर्यंत त्याची चर्चा इतरांशी करू नये, असे चाणक्य नीती सांगते. जर तुम्ही तुमची योजना आधीच प्रत्येकाला सांगितली, तर चलाख लोक त्याचे श्रेय (Credit) स्वतः घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. त्यामुळे तुमच्या पुढील पावलाबद्दल फक्त तुमची टीम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच (Senior Management) बोला.

४. आरडाओरड करण्यापेक्षा शांतपणे काम करून निकाल दाखवा (Work Silently and Show Results)

कामाच्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीचा डंका वाजवण्यापेक्षा तुमचे कामच बोलू द्या. माणसाने आपल्या ध्येयावर (Goal) पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी शिकवण चाणक्यांच्या नीतींमधून मिळते. जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचे काम करता आणि योग्य वेळी सर्वोत्तम परिणाम (Results) देता, तेव्हा तुमचे विरोधक आपोआप पराभूत होतात. यासोबतच ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या सर्व कामांचे रेकॉर्ड आणि ईमेल बॅकअप (Email Backup) नेहमी सुरक्षित ठेवा; ही सवय तुम्हाला कोणत्याही खोट्या आरोपांपासून किंवा गैरसमजांपासून वाचवेल.

५. चलाख आणि नकारात्मक लोका लोकांपासून अंतर ठेवा (Maintain Distance from Cunning and Negative People)

ऑफिसमध्ये प्रत्येक सहकाऱ्याशी मैत्री ठेवणे शक्यही नाही आणि गरजेचेही नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा सहकारी तुमच्या पाठीमागे गोष्टी करतो किंवा तुम्हाला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यापासून लगेच अंतर ठेवा. अशा लोकांशी फक्त कामापुरता संबंध (Work-related Interaction) ठेवा आणि कधीही वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका. जेव्हा तुम्ही अशा चलाख लोकांपासून दूर राहून फक्त स्वतःच्या कामावर आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित कराल, तेव्हा कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही.