अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड याच्या कोठडीतील पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणी देशभरात हिंसक निदर्शने सुरु आहे. अमेरिकेतील अनेक राज्यात आफ्रिकी अमेरिकी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. हजारो सशस्त्र सैनिक, लष्करी जवान, पोलीस पाठवून आपण दंगल, लूटमार, गुंडगिरी, हल्ले, मालमत्तेची हानी हे प्रकार रोखू. जमावाला काबूत ठेवण्यासाठी वेळप्रसंगी आपण लष्कर तैनात करू,असा इशारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिला आहे. असं असलं तरी अमेरिकेमधील हिंसाचार मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. अनेक शहरांमध्ये सुपरमार्केट, मोठी मोठी दुकाने फोडून लूटमार केली जात आहे. मात्र अशापद्धतीने लूटमार करणाऱ्यांना आता जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीने चांगलाच दणाक दिला आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठवल्यासंदर्भातील वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिलं आहे. याच वृत्तामध्ये यासंदर्भातील उल्लेख आहे.

अमेरिकेमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन डीसी, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क शहरामध्ये आंदोलनाच्या नावाखाली अनेकांनी लूटामार केली. अनेक शहरामधील वाढता हिंसाचार पाहता अ‍ॅपलने आपली स्टोअर्स बंद ठेवण्यााच निर्णय घेतला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अ‍ॅपलने आपले प्रोडक्ट मोठ्या मोठ्या दुकांनांमधून मागे घेतले. काही ठिकाणी अॅपलच्या स्टोअर्सवर हल्ला करुन तोडफोड करत तेथील अनेक वस्तू आंदोलनाच्या नावाखाली चोरण्यात आल्या. करोनासंदर्भातील लॉकडाउनचे निमय शिथिल केल्याने काही जागी अ‍ॅपलने स्टोअर्स सुरु केले होते. मात्र तेथेही लूटमार झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशात सुरु असणारा हिंसाचार आणि वर्णद्वेषाविरोधातील आंदोलनाच्या काळातच अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. “आपल्या राष्ट्राच्या आणि कोट्यावधी लोकांच्या हृदयात झालेल्या घटनेची सल खदखदत आहे. या संकटाच्या काळात आपण एकजूट दाखवायला हवी. त्यासाठी आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जॉर्ज फ्लॉयडची ज्या मूर्खपणे हत्या करण्यात आली त्यानंतर निर्माण झालेलं भीतीदायक, हिंसक व संतापजनक परिस्थितीचा तसेच वंशद्वेषाच्या मोठ्या इतिहासाचा आपण सर्वांनी योग्य प्रकारे अंदाज घेतला पाहिजे,” असं कूक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

“नेहमी जगाला चांगल्या पद्थीने बदलण्याचे सामर्थ्य देणारे तंत्रज्ञान तयार करण्याचे अ‍ॅपलचे ध्येय आहे. आपल्या वेगळेपणातूनच आपण अधिक शक्तीशाली होत आहोत. जगातील कोणत्याही देशात असणाऱ्या आपल्या कंपनीच्या स्टोअरमध्ये आपण कायमच वेगवेगळ्या लोकांचे स्वागत केलं आहे. प्रत्येकाला आपण आपल्यात समावून घेतलं आहे. यामधूनच आपण सर्वसमावेशच अशी अ‍ॅपल कंपनी अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असंही कूक यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.

इतकचं नाही तर अ‍ॅपलने त्यांच्या स्टोअरमधून चोरण्यात आलेल्या सर्व वस्तूंना कंपनीने ट्रेस केलं आहे. तसेच या चोरलेल्या वस्तूंमधील सॉफ्टवेअर सपोर्ट अॅपलने काढून घेतला असल्याने त्या आता लूटमार करणाऱ्यांनाही वापरता येणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. चोरलेला मोबाइल फोन किंवा वस्तू सुरु केल्यानंतर स्क्रीनवर केवळ एकच संदेश दिसत आहे. “हे डिव्हाइज डिसएबल करण्यात आलं असून तुम्हाला ट्रेस करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाला यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे,” असा एकच मेसेज स्क्रीनवर झळकताना दिसत आहे. यासंदर्भातील काही स्क्रीनशॉर्टही व्हायरल झाले आहेत.