Indian Railway Shocking Video : रातोरात प्रसिद्धी आणि व्हायरल कंटेंटच्या हव्यासापोटी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे एक लाजिरवाणे उदाहरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर एका धावत्या ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही तरुण कंटेंटसाठी असा काही संतापजनक प्रकार करतायत की पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. हे तरुण उघडपणे रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड करतायत, ज्यावर लोकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनच्या जनरल डब्यात दोन तरुण दिसत आहेत. यावेळी एक तरुण व्हिडीओ शूट करतोय आणि दुसरा आपल्या हक्काची मालमत्ता असल्याप्रमाणे सीटवरील निळे कव्हर फाडताना दिसतोय. धक्कादायक गोष्ट म्हणजे, व्हिडीओ रेकॉर्ड करणारा तरुण त्याला थांबवण्याऐवजी दोघे मिळून जोरजोरात हसतायत. इतकचं नाही तर ते त्या कव्हरबरोबर खेळू लागतात. दोघांबरोबर अजूनही काही तरुण प्रवास करत होते. तेही हसून तरुणाच्या कृत्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन करताना दिसतायत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स तीव्र संताप व्यक्त करतायत.
एवढंच नाही तर या क्लिपच्या दुसऱ्या भागात आणखी दोन तरुण डब्याच्या फिटिंग्जला लटकून धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहेत, जे केवळ नियमांचे उल्लंघनच नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोकादेखील आहे.
ट्रेनमधील हा संतापजनक व्हिडीओ
@TARUNspeakss नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक या मुलांच्या बेजबाबदार कृत्यांबद्दल संताप व्यक्त करत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की लोक कर भरतात, ज्यामुळे रेल्वेला या सेवा पुरवणे शक्य होते. परंतु, केवळ १० सेकंदांच्या व्हिडीओसाठी अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्ह्यापेक्षा कमी नाही.
अनेक लोकांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे पोलिसांना टॅग करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहिले की, “या लोकांना पकडून संपूर्ण डब्याचे भाडे त्यांच्याकडून वसूल केले पाहिजे.” दुसऱ्याने लिहिले, “सोशल मीडियाच्या या विळख्याने तरुण पिढीची नागरिकतेची जाणीव हिरावून घेतली आहे.”
या व्हिडीओची नेमकी तारीख आणि ट्रेन अद्याप निश्चित समजलेली नाही, पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लोक कायदे आणि नियमांचे उल्लंघन करण्यास कसे तयार असतात, यावर या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रेल्वेने अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी लोक करत आहेत.
