Lucknow Birthday Celebration Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. लाइक्स आणि कमेंट्सच्या मोहात आपल्या वागण्याचा इतरांना त्रास झाला तरी चालेल, पण लोक त्यांचे विचित्र वागणं काही सोडत नाहीत. अनेकदा तर लोक प्रसिद्धीसाठी कायदे पायदळी तुडवत सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास देतात. अशाचप्रकारे काही श्रीमंत तरुणांनी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी असे काही केले की, त्यांना आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुणांनी मित्राचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी चक्क संपूर्ण रस्ता अडवला. रस्त्याच्या अगदी मधोमध २० हून अधिक गाड्या पार्क करत, मोठ्या-मोठ्याने गाणी वाजवत, गाड्यांवर चढून मित्राच्या वाढदिवस सेलिब्रेशनच्या नावाखाली गोंधळ घातला. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत हे तरुण वाढदिवस साजरा करत असल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले. गुरुवारी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला.
रस्त्याच्या मधोमध वाढदिवस केला साजरा
लखनऊ पोलिसांचे म्हणणे आहे की, वाढदिवस साजरा करण्यासाठी २० हून अधिक गाड्यांनी रस्ता अडवत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या रस्त्यावर वाढदिवस साजरा केला जात होता तो लखऊनमधील एक पॉश परिसर आहे, तेथे इकना स्टेडियमदेखील आहे.
व्हायरल व्हिडीओवर अतिरिक्त पोलिस उपायुक्त शशांक सिंह म्हणाले, “व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शहीद पथावरील दोन मॉलमधील सर्व्हिस लेनमध्ये २०-२५ गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत. हे लोक वाढदिवस साजरा करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित तरुणांवर विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी कारच्या नंबर प्लेटवरून काही लोकांची ओळख पटवली आहे, तर इतर लोकांचीही ओळख पटवली जात आहे.
एडीसीपी शशांक सिंह यांनी सांगितले की, आयपीसी कलम २८३ (सार्वजनिक मार्गात अडथळा आणणे), मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आणि पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमल्यास नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
