एके दिवशी कोणालाही न सांगता ते घरातून निघून गेले. कुटुंबियांनी खूप शोधाशोध केली. १९७८ मध्ये त्यांना कुटुंबियांनी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर ते कुठे गेले, त्यांचं काही बरं वाईट तर नाही ना झालं या विचारात कुटुंबियानं ४० वर्षे काढली. अखेर व्हायरल झालेल्या एका यूट्युब व्हिडिओमुळे त्यांची आणि कुटुंबियांची भेट झाली. अगदी चित्रपटाच्या कथानकाला साजेशी अशी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली ती खोंद्राम गंभीर सिंग यांच्यासोबत.

वाचा : सोन्याचे बूट, सोन्याची टाय नवरदेवाचा लग्नात राजेशाही थाट!

मुळचे इंफाळ येथे राहणारे सिंग ४० वर्षांपासून बेपत्ता होते. एका वेबसाईटच्या माहितीनुसार त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. भावंडांसोबतही त्यांचे सतत खटके उडत होते. यातून दु:खी झालेल्या सिंग यांनी एकेदिवशी न सांगता घर सोडलं. त्यानंतर ते कोणालाच दिसले नाही. त्यांचं पुढे काय झालं हे घरच्यांना कधीच समजलं नाही. त्यांच्या भावंडांनी त्यांच्या परतीची आशा सोडून दिली होती. अखेर एका व्हायरल व्हिडिओद्वारे कुटुंबियांना त्यांचा पत्ता सापडला.

वाचा : मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकर, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधल्या एक फॅशन डिझायनरनं वर्षभरापूर्वी सिंग यांचा व्हिडिओ आपल्या यूट्युब चॅनेलवर शेअर केला. सिंग हे वांद्रे परिसरात भटकायचे. कधी कधी हिंदीत गाणं गायचे. त्यांना लहान मुलं नेपाळी म्हणून हिणवायचे. सतरा वर्षे ते सैन्यात होते. वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर ते वयाच्या ३४ वर्षी आपल्या गावी परतले. गावचं घर सोडून आल्यानंतर मुंबईत त्यांनी मिळेल ते काम करायला सुरूवात केली. रस्त्यावर भटकणाऱ्या सिंग यांना कधीतरी घरी जायला मिळेल एवढीच आशा या फॅशन डिझायरनला होती. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं. सिंग यांच्या कुटुंबियांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला. इंफाळ पोलिसांच्या मदतीनं त्यांचं कुटुंबिय सिंग यांच्यापर्यंत पोहोचलं.