Trending News Today: कर्मचाऱ्यांना कामात रस वाढावा यासाठी अनेक कंपनींमध्ये बोनसचे प्रयोग केले जातात पण साधारण यातून कर्मचाऱ्यांना वैयक्तिक काही फायदा होतो का याकडे दुर्लक्ष होते. मात्र ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी Zerodha द्वारे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन फिटनेस चॅलेंज सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल १० लाख रुपये जिंकता येणार आहे. सीईओ नितीन कामथ यांच्या मते, हे आव्हान पूर्ण केल्याने कामगारांना फिटनेस राखण्यात प्रोत्साहन मिळेल आणि एक भाग्यवान कर्मचारी १० लाख रुपये जिंकू शकेल.

झेरोधाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांच्या माहितीनुसार, या आव्हानामध्ये दररोज किमान ३५० कॅलरी बर्न करायचे टार्गेट आहे. कंपनीच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन ध्येय निश्चित करून ते पूर्ण झाल्याची माहिती द्यावी लागेल.

23 वर्षीय भारतीय तरुणाला जागतिक बँकेत नोकरीची ऑफर; ना ऑनलाईन अर्ज ना वशिला उलट ‘हा’ मार्ग निवडला

झेरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये सांगितले की, “पुढील वर्षभरात ९०% दिवसांमध्ये जो कोणी दिलेले ध्येय पूर्ण करेल त्याला बोनस म्हणून एक महिन्याचा पगार मिळेल. जे कर्मचारी २५ दिवसांचे ध्येय पूर्ण करतील त्यांना अर्ध्या महिन्याच्या पगाराइतका बोनस मिळेल. याशिवाय या उपक्रमाच्या शेवटी एक लकी ड्रॉ आयोजित करण्यात येईल ज्यामध्ये १० लाखाचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.”

आमच्यापैकी बहुतेकजण WFH आहेत, नेहमीच बसून काम करणे हे धूम्रपान करण्याइतकेच धोकादायक आहे. घरून काम करताना कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे असे कामथ यांनी म्हंटले आहे.

(फोटो: स्क्रिनशॉट/ Linkedin)

कामथ पुढे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, “करोनानंतर माझ्या सुरुवातीच्या वजनात वाढ झाल्यापासून, ट्रॅकिंग अ‍ॅक्टिव्हिटी ऍपच्या माध्यमातून मी वजन कमी करण्याचे ध्येय ठेवले. आहाराबाबतही अधिक जागरूक राहणे सुरु केले तसेच हळुहळू दैनंदिन उद्दिष्ट 1000 कॅलरीज बर्न करण्यापर्यंत वाढवले.” कामथ यांनी या पोस्टसह आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते.