News Flash

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा

या वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे.

हिंदू धर्म ‘किताबी’ नाही. त्याला एकच एक धर्मग्रंथ नाही. वेद, उपनिषदे, इतिहास, ब्राह्मणे, पुराणे, भगवद्गीता हे आणि असे सर्वच ग्रंथ हे हिंदूंचे धर्मग्रंथ. त्यात पुन्हा तंत्राधिष्ठित आगमही आले. यातही मौज अशी, की हे सर्व धर्मग्रंथ मानणारे जसे हिंदू असतात, तसेच ते न मानणारेही हिंदू असतात. वैदिक जसे हिंदू असतात तसेच अवैदिकही. हिंदूंमधील बहुसंख्य लोकांचे काम या ग्रंथांविना चालू शकते, चाललेले आहे. या ग्रंथांमध्ये वेद सर्वात महत्त्वाचे. कारण ते अपौरुषेय मानले जातात. ते श्रुतींमध्ये मोडतात. त्यांना कोणी रचयिता नाही. ते ऋषींना दिसले, त्यांनी ते नोंदवून ठेवले, अशी धार्मिक मान्यता आहे. हे वेद हाच सनातन हिंदू धर्माचा आधार असल्याची कल्पना आहे. हजारो वर्षे लोक ही समजूत बाळगून आहेत. आजही ती श्रद्धा आहे. तशीच ती सतराव्या शतकातही होती. सनातन वैदिक आर्यधर्म ही हिंदूंमधील प्रमुख धारा होती आणि वेदप्रामाण्य हा त्याचा आधार होता.
या वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे. त्यात पौराहित्याचे सर्व कर्म आणि पुरोहितांच्या संरक्षणाच्या सोयी आहेत. या कल्पाचे तीन भाग असतात. गृह्य़सूत्र, श्रौतसूत्र आणि धर्मसूत्रे. सर्वसाधारणत: गृह्य़सूत्रात घरगुती धर्मकृत्ये, संस्कार यांची माहिती असते. श्रौतसूत्रात सार्वजनिक यज्ञयागांचे विवेचन असते. आणि धर्मसूत्रांत इहलौकिक आचारविचार, पाप-पुण्य, न्याय-अन्याय अशा गोष्टी येतात. मनुस्मृती हा याच धर्मसूत्रांचा भाग. हा हिंदूंचा कायदा सांगणारा ग्रंथ. इ. स. २०० ते ३०० या कालखंडातील. तोही पुन्हा धर्माचा आधार वेद हाच असल्याचे सांगतो. आता कोणत्याही काळात मनुस्मृतीचा कायदा जसाच्या तसा लागू होणे व्यवहारत: शक्य नव्हते. पण मनुने सांगितलेली विषमता हा मात्र सगळ्याच सामाजिक व्यवहारांचा पाया होता. या विषमतेच्या व्यवहाराला, चातुर्वण्र्याला वेदांचे समर्थन होते. या सनातन वैदिक धर्माचे एकंदर स्वरूप आधार वेदांचा, व्यवहार पौराण धर्माचा आणि सामाजिक कायद्यात अंतिम शब्द मनुस्मृतीचा असे होते. वस्तुत: सर्व देशभर हिंदूंचा जो कायदा प्रचलित आहे तो बाराव्या शतकात विज्ञानेश्वराने लिहिलेल्या ‘मिताक्षरा’ या ग्रंथावर आधारलेला आहे. याशिवाय जिमूतवाहनाच्या ‘दायभाग’ या टीकाग्रंथावरील एक कायदा आहे. तो बंगाल, आसामात लागू होता. हे दोन्ही टीकाग्रंथ याज्ञवल्क्यस्मृतीवरील आहेत. पण या स्मृतीलाही आधार घेतला जातो तो अखेरीस मनुस्मृतीचाच.
हा श्रुती-स्मृती-पुराणोक्त धर्म तुकोबांच्या काळात पुन्हा प्रबळ बनू लागलेला होता. तुकारामांचा खरा लढा या सनातन वैदिक धर्मातून येणाऱ्या विषमतेच्या विरोधात होता. वेदप्रामाण्याविरोधात येथे गौतम बुद्ध, महावीर, चक्रधरस्वामी यांसारख्या अनेक महामानवांनी बंड पुकारले होते. तुकाराम हे त्याच परंपरेचे वारसदार होते. ‘धर्मरक्षणासाठी करणे आटी आम्हांसी’ असे सांगतच ते वेदप्रामाण्याला आव्हान देत होते. सनातनी वैदिक ब्राह्मणांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पीठ जे पैठण- त्याला सोळाव्या शतकात संत एकनाथांनी हादरे दिले होते. त्यांच्यानंतर अवघ्या नऊ वर्षांनी जन्मलेल्या तुकारामांनी पुन्हा एकदा त्या पीठाचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. वेदपाठ करणाऱ्या ब्राह्मणांना त्याचा अर्थच कळत नाही आणि इतरांना तर वेदश्रवण-पठणाचा अधिकारच नाही. ‘वेदाचें गव्हर न कळे पाठकां। अधिकार लोकां नाही येरा’ असे ते सांगत होते. हे वैदिक ब्राह्मण म्हणजे निव्वळ हमाल. धनाने भरलेला हंडा घेऊन जाणाऱ्या मजुराला जसा आतील धनाचा लाभ नसतो, नुसत्याच पाहणाऱ्याला जशी खाण्याची गोडी अनुभवता येत नसते, तसेच त्यांचे. अशी टीका करत असतानाच तुकोबा आत्मविश्वासाने सांगत होते- वेदाचा अर्थ त्या भारवाहकांना नव्हे, तर केवळ आम्हालाच ठाऊक आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।’
मग वेदाचा खरा अर्थ काय आहे? तुकोबा सांगतात..
‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।’
वेदांनी अनेक विषय सांगितले आहेत. पण त्यांचा मुख्य अर्थ हाच की, विठ्ठलाला शरण जाऊन निजनिष्ठेने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा, अठरा पुराणांचा हाच सारांश आहे, सिद्धान्त आहे. याही पुढे जाऊन ते म्हणतात- विठ्ठल हा शास्त्रांचे सार आहे, वेदांची मूर्ती आहे. आणि तोच आमचा सांगाती, प्राणसखा आहे.
‘म्हणऊनि नाही आणिकांचा पांग।
सर्व झालें सांग नामें एका।।’
विठ्ठलाच्या नावातच सगळा वेदांचा अर्थ आहे, असे सांगून तुकोबा वेदप्रामाण्यावर आधारलेल्या सनातन वैदिक धर्माला धक्का देत आहेत. ‘नेणती वेद श्रुती कोणी। आम्हां भाविकांवाचूनि।।’ असे म्हणत ते ब्राह्मणांच्या अधिकारांनाही आव्हान देत आहेत. वेदांचा बोल ऐकण्याचाही अधिकार ज्या वैश्य, शूद्र, चांडाळांना नाही, त्यांच्यापुढे ते हा नवाच वेदार्थ ठेवत आहेत.
‘सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। ’
पंढरीचा हा जो स्वामी आहे तोच सकळ शास्त्रांचे सार आहे. वेदांचाही मुख्यार्थ तोच आहे. सर्व वर्णीयांना, आबालवृद्धांना, स्त्री-पुरुषांना, एवढेच काय- चांडाळ आणि कसबिणींनाही त्याच्या भक्तीचा अधिकार आहे असे ठामपणे ते सांगत आहेत. एवढेच नव्हे, तर चातुर्वण्र्याचे समर्थन करणाऱ्या धर्माला एकीकडे ‘समर्थासी नाही वर्णावर्ण भेद’ असे बजावत आहेत, तर दुसरीकडे वेदअभिमानी ब्राह्मणांना ‘शूद्रवंशी जन्मलो। म्हणोनि दंभे मोकलिलो’, ‘बरें देवा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो’ अशी चपराक देत आहेत.
वर्णभेद, जातिभेद, त्यातून आलेली पुरोहितशाही यांना हा असा रांगडा विरोध हा तुकोबांच्या संघर्षांचा केंद्रबिंदू आहे. आता हा विरोध केवळ चंद्रभागेच्या वाळवंटापुरताच मर्यादित आहे, अध्यात्माच्या क्षेत्रापुरताच सीमित आहे; तो सामाजिक पातळीवर नाही, असे म्हणणे सोपे आहे. पण ज्या समाजात शतकानुशतके सर्वच पातळ्यांवर अत्यंत खोलवर चातुर्वण्र्य व्यवस्था रुजलेली आहे, जिच्या समर्थनार्थ सगळे धर्मग्रंथ उभे आहेत, धार्मिक कायदा जिच्या बाजूला आहे, त्या व्यवस्थेला त्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रापुरता का होईना, विरोध करणे हे किती कठीण काम होते, हे पुढे खुद्द तुकोबांनाच जे सहन करावे लागले त्यावरून सहज लक्षात यावे. दुसरी बाब म्हणजे अध्यात्मातील समतेच्या पुरस्काराने विषमतेचे समर्थक जर एवढे संतापत असतील, तर त्या समतापुरस्काराचा परिणाम अध्यात्म क्षेत्रापुरताच मर्यादित होता असे तरी कसे म्हणता येईल? तरीही न डगमगता त्यांनी हे वेदाधारित पाखांड मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना जोड होती अभ्यासाची, नैतिकतेची, आत्मविश्वासाची. ते म्हणतात, वेदान्त वेदान्त तुम्ही आम्हाला काय सांगता? ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ कारण-
‘तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते।
स्वयंभू आइते केले नव्हों।।’
आम्ही साधेसुधे नाही, तर विधीचे बाप आहोत! आम्ही स्वत:सिद्ध आहोत!!
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 1:01 am

Web Title: hindu religion
टॅग : Hinduism
Next Stories
1 ऐसे कैसे झाले भोंदू
2 तेणे जन नाडिले..
3 जिवासी उदार जालो आता
Just Now!
X