News Flash

घोंटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं!

तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे

एका शूद्र, ज्याला वेद पठनाचा अधिकार नाही (घोकाया अक्षर मज नाहीं अधिकार), तो जेव्हा ‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा,’ असे म्हणतो, तेव्हा त्या कृत्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे आजच्या काळात समजणे तसे कठीणच. वेदांच्या विरोधातील अशी बंडे आधी झाली नव्हती असे नाही. त्या सर्वात लोकायतांचे वा बार्हस्पत्यांचे बंड सर्वात मोठे होते. त्यांनी तर ‘त्रयो वेदस्य कर्तार:। भण्ड धूर्त निशाचरा:’ म्हणजे तिन्ही वेदांचे कर्ते हे धूर्त, ढोंगी, लोकापहार करणारे आहेत. एवढेच नव्हे, तर-
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुंठनम्।
बुद्धिपौरुषहीनानां जीविकेति बृहस्पति:।।
म्हणजे वेदोक्त धर्म, त्यातील कर्मकांडे ही निर्बुद्ध आणि पौरुषहीन यांच्या उपजीविकेची साधने असल्याचे बृहस्पतीचे (हा बृहस्पती म्हणजे चार्वाकदर्शनाचा संस्थापक) मत आहे, असे सांगून वेदप्रामाण्याच्या चिंधडय़ा केल्या होत्या. त्याचा परिणाम पुढे असा झाला की हे जडवादी चिंतन पाखंडमत म्हणून धिक्कारण्यात आले. आज त्या दर्शनाचा एकही मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही. अपवाद फक्त ‘तत्त्वोपप्लवसिंह’ हा जयराशिभट्ट यांचा ग्रंथ. ‘तुमचेनि मुंगी रांड न होआवी’ (तुमच्या हातून मुंगीलाही वैधव्य येता कामा नये) असा अहिंसेचा संदेश देणाऱ्या, ‘उत्तम भणिजे ब्राह्मण : आन आधम भणिजे मातंग : ऐसे म्हणे : परी तोही मनुष्य देहची : परिवृथा कल्पना करी :’ असे परिवर्तनवादी विचार मांडून धर्माधिष्ठित विषमतेच्या मुळावर घाव घालणाऱ्या चक्रधरांचेही उदाहरण येथे घेता येईल. त्यांच्यावर या महाराष्ट्रात दोनदा विषप्रयोग करण्यात आले होते. पैठण येथे यंत्रासनावर बसवून ठार मारण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रयत्न करणारे होते यादवांचे प्रधानमंत्री पंडित हेमाद्री, राजगुरू ब्रह्मसानु आदी वैदिक चातुर्वण्य व्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते. कारण काय तर, ‘आता हे आमुचा मार्ग उच्छेदिती’ ही भीती. याच महाराष्ट्रात सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या माता-पित्याला धर्माच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त केले होते. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार बालकांचा छळ केला होता. हा अवघा इतिहास तुकारामांच्या समोर होता. त्याचप्रमाणे वेदांना कृपण म्हणणारे (वेदु संपन्न होय ठायीं। परि कृपणु ऐसा आनु नाही।), त्यांना ईश्वराच्या घोरण्याची उपमा देणारे (हा वेदार्थसागरू। जया निद्रिताचा घोरू।), वेद काय रेडाही बोलू शकतो हे दाखविणारे ज्ञानेश्वर वेदांचा ‘नाही श्रुतिपरौती। माऊली जगी।’ असा गौरवही करीत होते. हाही इतिहास तुकारामांच्या समोर होता. आणि तरीही ते वेदांच्या विरोधात हाती शब्दांचिच शस्त्रे घेऊन ठाम उभे राहिले होते. याचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे.
तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आज स्वत:स वारकरी म्हणवून घेणारे वारकऱ्यांचे पीठाधीश आणि मठाधीपती जी परंपरा सांगतात ती मात्र ही नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये सनातन वैदिक धर्मप्रणीत चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थन सरसहा आढळेल. ‘सांगे शूद्रघरी आघवी। पक्वान्नें आहाति बरवीं। तीं द्विजें केवीं सेवावीं। दुर्बळु जरी जाहला।’ अशा नाना ओव्या सांगता येतील. परंतु याच व्यवस्थेला अध्यात्माच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरीने छेदही दिला आहे आणि ‘हा वेदार्थसागरू। जया निद्रिताचा घोरू। तो स्वयें सर्वेश्वरू। प्रत्यक्ष अनुवादला।।’ या ओवीतून वेदांपेक्षा गीता श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादनही केले आहे. वेदांच्या श्रवण, अध्ययनापासून कित्येक मैल दूर असणाऱ्यांची सोय लावण्यासाठी व्यासांनी भगवद्गीता रचली, अशी ज्ञानदेवांची भूमिका आहे आणि त्यातूनच त्यांनी गीतेवरील भाष्य रचले. स्त्री, शूद्रांना ब्रह्मज्ञान खुले केले. वैदिक धर्म वाचविण्याकरिता ज्ञानेश्वरांनी केलेले हे अवैदिक वर्तनच. आयुष्याच्या अखेरीस ज्ञानोबा चोखा, महार, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव महाराज यांच्यासोबत भोजन करतात हेही एक बंडच होते. इ.स. ११९६मध्ये ज्ञानोबांनी समाधी घेतली. त्यानंतर चार शतकांनी एकनाथ येतात. त्यांचा जन्म इ.स. १५३२ मधला. ते एकीकडे ‘वेदबळे वर्णाश्रम। नीज स्वधर्म चालविती’ असे सांगत आहेत. ‘एका जनार्दनी ब्राह्मणांची पूजा। चुकवील खेपा संसारीच्या।’ असे म्हणत आहेत आणि त्याच वेळी ‘आम्ही ब्राह्मण अनुष्ठानी। नित्य गांजा सुरापानी।। आम्ही करितों नित्य स्नान। वरवर धुतों अंतरीं बकध्यान।।’ असे कोरडेही ओढत आहेत. दुसरीकडे महाराच्या मुलाला कडेवर उचलून घेत आहेत, त्यांच्या घरी भोजन करीत आहेत. वारकरी संप्रदायाने चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक समतेचा घोष केला, त्याला ही अशी सामाजिक जीवनातील कृतीची जोड लाभलेली आहे. ही वारकऱ्यांची परंपरा. तुकोबांचे वेदांविरोधातील बंड या परंपरेतून आलेले आहे. परंतु-
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा।
ओळखा जातीचा अंत्यज तो।।
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण।
श्रेष्ठाचें वचन न मनी जो।।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवों नये।।
म्हणजे अति वितंडवाद करणारा शुद्ध बीजाचा नसतो. तो जातीने अंत्यज आहे असे समजा. तो वेद, उपनिषदे आदींचे प्रमाण मानत नाही. तो श्रेष्ठांची वचने मानत नाही. जसे मद्यपानाबरोबरचे मिष्टान्न, तसाच तो दुर्जन. त्याला शिवू नये असेही तुकोबा सांगत आहेत. यातून तर ते वेदांचे प्रामाण्यच सांगत आहेत. मग त्यांना वेदविरोधी कसे म्हणायचे, असा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर तुकोबांच्या एका वचनात येते-
‘गाळुनिया भेद। प्रमाण तो ऐसा वेद।।’
भेदभावाचा भाग गाळला की उरलेला वेद आम्हाला प्रमाण आहे असे तुकोबा सांगतात. हा उरलेला वेद कसा आहे? ‘वेदाचा तो अर्थ’ तुकोबांनी कसा लावलेला आहे? ते सांगतात-
वेद अनंत बोलिला।
अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें।
निजनिष्ठा नाम गावें।।
आणि वर पुन्हा वेदांचा अधिकार असलेल्या ब्रह्मवृंदांना तरी वेदांचा अर्थ किती कळतो, असा प्रश्न उभा करतात. –
ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि।
पाहा श्रुतीमधीं विचारूनि।।
जयासी नावडे हरिनामकीर्तन।
आणिक नर्तन वैष्णवांचे।।
सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार।
मातेशीं वेव्हार अंत्यजाचा।।
ज्याला हरिनामकीर्तन आवडत नाही, तो ब्राह्मण नाहीच. श्रुतींमध्ये हेच म्हटले आहे! येथे अवघा वेदार्थच ते उलटा-पालटा करीत आहेत. हे करताना ते येथील वेदप्रामाण्यवादी धर्मरचनेलाच आव्हान देत असतात.
हा सनातन वैदिक धर्मविचार व्यवहारात पुरोहित वर्गाच्या हातातील शोषणाचे यंत्र असतो, हे तुकोबा अनुभवत होते. त्या विचाराला आणि व्यवस्थेलाच त्यांनी सरळसरळ आव्हान दिले होते आणि ते आव्हान लोकप्रिय होत होते. तिकडे समर्थ रामदास ‘गुरुत्व आले नीच याती। काही येक वाढली महंती। शूद्र आचार बुडविती। ब्राह्मणाचा’ अशी व्यथा मांडत होते आणि इकडे काही ब्राह्मणच तुकोबांच्या भजनी लागल्याचे दिसत होते.
येथील पुरोहितशाहीला हा ‘धर्मद्रोह’ सहन होणे शक्यच नव्हते. आणि तुकोबा तर, ‘घोंटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं।’ मी असे रसपूर्ण कीर्तन करीन की त्याने ब्रह्मज्ञान्यालाही लाळ घोटावयास लावीन असे सांगत होते. अक्षर घोकण्याचाही अधिकार नसलेल्या शूद्राचे हे बंड. ते चिरडणे हे आता पुरोहितशाहीचे ‘धर्मकार्य’ बनले होते. पुरोहितशाहीची परशू तुकोबांवर कोसळणार होती..
तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 1:36 am

Web Title: history of sant tukaram
टॅग : Sant Tukaram
Next Stories
1 वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा
2 ऐसे कैसे झाले भोंदू
3 तेणे जन नाडिले..
Just Now!
X