‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू.. निराश्रितांना हृदयी धरतो तो साधू.. आपल्या नोकरांवर पुत्रवत प्रेम करतो तो साधू..’ ही तुकोबांनी सांगितलेली साधु-संतांची व्याख्या. साधीच. पण असे साधू दिवा लावूनही दिसणे कठीण- ही आजची गत. सतराव्या शतकातही याहून वेगळी अवस्था नव्हती. बुवाबाजीचा टारफुला तसा कोणत्याही भूमीत तरारतो. भूमी दारिद्य्राची, वेदनेची, भुकेची असो की श्रीमंतीची, ऐश्वर्याची असो- असमाधान, असुरक्षितता, भयादी भावना तेथे वस्तीला असतातच. सर्वानाच त्यातून सुटका हवी असते. त्या सुटकेचे मार्ग सांगणारे धर्माच्या हाटात दुकाने मांडून असतातच. धर्माच्या नावाखाली धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून हे तथाकथित साधू, संत, बाबा, महाराज स्वत:च्या तुंबडय़ा तेवढय़ा भरत असतात. तुकोबांच्या काळातही अशा भिन्नपंथीय बाबा-बुवांची बंडे माजलेली होतीच. तुकोबा हे काही भारतभर फिरलेले नाहीत. त्यांचा वावर प्रामुख्याने देहू, लोहगाव असा मावळातला. मीठ वगैरे नेण्यासाठी ते कधी कोकणात पेण-पनवेलकडे उतरत असत असे सांगतात. तेव्हा भ्रमंती अशी फार नाहीच. पण त्यांच्याकडे दृष्टी होती. आणि त्या दृष्टीला पडत होते ते चित्र बुवाबाजीचा बुजबुजाट झालेल्या ‘आणिक पाखांडे असती उदंडें’ अशा समाजाचे होते.
चार ग्रंथ वाचायचे. चार मंत्र म्हणायचे. भगवी, सफेद, काळी, पिवळी वस्त्रे पांघरायची. आध्यात्मिक गडबडगुंडा करायचा. चमत्कार दाखवायचे आणि जन नाडायचे हाच या भोंदू संतांचा उद्योग. पण त्यावर त्यांनी इतका धार्मिक मुलामा चढविलेला असतो, की त्यांच्याविरोधात आवाज काढणाराच देव आणि धर्मद्रोही ठरण्याची शक्यता. पण तुकाराम त्याची पर्वा करणारांतले नाहीत. त्यांनी शाक्तांवर आसूड ओढले, तसेच ते अन्य धर्मपंथांवरही तुटून पडले आहेत. त्यांनी ‘भगवी लुगडी’ नेसणाऱ्या, पण कदान्नाची निंदा करीत देवान्नाची इच्छा करणाऱ्या, विषयाच्या वासनेत बुडालेल्या आणि मान मिळवू पाहणाऱ्या संन्याशांची निंदा केली आहे. जटा वाढवून, कासोटा नेसून, सर्वागावर विभूतीलेपन करून मिष्टान्नाची आशा धरणाऱ्या संतांवर कोरडे ओढले आहेत. सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्माविरुद्ध हिंदूंचे महानुभावापासून वारकऱ्यांपर्यंत अनेक पंथ उभे राहिलेले आहेत. मत्स्येंद्र-गोरखप्रणीत नाथपंथ हा त्यातलाच एक अखिल हिंदुस्थानात पसरलेला पंथ. खुद्द ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ या पंथाचे. ‘विषयविध्वंसैकवीर’ अशा विशेषणाने ज्ञानदेव ज्यांचा गौरव करतात, त्या गोरक्षनाथांनी त्यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ यांची योगिनींच्या जाळ्यातून सुटका केल्याची कथा सांगितली जाते. मत्स्येंद्रनाथ वामाचारी कौलमताचे अनुयायी बनले होते. गोरक्षांनी त्यांना त्या मार्गापासून दूर आणले असा याचा अर्थ. शाक्त, कापालिक, वज्रयान, सहजयान या तंत्रसाधनांविरोधात गोरक्षनाथ उभे राहिले म्हणून ते ‘विषयविध्वंसैकवीर’ ठरले. पण पुढे नाथपंथात वामाचारी साधना शिरल्या. बा अवडंबराला महत्त्व आले. तेव्हा तुकोबांनी त्यांच्यावरही टीकेची झोड उठविली.
‘कान फाडूनियां मुद्रा तें घालिती। नाथ म्हणविती जगामाजीं।। घालोनिया फेरा मागती द्रव्यासी। परि शंकरासी नोळखती।। पोट भरावया शिकती उपाय। तुका म्हणे जाय नरकलोका।।’
अशा शब्दांत तुकोबा त्यांचा समाचार घेतात. अशा संतांची आणखी एक जात आपणास अलीकडे प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या निमित्ताने किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील धर्मविषयक चर्चामध्ये हटकून दिसते. तुकारामांनी त्यांच्याविषयी लिहून ठेवले आहे, की-
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
अशा भोंदूंबद्दल ते म्हणतात-
‘अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान।।
तुका म्हणे लंड। त्याचें हाणोनि फोडा तोंड।।’
अशाच प्रकारे त्यांनी मलंगांचाही धिक्कार केला आहे. हा इस्लाममधील सूफी दरवेशांचा एक संप्रदाय. त्यांच्याबद्दल तुकोबा लिहितात.. ‘कौडी कौडीसाठी फोडिताती शिर। काढूनि रुधीर मलंग ते।।’ चार पैशांसाठी डोके फोडून रक्त काढून दाखवतात. पण त्यांना त्यांचा स्वधर्म समजलेलाच नाही. महानुभाव, वीरशैव यांच्यावरही तुकारामांचे टीकास्त्र चाललेले आहे. महानुभावांबद्दल ते म्हणतात- ‘महानुभाव पंथाचे लोक हे दाढी आणि डोके यांचे मुंडन करतात. काळी वस्त्रे परिधान करतात. उफराटी काठी हातात घेऊन सर्वाना उपदेश करतात. बायका-मुलांना फसवून आपला वेश त्यांना देतात. अशा लोकांना यम शिक्षा करील.’
तुकोबा ही सगळी टीका करीत आहेत ती दोन स्तरीय आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. वारकरी संप्रदायाहून भिन्न असलेल्या धर्मपंथांचा ते उपहास करीत आहेतच, परंतु ते ‘ऐसे नाना वेश घेऊनी हिंडती। पोटासाठीं घेती परिग्रह।।’ म्हणजे असे नाना प्रकारचे वेश घेऊन हिंडणाऱ्या, पोटासाठी दान घेणाऱ्या भोंदू संत-महंतांचे वाभाडे काढीत आहेत. वाट्टेल ते कर्म करून स्वत:ला साधू म्हणविणारे, सर्वागाला राख लावून लोकांच्या नजरेआड पापकर्म करणारे, वैराग्य दाखवून विषयात लोळणारे असे भोंदू हे त्यांचे लक्ष्य आहेत. ते म्हणतात-
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।’
विविध कर्मकांडे, आचार, नवससायास यांतून लोकांच्या होत असलेल्या मानसिक आणि आर्थिक शोषणाबद्दलच्या रागातून आलेला हा विरोध आहे. ते म्हणतात-
‘द्रव्यइच्छेसाठी करितसे कथा। काय त्या पापिष्टा न मिळे खाया।। पोट पोसावया तोंडें बडबडी। नाहीं धडफुडी एक गोष्टी।।’
पैशासाठी जो धर्म सांगतो, तो पापी असतो. पोट भरण्यासाठी जो वृथा बडबड करतो, त्याच्याजवळ निश्चयात्मक अशी एकही गोष्ट नसते.. या शब्दांत ते आर्थिक शोषणाविरोधात बोलत आहेत. असा धर्माचा ‘लटिका वेव्हार’ करणाऱ्याची संभावना ते महाखर- महागाढव म्हणून करतात. त्याच्याबद्दल ‘तुका म्हणे तया काय व्याली रांड’ असा सवाल करतात. हा कळवळ्यातून आलेला संताप आहे. समाजात माजलेल्या अनाचाराविरोधातली चीड आहे. जेथे ‘दोष बळीवंत’ झाले आहेत, ‘पापाचिया मुळें’ ‘सत्याचे वाटोळे’ झाले आहे असा समाज त्यांच्या आजूबाजूला आहे. त्याविरोधातले हे नैतिक आंदोलन आहे.
पण त्यांच्या आयुष्यातील पाखंड-खंडनाची खरी लढाई आणखी वेगळीच होती. ती अधिक मोठी, अधिक व्यापक होती. अक्षरश: जीवन-मरणाची होती. कारण त्यांच्यासमोर उभा होता सनातन वैदिक धर्म. त्याविरोधात लढण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला होता. तो चक्रधरांनी केला होता. गोरक्षनाथांनी केला. नामदेवांनी केला होता. आता तुकाराम महाराज आपल्या भक्तीसामर्थ्यांनिशी त्याला धडक देत होते. प्रत्यक्ष वेदांनाच त्यांनी आव्हान दिले होते. संत बहिणाबाई तुकोबांना बुद्धाचा अवतार का मानतात त्याचे उत्तर या आव्हानात होते..
tulsi.ambile@gmail.com

Fry Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
सर्वांच्या आवडीची लग्नामध्ये पंगतीत वाढली जाणारी झणझणीत फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी; ही घ्या रेसिपी
तत्त्वबोध : साध्य आणि साधन
३४५. चार देह : २
गुरुपरंपरा : एक विचार