04 April 2020

News Flash

अवघें धरू सुपंथ!

ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते

तुकारामांसाठी धर्म, धार्मिकता हे केवळ मोक्षाचे साधन नव्हते. ते विरागी होते. ‘संसाराच्या तापे तापलो मी देवा। करिता या सेवा कुटुंबाची’ असे ते म्हणत होते. पुढे तर ‘जन वन आम्हां समानचि झालें।’ अशा वृत्तीला ते येऊन ठेपले होते. पण म्हणून त्यांनी भौतिक व्यवहारापासून नाते तोडलेले नव्हते. ते या जगाचेच संत होते. येथील माणसांबद्दल त्यांच्या काळजात कळवळा होता. धार्मिक शोषणाबद्दल मनात संताप होता. स्वत:तील चांगुलपणा वाढविणे आणि चांगला माणूस घडविणे हे त्यांच्यासमोरील ध्येय होते. तीच त्यांची धार्मिकता होती. म्हणूनच त्यांना त्या मोक्षात, ते जन्म-मरणाचे फेरे चुकविण्यात काडीचा रस नव्हता. ‘मोक्षाचे आम्हांसी नाही अवघड। तो असे उघड गाठोळीस।।’ असा आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता. परंतु ‘न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई सदा।।’ हे त्यांचे मागणे होते. ‘मोक्षपद तुच्छ केलें याकारणें। आम्हां जन्म घेणें युगायुगीं।।’ देवाने खुशाल त्यांना गर्भवासी घालावे, पुढचा जन्म द्यावा असे ते सांगत होते. तुकारामांना हवा होता तो संतसंग. चांगल्या माणसांची संगत. त्यांच्या त्या चांगुलपणाच्या व्याख्येत धार्मिक असणे हा महत्त्वाचा भाग होताच. ते स्वाभाविकच होते. धर्माआगळी नैतिकता असू शकते, धर्माचा आधार न घेता माणूस नीतिमान, प्रामाणिक असू शकतो, हा विचार तसा आधुनिकच. पण हिंदुस्थानच्या वैचारिक इतिहासात तो येऊन गेलेला आहे. चार्वाकांनी तो सांगितला आहे. खासकरून वैदिक धर्माने त्याची मोठी बदनामी करून तो नामशेष करण्याचा प्रयत्न केला असला, तरी हा विचार नष्ट होऊ  शकलेला नाही. एक खरे, की सतराव्या शतकात हा विचार तुकोबांपर्यंत येईल असे वातावरणच नव्हते. अशा परिस्थितीतही तुकोबा जेव्हा वेदांचा वेगळा अर्थ सांगून वेदद्रोह करतात, प्रसंगी ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनीं अनुभवावा।।’ किंवा ‘माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल।।’ असे म्हणतात, तेव्हा त्यांच्या वैचारिकतेची धाव अचंबित करून जाते. असे असले तरी ते धर्माच्या परिघातच नैतिकता मांडत होते. त्यातून धर्माचा चेहरा बदलू पाहत होते.

ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते. ‘अवगुणांचे हातीं। आहे अवघीच फजिती।।’ असे बजावत होते. ‘तुका म्हणे उचित जाणा। उगीं शीण काशाला।।’ असे दटावत होते.

तुकारामांचे हे ‘उचित’ म्हणजे काय, हे खरे तर समजून घेण्याची आवश्यकता आहे. या उचिताचा संबंध ना कोणत्या धर्माशी आहे, ना पंथाशी. त्याचा संबंध स्वत:च्या हिताशी आहे. तुकाराम सांगतात-

‘आपुलिया हिता जो असे जागता।

धन्य माता-पिता तयाचिया।।’

प्रश्न फक्त आपले हे हित ओळखण्याचा आहे. तुकारामांच्या मते हे हित, हे उचित व्यावहारिक नैतिक मूल्यांच्या पालनात आहे. त्यांचा साधाच सवाल होता-

‘पराविया नारी माउली समान। मानिलिया धन काय वेंचें।।

न करितां परनिंदा परद्रव्य अभिलास।

काय तुमचे यास वेंचे सांगा।।

खरें बोलता कोण लागती सायास।

काय वेचें यास ऐसे सांगा।।

तुका म्हणे देव जोडे याचसाठीं।

आणिक तें आटी न लगे कांहीं।।’

परस्त्रीला आईप्रमाणे मानण्यास पैसे लागतात काय? दुसऱ्याची निंदा न करण्यास, दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा न धरण्यास आपल्या खिशातली दमडी वेचावी लागते काय? तुकारामांचा या गोष्टींवर खूप कटाक्ष आहे. कदाचित परद्रव्य आणि परस्त्रीचा अपहार हा तेव्हाचा सामाजिक आजार असू शकेल. कारण तुकाराम ठिकठिकाणी त्याचा निषेध सांगत आहेत. ‘परद्रव्य परनारीचा अभिळास। तेथोनि हरास सर्व भाग्या।।’  या दोन गोष्टींमुळे तुमचे भाग्य लयाला जाईल असे ते सांगत आहेत. परस्त्रीबाबतचा त्यांचा हाच दृष्टिकोन पुढे शिवरायांच्या कारभारातही उठून दिसतो. याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही.

तर तुकारामांचे अध्यात्म हे असे व्यावहारिक आहे. देवाची प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी अन्य खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. केवळ चांगले वागणे त्यासाठी पुरेसे आहे असे ते सांगतात तेव्हा तो मोठा क्रांतिकारी विचार असतो, हे आजच्या काळात लक्षात येणार नाही. याच संदर्भात त्यांचा अन्य एक अभंग पाहण्यासारखा आहे.

‘एका पुरुषा दोघी नारी। पाप वसे त्याचे घरीं।।

पाप नलगे धुंडावें। लागेल तेणें तेथें जावें।।’

ज्या काळात बहुपत्नीत्व ही समाजमान्य रीत होती, त्या काळात तुकोबा हे सांगत होते! हे काळाच्या पुढचे पाहणे झाले! वैयक्तिक जीवनातील नैतिकता तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाऊ  शकते, त्यासाठी जप-तप-संन्यास घेण्याची, कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही, असा हा विचार होता. उचित, आपल्या हिताचे वागणे हेच माणसाला संतत्वाकडे घेऊन जाणारे आहे असे ते सांगत होते.

‘जें का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।’ हा सुप्रसिद्ध अभंग यादृष्टीने लक्षणीय आहे. समाजातील ‘नाही रे’ वर्गाला आपलेसे करण्यातच साधुत्व आहे, हा विचार एकनाथांनंतर तुकोबांनी मोठय़ा तीव्रतेने मांडला आहे. पुन्हा हे आपलेसे करणे केवळ अध्यात्मातील नाही. संतांच्या जातिभेदाविरोधातील लढाईला चंद्रभागेच्या वाळवंटाची मर्यादा होती, हे खरेच. पण अनेकदा त्यांनी ती मर्यादा ओलांडली आहे हे विसरता येणार नाही. ते जेव्हा ‘तुका म्हणे देवा। ताडण भेदकांची सेवा।।’ – म्हणजे भेदबुद्धीने देवभक्ती करणे ही भक्ती नाही, ते देवालाच मारणे आहे, असे म्हणतात तेव्हा ते केवळ अध्यात्मापुरते नसते. ‘दया करणें जे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी।।’ – म्हणजे आपल्या मुलांवर तुम्ही जसे प्रेम करता तसेच आपल्या दास-दासींवर करा, असे ते सांगतात तेव्हा तो विचार दैनंदिन जीवनातील माणुसकीचा असतो. व्यक्तीला व्यक्ती म्हणून आदर देण्याचा असतो.

‘क्षुधेलिया अन्न। द्यावें पात्र न विचारून।।

धर्म आहे वर्मा अंगी। कळलें पाहिजे प्रसंगी।।’

भुकेल्या माणसाची जात विचारू नका. त्याला अन्न द्या. यातच धर्म आहे हे समजून घ्या, हा विचार आजच्या अर्थाने जातिभेदाच्या विरोधातील नसेल; पण स्पृश्यास्पृश्यतेने ग्रासलेल्या तेव्हाच्या समाजाला जेव्हा तुकाराम हे सांगतात तेव्हा ते धार्मिक आचारांत मानवतेची मूल्येच रुजवू पाहत असतात. या प्रयत्नांना आधार म्हणून ते भक्तीमार्गाचे अद्वैत तत्त्वज्ञान घेतात.

‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।

भेदाभेदभ्रम अमंगळ।।

आइका जी तुम्ही भक्त भागवत।

कराल तें हित सत्य करा।।

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर।

वर्म सर्वेश्वर पूजनाचें।।

तुका म्हणे एका देहाचे अवयव।

सुख-दु:ख जीव भोग पावे।।’

सगळे विश्वच जर विष्णुमय आहे, तर तेथे भेदाभेद कसला पाळता? ते अमंगळ आहे. सगळे समाजाच्या एकाच देहाचे अवयव आहेत. कोणासही सुख-दु:ख झाले तर ते भोगणारा हा समाजच आहे, असे सांगत ते सामाजिक समतेचा विचार पेरीत होते.

तत्कालीन समाजाच्या धार्मिक जीवनाला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न होता. पण हा समाज अजूनही धार्मिक कर्मकांडांच्या जंजाळात अडकलेला होता. नाना धर्मपंथ, नाना संप्रदाय, त्यांची विविध दैवते यांचा बुजबुजाट झालेला होता. त्यामुळे समाजाची वीण उसवली होती.

‘न मिळती एका एक। जये नगरींचे लोक।।

भलीं तेथे राहूं नये। क्षणीं होईल न कळे काय।।’

ज्या समाजात एकात्मता नाही, तेथे भल्याने राहू नये. कारण अशा ठिकाणी कधी काय होईल हे सांगता येत नाही. याची जाणीव तुकोबांना होती. ‘एक एका साह्य़ करूं। अवघें धरू सुपंथ।।’ – एकमेकांना साह्य़ केल्याशिवाय सगळ्यांनाच चांगला मार्ग गवसणार नाही असे ते सांगत होते. असा सुपंथ धरायचा तर सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी दूर करणे भाग होते. पण ही विषमता फोफावली होती ती वैदिक वर्णाश्रमधर्मामुळे, त्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कर्मकांडांमुळे. चांगल्या माणसाच्या निर्मितीसाठी तुकोबांना या सर्व धार्मिक अंधश्रद्धांवर आघात करणे भागच होते..

तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 1:01 am

Web Title: spiritual quotes of tukaram
Next Stories
1 तुला राजी नाहीं तुका!
2 नाठय़ाळाचे काठी देऊं माथां..
3 तुका लोकी निराळा : आम्ही बळकट झालो फिराऊनि!
Just Now!
X