देहुतला तीस वर्षांचा तुकावाणी. त्याने जलदिव्य केले. कवित्व पाण्यात बुडविले. तेरा दिवस सत्याग्रह केला. अखेर ते कागद तरले. ते कसे हे गूढच आहे. तुकोबाही केवळ, विठ्ठलाने आपले ब्रीद खरे केले आणि कागद उदकी राखले, एवढेच सांगतात. बाकी मग त्यांना या प्रसंगाचे काहीही कौतुक नाही. त्यांनी ही गोष्ट कधीही, कोठेही मिरवल्याचे दिसत नाही. एके ठिकाणी ती सांगण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा त्यांनी, ‘केले नारायणें समाधान’, या तीन शब्दांत ती उडवून लावली आहे. तुकारामांना अशा चमत्कारांच्या कोंदणात बसविणाऱ्यांनी ही बाब नीटच समजून घेतली पाहिजे. पण स्वत:ला वारकरी म्हणवून घेणारेही तुकोबांच्या मोठेपणाचे गमक अशा प्रसंगांत शोधताना सापडतात म्हटल्यावर सतराव्या शतकाची तर गोष्टच सांगायला नको.
तुकोबांचे जलदिव्य यशस्वी झाल्याची बातमी लपून राहणार नव्हतीच. त्यांच्या कवित्वाची ख्यातीही यापूर्वीच सर्वत्र पसरली होती. पण आता त्याला या ‘चमत्कारा’ची जोड लाभली होती. सर्वत्र त्याचा बोभाटा झाला होता. बहिणाबाईंची गाथा म्हणजे तुकोबांचे समकालीन चरित्रच. बहिणाबाईंना १६४० मध्ये तुकोबांचा स्वप्नानुग्रह झाला. त्यावेळी त्या १२ वर्षांच्या होत्या. या वेळी त्या त्यांच्या पतीसमवेत कोल्हापुरात रहात होत्या. तेथे बहुधा जयरामस्वामी वडगावकर यांच्या कीर्तनातून त्यांनी तुकोबांची पदे ऐकली असावीत. त्या लिहितात- ‘पूर्वील हरिकथा आयकिल्या होत्या। त्या मनी मागुत्या आठवती।। तुकोबाची पदे अद्वैत प्रसिद्ध। त्यांचा अनुवाद चित्त झुरवी।।’ याचा अर्थ तोवर महाराष्ट्रात तुकोबांची पदे पसरली होती. ते ‘महाराष्ट्री शब्दांत’ सांगत असलेला ‘वेदांताचा अर्थ’ दूरदूरच्या मुलखात पोचला होता. बहिणाबाईंपर्यंत तर ‘तेरा दिवस ज्यानें वह्य उदकांत। घालोनीया सत्य वांचविल्या।।’ ही कहाणीही पोचली होती. आणि म्हणूनच असंख्य भाविकांसाठी आता तुकोबाच देव बनले होते.
‘बहिणी म्हणे लोक बोलती सकळ।
तुकया केवळ पांडुरंग।।’
ज्या रामेश्वरभट्टांमुळे तुकोबांना अभंगाच्या वह्य पाण्यात बुडवाव्या लागल्या होत्या, जे रामेश्वरभट्ट सनातन वैदिक धर्माच्या नावे त्यांना निखंदण्यास निघाले होते, तेही या प्रसंगानंतर त्यांचे भक्त बनले होते. गावात महादजीपंत कुलकर्णी, कोंडाजीपंत हे
ब्राह्मण तुकोबांचे चाहते होतेच. पुढे जाऊन तुकारामांच्या टाळकऱ्यांतही काही ब्राह्मण आढळतात. पण शूद्र म्हणून तुकोबांचा द्वेष करणारेही अनेक ब्राह्मण होते. त्यांना उद्देशून आता रामेश्वरभट्ट सांगू लागले होते-
‘म्हणे रामेश्वरभट द्विजा। तुका विष्णु नाही दुजा।।’
अर्थात उपाध्यांचे हे लचांड तुकोबांना मान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. आपणास देव मानणाऱ्या लोकांना त्यांनी झोडूनच काढले आहे. ‘लोक म्हणती मज देव। हा तो अधर्म उपाव।।’ असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. या सगळ्याचा त्यांना त्रासच होत होता. ते म्हणतात- ‘कोठें देवा आले अंगा थोरपण। बरें होतें दीन होतों तरी।।’ अन्य एका अभंगात ते म्हणतात –
‘नाही सुख मज नलगे हा मान। न राहे हें जन काय करूं।।
देह उपचारें पोळतसे अंग। विषतुल्य चांग मिष्टान्न तें।।
नाइकवे स्तुती वाणीतां थोरीव। होतो माझा जीव कासावीस।।
तुज पावे ऐसी सांग कांहीं कळा। नको मृगजळा गोवूं मज।।
तुका म्हणे आतां करीं माझे हित। काढावें जळत आगींतूनि।।’
हे तुकोबांचे मोठेपण! हे खऱ्या संतांचे लक्षण! आपली लोकप्रियता वाढावी, सत्संगाला अधिक गर्दी व्हावी, आपली संस्थाने स्थापन व्हावीत यासाठी लटपटी, खटपटी करतात ते संत नसतात. ते अध्यात्माच्या क्षेत्रातील ठग. तुकोबांना अशा लोकांचा, अशा प्रवृत्तीचा तिटकारा होता. लोकप्रियता, स्तुती हे मृगजळ. त्यात ते रमणारे नव्हते. पण आता त्यांच्या अनुयायांची, चाहत्यांची संख्या वाढत चालली होती. इंद्रायणीच्या वाळवंटी त्यांनी मांडलेल्या खेळात वैष्णवभाई मोठय़ा संख्येने सहभागी होऊ लागले होते. नामावळीचे पवित्र गाणे गात आनंदकल्लोळी नाचू लागले होते.
‘वर्णाभिमान विसरली याती। एक एकां लोटांगणीं जाती रे।।
निर्मळ चित्तें झालीं नवनीतें। पाषाणा पाझर सुटती रे।।
होतो जयजयकार गर्जत अंबर। मातले वैष्णव वीर रे।।’
असा तो सगळा अनुपम्य सोहळा सुरू झाला होता. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।’ हे त्या सोहळ्याचे विचारवैशिष्टय़ होते. तो जेवढा रंगत होता, तेवढा तुकोबांच्या विरोधातील सनातनी विचार गडद होत चालला होता. ‘कोणाही जिवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचें।।’ असे तुकाराम सांगत होते आणि कर्मठ वैदिक ब्राह्मण त्यांच्या मत्सराने मत्त झाले होते. तुकोबांचा छळ अखंड सुरू होता. त्यांच्या कीर्तनात विघ्ने आणली जात होती. अस त्रास दिला जात होता. तुकोबा म्हणतात-
‘न वजतां घरा। आम्ही कोणाच्या दातारा।।
कां हे छळूं येती लोक। दाटे बळेंचि कंटक।।
नाही आम्ही खात। काहीं कोणाचें लागत।।’
आम्ही काही कोणाच्या घरी जात नाही. कोणाचे काही खात नाही की कोणाचे काही लागत नाही. तरीही हे दातारा, हे दुर्जन आम्हाला बळेच छळायला का येत आहेत, हा तुकोबांचा सवाल आहे. अर्थ स्पष्ट आहे. तुकोबांच्या भजन-कीर्तनात घुसून लोक त्यांना त्रास देत होते. नाही नाही ते विचारून त्यांना भंडावून सोडत होते. भांडणे काढीत होते. तुकोबा म्हणतात-
‘पाखांडय़ांनी पाठी पुरविला दुमाला। तेथें मी विठ्ठला काय बोलों।।
कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी। आपण भिकारी अर्थ नेणें।।
न कळें ते मज पुसती छळूनी। लागता चरणीं न सोडिती।।
तुझ्या पायांविण दुजें नेणें काही। तूंचि सर्वाठायीं एक मज।।
तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा। किती बोलों भांडा वादकांशीं।।’
या पाखंडय़ांनी, धर्म न जाणणाऱ्यांनी माझी पाठच धरली आहे. नाही नाही ते विचारून छळत असतात. त्यांची वाचा का बंद पडत नाही? या अशा भांडखोरांशी मी काय बोलू?
दुसऱ्या एका अभंगात ते असाच प्रश्न करीत आहेत. अक्षरश: वैतागून विचारीत आहेत-
‘नावडे तरी कां येतील हे भांड। घेऊनिया तोंड काळें येथें।।’
हे बोलभांड होते तरी कोण? सरळ आहे. तुकोबांचे विचार ज्यांना पटत नव्हते, जे त्यांचा मत्सर करीत होते, द्वेष करीत होते, तेच हे लोक होते. त्यांत केवळ वैदिक ब्राह्मणच होते असे मानण्याचे कारण नाही. एक मात्र खरे, की त्या परंपरेचे पाईक असलेले सगळेच तुकोबांच्या विरोधात उभे होते. वैदिक परंपरावाद आणि ज्ञानोबा-तुकोबांचा सुधारणावाद असा हा संघर्ष होता. तो जसा आज आहे, तसाच तेव्हाही होता. त्यात तुकोबा ठामपणे उभे होते. लढत होते. पण कोणत्याही समाजात परंपरावाद्यांचे बळ नेहमीच मोठे असते. ‘अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय। व्याघ्रवाडां गाय सापडली।।’ असे तुकोबा म्हणतात ते उगाच नाही. जलदिव्याच्या संदर्भात तुकोबांनी लिहिलेल्या अभंगात ‘कोपला पाटील गावीचे हे लोक’ असा उल्लेख आहे. हे पाटील म्हणजे तावरे. त्यांच्यासारखे लोकही तुकोबांच्या पक्षात नव्हते, याचे कारण त्यांची धार्मिक परंपराग्रस्तता आणि व्यवस्था शरणता. तुकोबा आपल्या विचारांतून जो सुधारणावाद सांगत होते, तो तेव्हाच्या प्रस्थापित धार्मिक व्यवस्थेला धक्का
देणारा होता. त्या व्यवस्थेतील आर्थिक हितसंबंधांना हादरा देणारा होता. हे हितसंबंधी एकत्र येऊन तुकोबाप्रणीत नवी विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न करीत होते. रामेश्वरभट्टांनी तुकोबांचे अनुयायित्व पत्करल्यानंतर देहुत आता या विरोधकांचे नेतृत्व मंबाजीकडे होते..
तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com

youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?
slip stitch and stumble the untold story of india s financial sector reforms
बुकमार्क : ती वीसेक आणि आताची दहा वर्षे!