चॅनल्सच्या भाऊगर्दीत झी जिंदगीच्या रूपात कसदार असा आशय प्रेक्षकांना गवसलाय. चॅनलचं प्रमोशन अगदी बसस्टॉपपासून रेल्वे स्टेशनपर्यंत आणि पेपर, साइट सगळीकडे होत असतं. पण दोन वर्षांपूवी झी जिंदगी शांततेत दाखल झालं.

टीव्ही माध्यमाची ताकद मोठी आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागतं. तिकीट, खाणं-पिणं, प्रवास असा सगळा खर्च येतो. तुम्ही उच्च अभिरुचीवाले असालही परंतु चित्रपटगृहात आलेली अन्य मंडळी तशी असतीलच याची अजिबातच खात्री नाही. त्यामुळे शिटय़ा, टाळ्या, हुर्यो, पांचट विनोद गोंधळसदृश काहीही सुरू होऊ शकतं. बरं चित्रपट एकगठ्ठा असतो. तीन तासांत मॅटर संपतं. तुम्ही पायरसीचे समर्थक असाल तर मांडीसंगणकावर अर्थात लॅपटॉपवर वाट्टेल तो चित्रपट पाहता येतो. पण चित्रपटगृहाचा अनुभव त्यावर मिळू शकत नाही. बरं चित्रपट वनटाइम असल्याने त्यात काही वाढू शकत नाही किंवा कमीही होऊ शकत नाही. बदल, सुधारणा काहीच नाही. त्यामुळे चित्रपट या माध्यमाला मर्यादा आहेत. नाटक हा जिवंत रसरशीत अनुभव असतो. पण चित्रपटाप्रमाणे तिकीट, खाणं-पिणं, प्रवास हे मिळून नाटक हा बराच खर्चीक मामला होतो. आपल्याला हवं तेव्हा हवं ते नाटक जवळच्या नाटय़गृहात येत नाही. ते आलंच तर त्या वेळेला आपण मोकळे नसतो. बरं हे सगळं जुळून आलं तर बहुतांशी नाटय़गृहांची अवस्था भीषण वर्गात मोडणारी आहे. म्हणजे विकतचं दुखणं. बरं अनेकदा सांगूनही नाटय़रसिक मंडळी मोबाइल व्हायब्रेटवर किंवा सायलेंटवर ठेवत नाहीत. दुसरं जग जगणाऱ्या कलाकांराचा आणि ते समरसून पाहणाऱ्या कलाकारांचा रसभंग होतो. हे सगळं लक्षात घेतलं तर नाटक माध्यमाच्या मर्यादा समोर येतात. या दोघांच्या तुलनेत टीव्हीचे फायदे जास्त आहेत. एक तर घरात बसून निवांतपणे लोळून टीव्ही पाहता येतो. बरं कल्पनाटंचाईमुळे एखादा कार्यक्रम किमान सात वेळा तरी रिपिट दाखवतात. जेणेकरून आपल्या सोयीच्या वेळेला तो पाहता येतो. प्रत्येक वेळी टीव्हीवर काही पाहायचं असेल तर पैसे खर्च करावे लागत नाही. केबल किंवा डिशचे महिन्याला पैसे दिले की अगणित तास टीव्ही पाहता येतो.

टीव्ही पाहता पाहता अन्य कामंही होतात. खाता-पिताही येतं. शक्यतो टीव्हीच्या मैफलीत काही अडथळा येत नाही. आणि कसं वैैविध्य असतं- लहान मुलं कार्टून पाहतात, ज्येष्ठ नागरिक भक्तीरसमय कार्यक्रम पाहतात. मध्यमवयीन पुरुष बातम्या पाहतात. गृहिणी डेली सोपचं दळण पाहतात. मुलं स्पोर्ट्सपासून नेट जिओपर्यंत काहीही पाहतात. चित्रपट, कुकरी, गाणी, मालिका, टेलिशॉपिंग असा मोठ्ठा पसारा असतो टीव्हीचा. बऱ्याच घरांमध्ये चॅनेल कुठला लावायचा यावरून भांडणं होतात. पण तो विशेष गंभीर मुद्दा नाही. एवढे टीव्हीचे फायदे असले तरी सकस आणि पौष्टिक असं किती पाहायला मिळतं हा प्रश्न उरतोच. या मुद्दय़ावर टीव्ही बराच मागे पडतो. टीव्हीवरच्या सकस गोष्टी शोधण्यासाठी आमची शोधमोहीम सुरूच असते. साखरपुडा- लग्न-प्रेम भोवती मालिका केंद्रित असतात. अनोळखी स्त्री-पुरुष एकमेकांशी बोलले की बहुतांशी मालिकांत थेट लग्नाचा विचार सुरू होतो. स्टुडिओरूपी हायफाय व्हिलारूपी घर, बटबटीत मेकअप, डिझायनर साडय़ा परिधान करून वावरणारी माणसं, टवटवीत असूनही एकमेकांना सतत फ्रेश होऊन घे, इतपतच असणारी संवादांची मजल, आयुष्यात पोटापाण्यासाठी काहीही न करता घरातल्यांविरुद्ध कटकारस्थान रचणारी रिकामटेकडी माणसं या सगळ्याला तुम्ही कंटाळले असाल. बरं हे सोडून द्यावं तर नृत्याच्या नावाखाली उत्तान पोशाखात अंगविक्षेप करणारी मंडळी पाहावी लागतात. गाण्याच्या रिअ‍ॅलटी शोमध्येही गाणं कमी आणि परफॉर्मन्स जास्त असतो. गायक आणि गायिकांचे मेकओव्हर आणि परीक्षकांचे लटके राग आणि नौटंकी आता कॉमन झाले आहे. याच्या जोडीला आता दुकानदारी चॅनेल्सचं पेव फुटलं आहे. चॅनेल्सच्या भाऊगर्दीत कसदार असं शोधण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो. ‘झी जिंदगी’च्या रूपात आमच्या हाती नोंदणीय असं काही गवसलंय. आता झी म्हटलं की आक्रमक प्रमोशन ओघानं आलंच. बसस्टॉपपासून रेल्वे स्टेशनपर्यंत आणि पेपर, साइट सगळीकडे प्रमोशनाचा दणका असतो. पण दोन वर्षांपूवी झी जिंदगी शांततेत दाखल झालं. या चॅनेलचा ढाचाच वेगळा आहे. ‘हिंदी उर्दू मनोरंजन’ हे त्यांचे उद्दिष्ट आहे. ऐकायला वेगळं वाटतंय ना- पण खरं आहे. ‘जोडे दिलों को’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. मर्यादित कालावधीच्या म्हणजे अगदी बारा किंवा चौदा भागाच्या मालिका या चॅनेलवरून प्रक्षेपित होतात. आपल्या देशातल्या लोकांनी निर्मित्ती केलेल्या मालिका असतातच पण खरं इंगित पुढेच आहे. सीमेपलीकडच्या देशातलं म्हणजे पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तमधल्या उत्तम मालिका पाहायला मिळतात.

पाकिस्तानच्या टीव्हीविश्वातली औन झारा ही मालिका अवघ्या २० दिवसांत संपली. पाकिस्तानचे गायक आपल्याकडच्या चित्रपटात, मैफलीत गातात. त्यांचे हास्यकलाकार कॉमेडी शोमध्ये सहभागी होतात. पण तिथल्या मालिका कशा असतात, मालिकांचे विषय काय असतात, कोण कलाकार काम करतात याची उत्सुकता असते. जिंदगीच्या निमित्ताने सीमेपल्याडच्या टीव्ही कलाकृती घरबसल्या पाहण्याची संधी जिंदगीद्वारे सातत्याने मिळते आहे. प्रयोग करत राहायला हवेत या उक्तीवर विश्वास ठेवत जिंदगीवर अमेरिकेतल्या ‘सिम्पली ब्युटीफुल’ आणि ‘निमर्लाज स्पाइस वर्ल्ड’ हे दोन कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आले. शुक्रिया नावाचा रिअ‍ॅलिटी शोची संकल्पनाही अनोखी आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्य माणसांना सहभागी करून घेतात. आपल्यासारख्या माणसांना स्वत:च्या आयुष्याबद्दल, संघर्षांबद्दल बोलता येतं. अडचणीच्या काळात आधार देणाऱ्या माणसाला धन्यवाद देता येण्याचं व्यासपीठ म्हणजे हा कार्यक्रम. कटकारस्थानांनी भरलेल्या मालिकांमध्ये जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणारा हा कार्यक्रम दुर्मीळच म्हणायला हवा.

पाकिस्तानमधल्या टेलिफिल्म्स प्रक्षेपित करणारं जिंदगी पहिलंच चॅनेल आहे. दहशतवादाच्या मुद्दय़ावरून आपले आणि पाकिस्तानचे संबंध कायमच दुरावलेले असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी भावना उफाळून येतात. पाकिस्तानप्रति अर्वाच्य भाषेत बोललं की आपण देशाभिमानी झालो असा अनेकांचा गैरसमज आहे. इंटरनेट काळात पाहण्याची, वाचण्याची बंधनं झुगारून वाट्टेल ते पाहता येतं. पण पाकिस्तान म्हटलं की आपण एकदम दचकतो. दहशतवाद, हिंसा, युद्ध, शस्त्रं यांच्याशी पाकिस्तानचं नाव इतकं जोडलं गेलंय की त्यांच्या देशातली चांगली माणसं उत्तम कलाकृती तयार करू शकतात हा विचार आपल्या मनात येणं आणि रुजणं कठीण आहे. जिंदगीच्या निमित्ताने पाकिस्तानमधल्या कलासक्त मंडळींचं काम आपल्यासमोर येतंय. देशातली राजकीय अस्थिरता, लष्करी उठवा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, दहशतवाद्यांनी तळ केल्यामुळे जगभर होणारी नामुश्की अशा परिस्थितीतही पाकिस्तानचे कलाकार दर्जेदार कलाकृती निर्माण करत आहेत. पाकिस्तानचा एक वेगळाच चेहरा यानिमित्ताने आपल्यासमोर येतो आहे. उदारपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी या कलाकृतींकडे स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहणं आवश्यक आहे. प्रेम आणि लग्न सोडूनही विषय असतात आणि त्यावर आधारित सुरेख कलाकृती सादर करता येते याचा वस्तुपाठ पाकिस्तानच्या मालिका आणि टेलिफिल्म्सनी घालून दिला आहे.

आपल्याकडच्या एकसुरी कार्यक्रमांना कंटाळलेल्या प्रेक्षकांनी दोन वर्षांत पाकिस्तानच्या कार्यक्रमांना आपलंसं केलं आहे. उर्दूमिश्रित हिंदी, वेगळे विषय, उत्तम निर्मिती मूल्यं, दमदार पटकथा आणि संवाद, नवे चेहरे आणि मोजकेच भाग यामुळे पाकिस्तानच्या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. पाकिस्तानच्या नावाने ठणाणा करणाऱ्या देशभक्तांनी या कलाकृती आवर्जून पाहायला हव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही चांगलं काम करता येतं याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. पाकिस्तानच्या मालिका चॅनेलवर दाखवल्या तर काय प्रतिक्रिया उमटतील, अशी भीती जिंदगी चॅनेल मंडळींच्या मनात होती. मात्र प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांना हुरूप आला आणि एक वेगळा प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगाचा पुढचा टप्पा म्हणजे जिंदगीच्या झील फॉर युनिटी उपक्रमाअंतर्गत भारत आणि पाकिस्तानमधले चित्रपटकर्ते एकत्र येऊन १२ चित्रपट तयार करणार आहेत. यासाठी पाकिस्तानमधले नामवंत दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्याशी बोलणी झाली आहेत. मेहरीन जब्बर, सभिआ सुमर आणि मीनू फरिजाद यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांसमवेत बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांना घेऊन एकत्रित कलाकृती निर्माण होणार आहे. फाळणीला ७० वर्ष झाली. त्यानिमित्ताने या कलाकृतीचं दोन्ही देशांत प्रदर्शित व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आपल्या देशात असंख्य कलाकार आणि तंत्रज्ञ असताना शत्रुराष्ट्रातल्या कलाकारांच्या कलाकृती दाखवण्याचं काय कारण अशी टीकाही जिंदगी चॅनेलवर होते आहे. चाहत्यांच्या आग्रहाखातर ‘जिंदगी गुलझार है’ मालिका पुनप्र्रक्षेपित करावी लागली. आपल्यासारखी असणारं घरं आणि वावरणारी माणसं, आवश्यक तेवढाच मेकअप, चोख संहिता, मंजूळ असं पाश्र्वसंगीत, बोलीभाषेतले संवाद यामुळे पाकिस्तानमधल्या मालिकांना भारतात वाढता प्रतिसाद आहे. दरम्यान पाकिस्तान, फाळणी असे संवेदनशील मुद्दे असल्याने केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचं जिंदगीवर बारीक लक्ष आहे. फाळणीसंदर्भात कथानक असलेल्या ‘वक्त ने किया क्या हसीन सीतम’ मालिकेसाठी चॅनेलला नोटीस पाठवण्यात आली. पाकिस्तानधार्जिण्या गोष्टी प्रसारित केल्यामुळे ही कारवाई झाली.

आता प्रत्येकाची भूमिका, दृष्टिकोन वेगवेगळा. पाकिस्तान आपल्या देशातल्या दहशतवादाला खतपाणी घालतं. आपल्या सैनिकांवर सातत्याने हल्ले करणं, भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणं, देशात दहशतवादी संघटना वाढीस लागतील यासाठी तरुणांना चिथावणं या कारणांसाठी पाकिस्तान आपला थेट शत्रू आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक समीकरणांमुळे आपल्याला युद्धही करता येत नाही. युद्धाने होणारं नुकसान आपण पाहिलं आहे. पण म्हणून पाकिस्तानचे यच्चयावत नागरिक वाईट ठरत नाहीत. शांतता हवी आहे, दहशतवाद, हिंसा नको म्हणणारी माणसंही पाकिस्तानात आहेत. दुर्दैवाने त्यांचा आवाज समोर येऊ दिला जात नाही. जिंदगीच्या निमित्ताने पाकिस्तानमधल्या सकारात्मक गोष्टी दिसत आहेत.

कोणतीही कला तसंच कलाकृती आपलं मन रिझवतं. थोडय़ा वेळासाठी का होईना आपण दु:ख, वेदना विसरतो. ‘जिंदगी’ समरसून जगायची असेल तर सकस आणि पौष्टिक पुरवायलाच हवं. मालिका असो वा टेलिफिल्म- अल्पावधीसाठी आपली जिंदगी सुंदर होतेय. ते महत्त्वाचं!

response.lokprabha@expressindia.com