22 February 2020

News Flash

भविष्यवाणीचा उद्योग

प्रत्येक राशीच्या आधी बोधचिन्ह पडद्यावर येतं. राशीचं नाव खाली असतं.

हिंदी, इंग्रजी किंवा स्थानिक भाषा-वाहिनीचे धोरण काहीही असो, प्रतिसरकार असो की विरुद्ध सरकार- भविष्यवाणीचा कार्यक्रम ३६५ दिवस खपतो. आणि सकाळी काय दाखवायचं हा मोठा प्रश्नही सुटतो.

सकाळ होते. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. आन्हिकं उरकतो. सकाळी टीव्ही पाहायला कुणाला वेळ आहे असं म्हणतात; पण याच वेळी टीव्ही ऑन केला जातो. न्यूज चॅनल दिसू लागते किंवा लोकप्रिय मनोरंजन वाहिन्या असतात. दृष्टीचा ठाव घेणारं ग्राफिक्स, नादमय सिग्नेचर टय़ून वाजते आणि सात्त्विक चेहऱ्याचे सद्गृहस्थ बोलू लागतात. एकेक रास ते उलगडत जातात. या राशीच्या माणसांना आजचा दिवस कसा जाईल याचा तपशील ते सांगतात. पुरुष मंडळी, गृहिणी, नोकरदार वर्ग, लहान मुलं, वरिष्ठ नागरिक अशी प्रतवारी करून प्रत्येकाला आजच्या दिवसात काय वाढून ठेवलं आहे हे सांगितलं जातं. प्रत्येक राशीच्या आधी बोधचिन्ह पडद्यावर येतं. राशीचं नाव खाली असतं. खणखणीत आणि पक्कं मनात  ठसेल असं संगीत पाश्र्वभूमीवर वाजतं. १२ राशी आणि त्यांचे सविस्तर पृथक्करण असे हे स्वरूप.

कलियुग आणि टेक्नोयुगातही सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेल्या कार्यक्रमांमध्ये अग्रणी असणारी ही भविष्यवाणी. वृत्तवाहिन्या बातम्यांसाठी असतात. बातमीला रंग, रूप, जात, धर्म, पंथ, वंश यांचे बंधन नसते. बातमी निकोप असते. निखळ बातम्यांसाठी असणाऱ्या वाहिन्यांवर भविष्यवाणीचे कार्यक्रम नियमितपणे चालतात. भविष्य ही जाणून घेण्याची नव्हे तर घडवण्याची गोष्ट. मात्र माझ्या बाबतीत काय घडणार आहे. वाईट असेल तर ते टाळता येईल का हे कळण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असते. चांगलं होणार असेल तर आणखी चांगलं होण्यासाठी मंडळी आतुर असतात. ठाऊक नाही त्याबाबत जाणून घेण्यासाठी अहमहमिका असते. भविष्य हे शास्त्र आहे आणि त्याच वेळी त्याला अध्यात्माची जोड आहे. टीव्हीवरचे कार्यक्रम हे मनोरंजनासाठी असतात. प्रत्येक कार्यक्रमाचं एक ठोस कथानक असतं. पात्रं असतात, कथा पुढे सरकत राहते. मात्र भविष्यवाणीच्या कार्यक्रमाचे स्वरूपच प्रत्येकासाठी असल्याने त्याचा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. दैनंदिन मालिका आणि त्याची कथानकं यावर प्रेक्षकाचे कोणतेही नियंत्रण नसते. पडद्यावर समोर येईल ते पाहावे लागते. मात्र भविष्याचं तसं नाही. प्रत्येकासाठी काही ना काही या कार्यक्रमात असतं. बरं-वाईट सांगणारा माणूस योगी, साधुपुरुष किंवा तपस्वीसदृश असतो. त्याची साधना असते. तो एका राशीसाठी र्सवकष सांगतो. तुमच्या आयुष्याला लागू झालं तर उत्तम, नाही तर प्रत्येकाचं आयुष्य सापेक्ष असतं असं म्हणता येतं. शंभरापैकी २५ प्रेक्षकांना भविष्य सांगितल्याप्रमाणे घडलं तर विश्वासार्हता आणि लोकप्रियता वाढते. भविष्य जाणून मनुष्याला आगामी वाटचाल करायची असते. बरे-वाईट निर्णय घ्यायचे असतात. उन्नती करायची असते. पुढे काय होणार याचा थोडा अंदाज आला तरी त्यानुसार डावपेच आखणी करणारी मंडळी वाढत आहेत. बाकी मनोरंजन कार्यक्रमांना भरमसाट गुंतवणूक लागते. कथा हवी, पटकथा असणे अनिवार्य. नटमंडळी, सेटउभारणी, कास्टिंग, कॅमेरा, पोस्ट प्रॉडक्शन असे शेकडो व्याप असतात. एक मालिका म्हणजे मोठय़ा कुटुंबाप्रमाणे होते. जेवढा पैसा वाहिनीला किंवा प्रॉडक्शन हाऊसला ओतावा लागतो तेवढा पैसा परत मिळावा अशी माफक अपेक्षा प्रत्येकाची असते. अर्थात हे कार्यक्रमाच्या लोकप्रियतेवर आणि मिळणाऱ्या जाहिरातींवर अवलंबून असते. खूप मोठी साखळी असते. सगळ्यांनी आपापल्या परीने वाटा उचलला तरी परिणाम सकारात्मक असेलच याची काहीही शाश्वती नसते. मात्र भविष्यवाणी कार्यक्रमांना तो धोका नसतो. हातावर पोट असणारी माणसं असोत, विविधांगी प्रश्नांनी गांजलेला मध्यमवर्ग असो किंवा परीटघडीचे कॉर्पोरेट्स असोत की अतिउच्चभ्रू असोत. भविष्यवाणीच्या कार्यक्रमाला व्यापक जनाधार आहे. तो आटण्याची नव्हे वाढण्याचीच शक्यता जास्त असते. पाश्र्वभूमीला ओमचं वलय, भविष्य सांगणारे गुरुजी, शांत रंगाची भिंत एवढय़ा मामुली गोष्टींवर भविष्याचा कार्यक्रम होऊ शकतो. वाहिनीसाठी ही जमेची बाजू असते.  बरं गुरुजी अभ्यास करणार, तिथ्या-जयंत्या, ग्रहमान, सण, साडेसाती सगळं ते बघणार. इनपूट द्या. ब्रीफ द्या भानगड नाही. एकटाकी काम. गुरुजींना बोलण्याची कला अवगत असते. त्यामुळे ते तंत्र समजावण्याची आवश्यकता भासत नाही. जुजबी मेकअप पुरतो. गुरुजी आपल्या क्षेत्राला साजेसेच कपडे परिधान करत असल्याने वेशभूषेवरचा वारेमाप खर्चही टळतो. खरं तर राशी त्याच राहतात; पण प्रेक्षकांना कधीही एकसुरीपणा येत नाही. ही कार्यक्रमाची जमेची बाजू, कारण काल आपल्या राशीसाठी सांगितलेलं आज आपल्यासाठी नसतं. रुग्णाला दिलेल्या औषधांचा परिणाम होणे आवश्यक असते. तरच माणूस बरा होऊ शकतो. रुग्णाचा विश्वास असतो डॉक्टरवर. भविष्याला तशी निकषपट्टी नसते. सांगितल्याप्रमाणे घडलं नाही म्हणून मानहानी, विश्वासाला तडा वगैरे काहीही होत नाही. गुरुजी प्रातिनिधिक सांगतात- प्रत्येकालाच कसं लागू होणार त्यांनी सांगितलेलं, असं प्रेक्षकमंडळी म्हणतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी भक्तिभावाने भविष्य पारायणाला बसतात.

अनेकांचा चहा, नाश्ता या भविष्यवाणीशी संलग्न आहे. काही जण आंघोळीची वेळ कार्यक्रम अनुषंगाने ठेवतात. एक प्रकारे माझा दृष्टिकोन काम करण्याचा आहे का टंगळमंगळ करायचा आहे? मला माझं काम किती चांगलं येतं? येत नसेल तर त्यासाठी मी अतिरिक्त प्रयत्न करणार आहे का? कामाशी निगडित तज्ज्ञ मंडळी वेगळं काय करतात? मला काम आवडतं का? मला कामाचा कंटाळा का येतो? या प्रश्नांचा आढावा प्रत्येक जण आपला आपण घेऊ शकतो; पण अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मंडळी तसं प्रत्यक्षात करतात; परंतु आता काहीही न करता पुढे काय होईल हे जाणून  घेण्याबद्दल मंडळी प्रचंड आग्रही असतात. एकीकडे पत्ता शोधण्यासाठी जीपीआरएस वापरतात टेक्नोसॅव्ही माणसं. मंगळावर आपण यान पाठवतो. स्काइप, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातला माणूस सांधला गेला आहे; पण भवितव्याविषयीचे कुतूहल शमलेले नाही. तंत्रज्ञानाचा प्रचंड पसारा असूनही मलेशियाचं विमान कुठे गायब झालं याचा पत्ता अद्याप लागलेला नाही. आपल्या प्रयत्नांपलीकडेही शक्ती आहे. त्या शक्तीला स्मरून काही समजलं तर उपयुक्त ठरेल, असा विश्वास सामन्यांना वाटतो. मोकळ्याढाकळ्या संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून  वावरणारी महाविद्यालयीन मुलंमुलीही आवर्जून भविष्यवाणीचे कार्यक्रम पाहतात. तेवढं पुरत नाही म्हणून ऑनलाइन होरोस्कोपवरही विश्वास असतो त्यांचा. भारतीय संस्कृतीनुसार राशींची नावं ठरलेली आहेत. इंग्रजीत राशींना वेगळी नावे आहेत. दोन्ही ठिकाणच्या भविष्यात फरक पडत असल्याने इंग्रजी वाहिनीवरची भविष्यवाणी आणि स्थानिक भाषेतली भविष्यवाणी असं दोन्ही फॉलो करणारा प्रेक्षकवर्ग आहे.

प्रचंड लोकसंख्येमुळे रोजगार ही आपल्यापुढची मोठी समस्या आहे. कोणतं कौशल्य उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकेल हे सांगता येत नाही. अगदी आतापर्यंत अनेक गावांमध्ये भविष्य सांगणाऱ्याला जेमतेम पैसे देऊन लोक घरी जात असत. भविष्य सांगण्यापुरता त्या माणसाला मोठा मान मिळत असे; पण राशी, ग्रहतारे यांचा सखोल अभ्यास रोजगाराचे उत्तम साधन होऊ शकतो. याच्या जोडीला बोलण्याची कला अवगत असेल तर माणूस टीव्हीवर झळकू शकतो, उत्तम कमवू  शकतो. टीव्हीवर भविष्य सांगतोय म्हटल्यावर त्याच्या वैैयक्तिक फॉलोअर्समध्ये वाढ होणार हे निश्चित. भविष्य काय  सांगायचंय- इकडचं तिकडं सांगितलं की झालं असा समज अनेकांचा आहे. मात्र आता प्रेक्षकवर्ग सुज्ञ आहे. त्यालाही गुगल ठाऊक आहे. त्यालाही टेक्नोजुगाड करता येतात. त्यामुळे भविष्य हा रिकामपणाचा उद्योग राहिलेला नाही. तुम्ही व्यासंग वाढवा, सिद्धी प्राप्त करा, लोकांचा विश्वास कमवा आणि टीव्हीद्वारे लोकांसमोर जा इतका थेट मार्ग आहे. टीव्हीवर भविष्यवाणीच्या कार्यक्रमातील गुरुजींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. त्यांच्या बोलण्याच्या लकबी लोकांना पाठ आहेत. लोक विश्वासाने भविष्यवाणीचे कार्यक्रम पाहतात. यासारखे दुसरे पाठबळ नाही. पूर्वी दळणवळणाला मर्यादा होत्या. राज्याच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातला माणूस तिथेच मर्यादित राहत असे. उपग्रहीय क्रांतीमुळे देशाच्या एका टोकाला बसून खंडप्राय देशात पसरलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांची, वृत्तवाहिन्यांवर काम करणाऱ्या अँकर्सची जशी ओळख निर्माण होते तशी ब्रँड व्हॅल्यू भविष्य सांगणाऱ्या मंडळींना मिळू लागली आहे. लवकरच भविष्य सांगणाऱ्या मंडळींमध्ये तीव्र स्पर्धाही पाहायला मिळू शकते. हिंदी, इंग्रजी किंवा स्थानिक भाषा-वाहिनीचे धोरण काहीही असो, प्रतिसरकार असो की विरुद्ध सरकार- भविष्याचा कार्यक्रम ३६५ दिवस खपतो. सकाळी काय दाखवायचं प्रेक्षकांना हा वाहिनीचा मोठा प्रश्नही सुटतो.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 16, 2016 1:23 am

Web Title: astrology tv show
Next Stories
1 ‘बॉलीवूड’ दिया परदेस!
2 अध्यात्माची अशीही बैठक!
3 नयी ‘जिंदगी’