टीव्हीवरच्या रटाळ, कमअस्सल, पाणीदार मालिका बघण्याची आपल्याला सवयच लागली आहे. त्या उथळ मनोरंजनातून बाहेर पडून चांगलं काही पाहायचं असेल तर ‘एपिक’ला पर्याय नाही.

टीव्ही पाहणं हे मुळातच मूलभूत गरजांमध्ये मोडत नाही. रोजीरोटीची भ्रांत असणाऱ्यांना टीव्हीची चंगळ झेपू शकत नाही. मात्र तरीही दमल्या भागल्यानंतर घरात बसून अनुभवता येणारं आयतं मनोरंजन हाच काय तो विरंगुळा. बातम्यांची चॅनेल्स आपण अपडेट राहण्यासाठी बघतो. स्पोर्ट्स चॅनेल खेळांची पॅशन असणारेच बघतात. लहान मुलं कार्टून बघतात. दिवसभराचा गाडा हाकल्यानंतर स्त्री-पुरुष मंडळी साडेसात ते साडेदहा डेली सोपनामक दैनिक दळण बघतात. पण काही चॅनेल्स तब्येतीत बघण्यासाठी असतात. म्हणजे तुमचं सगळं आटपाट नगरीप्रमाणे आहे. कसलीही ददात नाही. घराचं कर्ज, मालमत्ता, आजारपणं, लग्नखर्च, अपघात अशा नानाविध चिंतांपासून तुम्ही दूर आहात. सकाळी मॉर्निग वॉक, पाच दिवस काम, दोन दिवस चिलआउट, दोन घरं-एक पेंटहाउस, माणशी गाडय़ा, नोकरचाकर, एखादा डॉगी वगैरे असं सगळं सुखेनैव असलं की हा चॅनेल पाहणं अधिक मानवतं. एपिक हा शब्दच उच्चारल्यावर काहीतरी भव्य, खंडप्राय आणि ऐतिहासिक असं काहीतरी डोळ्यासमोर उभं राहतं. रामायण-महाभारताला ‘एपिक’ संबोधलं जातं. एकुणातच ‘एपिक’ शब्दाला असा भारदस्तपणा आहे. साहजिक या नावाचं चॅनेलही तसंच असायला हवं ना! आणि आहेही तसंच. उगाच रिमोटवरच्या चॅनेलक्रमांकांमध्ये भर घालण्यासाठी म्हणून हा चॅनेल उघडलेला नाही. सासू-सून कारस्थान फॉम्र्यूला नाही. क्राइम शोज नाहीत. अतरंगी रिअ‍ॅलिटी शोज नाहीत. चॅनेल सर्फिग करता करता दोन मिनिटं डोकावण्यासाठीचं हे चॅनेल नाही. सुशेगात पाहण्यासाठी निर्माण झालेलं चॅनेल आहे. चॅनेलवरच्या यच्चयावत कार्यक्रमांच्या प्रमोशनचा ठेका आम्ही घेतलेला नाही. सदरहू लिखाणामागचा तो उद्देशही नाही. मात्र सरधोपट विचार करणाऱ्यांच्या जंत्रीत भारतीय इतिहास, संस्कृती आणि पौराणिक कथा यांच्यावर आधारित कार्यक्रमांची रूपरेषा ठरवून चॅनेल उभा करणं धाडसाचंच आहे. चॅनेलवरचे सगळेच कार्यक्रम बावनकशी नाहीत. पण वेगळा विचार करता येतो, तो कसा मांडावा, कोणत्या व्यक्तींना सोबत घेऊन मांडावा याचं उत्तम उदाहरण हे चॅनेल आहे. लाइफस्टाइल कॅटेगरी म्हणजे विवक्षित आवडीनिवडी जपणाऱ्यांसाठी अशी चॅनेल्स असतात. एकीकडे गरिबी, दुष्काळ, पायाभूत सुविधांचा अभाव, दहशतवाद, चलनफुगवटा अशा प्रश्नांनी घेरलेलं असताना समाजात एक वर्ग अगदी निवांत आहे. बुद्धिजीवी वगैरे म्हणावा अगदी तस्सा. अनेकांना आपण या वर्गाकडे कूच करतोय असं वाटतं. त्यांच्यासाठी हे चॅनेल बेस्ट आहे. आपले व्यापताप सांभाळताना काही मंडळी एखाद्या गोष्टीप्रती पॅशनेट असतात. आवड असली की सवड मिळणाऱ्यांसाठीही ‘एपिक’ हा उत्तम पर्याय ठरावा.

नासिरुद्दीन शहा म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ. असंख्य चित्रपटांतून त्यांच्या अफलातून अभिनयकौशल्याची प्रचीती आपण घेतली आहे. त्यांचा आवाज, उच्चार, बोलणं हे एक खास समीकरण आहे. नासिरुद्दीन शहा यांच्याकडून जुन्या काळातल्या गुजगोष्टी ऐकायला मिळाल्या तर- आणि त्याही क्रिकेटच्या. तुम्ही योग्यच वाचलंत. सिनेमा, संवाद, स्क्रीनप्ले वगैरे काहीच नाही. समोर नासिरुद्दीन शाह बसलेत आणि एकेक करून धमाल किश्श्यांची पोतडी उलगडून दाखवत आहेत त्यांच्या खास आवाजात, लहेजात. क्रिकेट आणि नासिर चाहत्यांसाठी पर्वणीच म्हणायला हवी की. ‘मिड विकेट टेल्स विथ नासिरुद्दीन शाह’ असं फक्कड नावही आहे. आता तुम्ही म्हणाल नासिरुद्दीन यांच्याकडून सिनेमा क्षेत्राविषयी ऐकण्यात जास्त गंमत आहे. आहेच की, आम्हीही सहमत आहोत. पण हा विचार साचेबद्ध चौकटीचा झाला. विचारी अभिनेता म्हणून काम करणाऱ्या परंतु क्रिकेटची आवड आणि अभ्यास करणाऱ्या माणसाकडून रंजक कहाण्या ऐकायला कोणाला आवडणार नाही. चौकटीपल्याडचा विचार तो असा.

राजेरजवाडय़ांचे महाल, गढय़ा, हवेल्या अशा प्रासादिक वास्तू, त्यांना जोडणारे रस्ते, देवळं आणि वसलेली संस्कृती. सोशॉलॉजी (समाजशास्त्र) आणि मानववंशशास्त्र (अँथ्रॉपॉलॉजी) शाखेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विषय. पण सामान्य माणसालाही त्या काळचं जगणं जाणून घेण्यात रस असतो. आणि हे घरबसल्या मिळत असेल तर- चंगळच की. ‘एकांत’ नावाचा कार्यक्रम आहे. नावातच चिंतनात्मक, आध्यात्मिक, वैैचारिक, इंटलेक्च्युअल वाटतंय ना.. योग्य मार्गावर आहात तुम्ही.

आपल्या संस्कृतीत शौर्याचे, श्रेष्ठतेचे, पराक्रमाचे दाखले दिले जातात. व्यक्तिपूजेबरोबरच एखाद्या स्थानाचं माहात्म्य वाढीस लागतं. बघता बघता दंतकथा आकारास येतात. पण यातलं खरं किती आणि मनघडन कहाण्या किती असा प्रश्न आपल्याला पडतो. अशा गोष्टी उलगडण्यासाठी एक कार्यक्रम आखलाय एपिकवाल्यांनी- ‘कही सुनी’. नाशिकपासून द्वारकापर्यंत तसंच राणी रूपमतीपासून काळभैरवापर्यंत. त्या ठिकाणाचं तगडय़ा कॅमेऱ्यांद्वारे उत्तम चित्रण, चांगला व्हॉइस ओव्हर, मधल्या टप्प्यात विषयाशी संलग्न तज्ज्ञांची मतं आणि कुठेही निष्कर्ष काढून मत लादण्याचा प्रकार नाही. सगळ्या बाजू शांतपणे मांडून आहे हे असं आहे सांगणं. काय टिपायचं, काय सोडून द्यायचं तुम्ही ठरवा. हिंदीतल्या कृत्रिम वाटणाऱ्या सिरियल्समध्ये काम करणाऱ्या सारा खानने इथे मात्र अँकरिंगचा चांगला प्रयत्न केला आहे.

अशा कार्यक्रमांची निर्मित्ती करणं, त्याला टीआरपी मिळणं, जाहिराती लाभणं आणि चॅनेलला आर्थिक फायदा होणं या चार गोष्टी जटिल स्वरूपाच्या आहेत. कोणाला कधी सुगीचे दिवस येतील आणि कोण डबघाईला लागेल हे सांगता येत नाही. मात्र तूर्तास एपिक मंडळींनी पकडलेली वेगळी वाट जपली आहे.

रवींद्रनाथ टागोर हे समस्त भारतीयांसाठी आदरस्थान. पण त्यांच्या कथांवर आधारित कार्यक्रम आपल्याला अभावनेच पाहायला मिळतात. एपिकने ही उणीव भरून काढली आहे. ‘स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर’ या कार्यक्रमांत त्यांच्या कथांचं टीव्ही रूपांतर पाहायला मिळतं. तत्कालीन संस्कृती, विचार आणि टागोर यांचा दृष्टिकोन कथांद्वारे समजून घेता येतो. आपल्याला समजणाऱ्या भाषेत, घरबसल्या टागोरांच्या कथा बघणं म्हणजे साहित्यिक मेजवानीच की राव! ठरावीक कथा दाखवल्यानंतर हा कार्यक्रम थांबला आहे. मात्र लगेच निराश होऊ नका. रिपीट एपिसोड्स दाखवतात, काळजी नसावी.

राजा, रसोई आणि अन्य कहानियाँ हा आणखी खमंग कार्यक्रम. आपल्या इतिहासात असंख्य राजे होऊन गेले. त्यांच्या राजवटीतले मुदपाकखाने, खाण्याचे पदार्थ, त्यामागचा विचार, त्यांची रॉयल किचन्स हे सगळं चटपटीत पाहावं अशी इच्छा असेल तर हा कार्यक्रम जरूर पाहा.

‘सामग्री, संपत्ती और सौदा’ अशा नावाचा भन्नाट कार्यक्रम आहे. कोणतीही संस्कृती विकसित होण्यात व्यापारउदीम महत्त्वाचा असतो. वस्तुविनिमय हा संस्कृतीचा अविभाज्य घटक होता. भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या वस्तूंची आणि पर्यायाने देवाणघेवाण संस्कृतीची सुरेख ओळख २६ भागांच्या या मालिकेत करून देण्यात येते. अर्थशास्त्र, वाणिज्य, विधी, माध्यम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टसाठी हे आयतं मटेरियल आहे.

भव्य वास्तू आपल्या संस्कृतीची ओळख आहे. विविध राजवटींमध्ये त्यांच्या दृष्टिकोनानुसार वास्तूंची उभारणी केली गेली. या वास्तूंची उभारणी करताना काय काळजी घेण्यात आली, किती वेळ लागला, वास्तूची गुणवैशिष्टय़े काय होती, वास्तू पर्यावरणस्नेही राहण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली, भूकंपासारख्या आपत्तीपासून रोखण्यासाठी काय शास्त्रीय तजवीज करण्यात आली अशा सर्वसमावेशक मुद्दय़ांचा ऊहापोह ‘संरचना’ कार्यक्रमात घेण्यात येतो. खजुराहोच्या मंदिरांपासून जयपूरच्या गुलाबी महालापर्यंतच्या वास्तूंचा विविध कंगोऱ्यांतून आढावा घेण्यात येतो. एरव्ही आपणही भ्रमंतीदरम्यान या वास्तू पाहिलेल्या असतात. घाईघाईत गाइडने रट्टा मारून सांगितलेल्या गोष्टी आपण विसरूनही जातो. मात्र वास्तूंमधील सूक्ष्म बारकावे सविस्तर वर्णनासह ऐकताना आपल्याला वास्तूंची नव्याने ओळख होते.

भारतीय संस्कृती म्हटली की देव आलेच. असंख्य देवी, देवता, त्यांचे पूजन, त्यामागचा अर्थ देवलोक या कार्यक्रमाद्वारे समजून दिला जातो. व्यवसायाने डॉक्टर असणारे डॉ. देवदत्त पट्टनायक हिंदू संस्कृतीतील विविध संकल्पनांची ओळख करून देतात.

टीव्हीचा उद्देश केवळ मनोरंजन इतकाच नाही हे पटवून देणारे हे चॅनेल. विविध गोष्टींबाबत तपशीलवार माहिती मिळवणं, अनेकविध पैलू समजून घेणं आणि वृद्धिंगत होणं हेही टीव्हीच्या माध्यमातून होऊ शकतं याचा प्रत्यय या चॅनेलवरील कार्यक्रम बघताना येतो. चार नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे चॅनेल चौकट मोडतं आणि आपल्या कक्षा रुंदावतं. चटपटीत, सवंग आणि थुकरट पाहण्याची, ऐकण्याची सवय लागलेल्या मंडळींना हे चॅनेल पाहणं आणि पचवणं अंमळ कठीणच आहे. पौष्टिक खाण्याची सवय अंगी बाणवावी लागते आणि तरच तब्येत होते. प्रेक्षक म्हणून आपली प्रगल्भता वाढवण्यासाठी अशा प्रयत्नांना आपण साथ द्यायला हवी. संस्कृती आणि तिच्या रक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्या, धाकदपटशा दाखवण्यापेक्षा संस्कृती समजून देणारे कार्यक्रम पाहणं सहिष्णुता वाढवू शकते. दोन वर्षांपूर्वी हे चॅनेल लाँच झालं आहे. चांगलं पाहण्याची सवय रुजवलेल्या मंडळींनी हे चॅनेल शोधून आवडीनुसार कार्यक्रम पाहायला सुरुवातदेखील केली आहे. अन्य चॅनेलच्या भाऊगर्दीत, टीआरपीच्या शर्यतीत हे चॅनेल किती दिवस तग धरेल माहिती नाही. परंतु आहे तोपर्यंत पाहणं ‘एपिक’ करण्याची आपल्याला संधी आहे हे नक्की!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com