22 February 2020

News Flash

‘बॉलीवूड’ दिया परदेस!

सासू-सून, नणंद- भावजय, सासरे- जावई अशा नात्यागोत्यात रमलेल्या आपल्या टीव्ही मालिका.

सासू-सून, नणंद- भावजय, सासरे- जावई अशा नात्यागोत्यात रमलेल्या आपल्या टीव्ही मालिका. त्यातल्या एकीने एकदम सीमोल्लंघनच केलं आणि थेट वाराणसीचा जावई आणला. संस्कृतीसंगम घडवून आणण्यात बॉलीवूडशी नातं जोडू पाहणाऱ्या या मालिकेचा परामर्श-

इश्क-प्रेम-मोहब्बत संदर्भात बॉलीवूड चित्रपटांसारखी शिकवणी नाही. पण ही शिकवणी मराठी मालिकेत मिळाली तर..? आहे, सध्या तीही सोय उपलब्ध आहे. दररोज रात्री नऊ वाजता ही शिकवणी असते. लोकांना बॉलीवूड आवडतं. त्यामुळे या मालिकेलाही भरघोस जनाधार लाभला. नुकत्याच झालेल्या वाहिनीच्या इनहाऊस पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले.  अशा या बॉलीवूडप्रेरित मालिकेचा हा परामर्श. ही टीका नाही, भलामणही नाही. फक्त काही मुद्दे.

शिवदादा वाराणसीचे आणि गौरीताई पक्क्य़ा मुंबईकर. परप्रांतीयांच्या इथे येण्यावरून होणारे खळ्ळ््खटय़ाक तुम्हाआम्हाला नवीन नाही. मराठी मालिकेत असा आंतरराज्यीय रोटीबेटी व्यवहार पाहून आम्ही भरून पावलो. मुंबई-वाराणसी अशी प्रेमाची ‘महानगरी एक्स्प्रेस’ धावू लागली. काहीतरी ‘आऊट ऑफ बॉक्स’ पाहायला मिळेल या समजातून आम्ही पारायणं करू लागलो. पण लवकरच इडियट बॉक्स अर्थात टीव्हीवरचा हा बॉलीवूड आविष्कार असल्याचं आमच्या ध्यानी आलं. शिवदादा मुंबईत येतात. पत्ता विचारायला त्यांना भेटतात थेट गौरीताई. यापेक्षा बॉलीवूड साधम्र्य ते काय! शहरात नवा आलेला माणूस पत्ता विचारतो एखाद्या मुलीला. प्रेमांकुर असा फुलतो. शिवदादा हिंदीत पत्ता विचारतात आणि गौरीताई मराठी भाषेच्या स्वाभिमानाला जागत सांगत नाहीत. हिंदी येत नसल्याचं लटक्या रागात सांगतात. शिवदादा थेट गौरीताईंच्या बिल्डिंगमध्ये राहायला येतात आणि तेही भिंतीला भिंत लागून असलेल्या घरात. इथेच तुम्हाला पुढे काय होणार याची कल्पना येते. बडे खानदान के शिवदादा आणि मध्यमवर्गीय सावंतांच्या घरचे शेंडेफळ गौरीताई यांची ही प्रेमकहाणी.

सावंतकाकांनी गौरीताईंसाठी लखोबा लोखंडे अर्थात विकीदादांचं स्थळ पक्कं केलेलं असतं. कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय न करणारा माणूस एवढा चंगळवादी कसा राहतो प्रश्न सावंत कुटुंबीयांना पडत नाही. ‘बोललीस, केलंस ना विकीला परकं’ या वाक्यानिशी विकीदादांनी सावंत कुटुंबीयांना आपलंसं केलं होतं. पुरेसं लुबाडून झाल्यानंतर सावंतांचे जावई होण्याचा मान विकीदादांना मिळणार होता. पण त्यांचं बिंग फुटतं आणि ते परागंदा होतात. तोपर्यंत शिवदादा सोसायटीत स्थिरस्थावर झालेले असतात. बॉलीवूडप्रमाणे ते पहिल्याच भेटीत गौरीताईंच्या प्रेमात पडतात. विकीदादा गेल्यावर गौरीताईंसमोर लगेचच शिवदादांचा पर्याय उभा राहतो. बॉलीवूडला सुसंगत गुंता असा की गौरीताईंच्या मैत्रीण मितूताईंना शिवदादा आवडू लागतात. मितूताईंना असं वाटू लागल्यावर गौरीताईंना स्वत:च्या प्रेमाची जाणीव होते. मग अगदी मुत्सदेगिरीने त्या मितूताईंना शिवदादांपासून दूर करतात. पण साहाय्यकांना जोडीदार गाठून देणं हे मुख्य पात्रांचं उपकाम असतं हे खास बॉलीवूड गुणवैशिष्टय़. शिवदादांचे रूम पार्टनर वेणूदादांना मितूताई आवडू लागतात. पण मितूताईंना वेणूदादा आवडत नाहीत. गौरीताई आणि शिवदादा स्वत: एकत्र येताना वेणू-मितू जोडी कशी जमेल यासाठी प्रयत्न करतात. तोपर्यंत शिवदादांसाठी राधिकाताईंचं स्थळ येतं. बघण्याच्या कार्यक्रमाला जीन्सवर साडी नेसून आलेल्या राधिकाताईंना शिवदादा आणि गौरीताईंबद्दल कळतं. एकदम फटय़ॅक स्वभावाच्या राधिकाताई स्वत:च बाजूला होतात. सावंतकाका गौरीताईंना बडय़ा घरचं स्थळ आणतात. पहिल्या भेटीत गुणी वाटलेला मुलगा लवकरच आपले खरे गुण उधळतो. छोटं घर, साधे कपडे, मध्यमवर्गीय संस्कार यावर टीका केल्यामुळे सावंतसाहेब या स्थळाला भिरकावून देतात. सगळे सबट्रॅक बाजूला केल्यानंतर दहीहंडीच्या वेळेस शिवदादा आणि गौरीताईंबद्दल सावंतसाहेबांना कळतं. आम्हाला ‘झी’ वाहिनीचं एक फार आवडतं. अनोळखी स्त्री आणि पुरुष एकमेकांसमोर आले, बोलले की थेट त्यांच्या लग्नाचा घाट घातला जातो. हा शिरस्ता प्रत्येक मालिकेत पाळला जातो याचं फार कौतुक वाटतं. असा एकजिनसीपणा पाळणं सोपं नसतं.

शिवदादा आणि गौरीताई एकदम आधुनिक श्रावणबाळं. आई-वडिलांच्या शिस्तसंस्कारात वाढलेली मुलं. नेहमी सगळ्यांशी चांगलं वागतात, मधाळ बोलतात. राग नाही, शिव्या नाही, चिडचिड नाही.

सावंतसाहेब दररोज जेवताना पहिला घास गौरीताईंना भरवतात. कलियुगातला प्रेमाचा तो लडिवाळ सोहळा पाहून आम्हाला उचंबळून येतं. शिवदादा आणि गौरीताई दोघंही सुशिक्षित, सद्वर्तनी. दोघंही महानगरात वाढलेले. अशा आटपाट नगरी पाश्र्वभूमीवर शिवदादा आणि गौरीताई आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना मोकळेपणाने आत्मविश्वासाने सांगू शकत नाहीत. पालक दुखावले जातील हा विचार स्तुत्य. पण जोडीदाराचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी ठरल्यानंतरही प्रेमाविषयी थेट बोलण्याचा धीटपणा येत नाही. याला म्हणतात बॉलीवूड संस्कार. आम्हाला वाटलेलं मालिका २०१६ मध्ये आहे म्हणजे समाज पुढे गेला असेल पण कसलं काय- मनाजोगती सून न आल्याने सासुरवासाच्या निमित्ताने नवनवीन कारस्थानं रचणारी सासू आणि बडं खानदान असूनही सावंतांकडे प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मागणारं शिवदादांचं खानदान. आढय़ता दाखवणारा वरपक्ष आणि मान खाली घातलेला केविलवाणा, खचलेला, कुढलेला सावंत कुटुंबीयांचा वधुपक्ष. जग कितीही पुढे गेलं तरी मुलीचं लग्न ही बापासाठी आर्थिक आणि मानसिक कुतरओढ असते. मुलीचं चांगलं व्हावं ही इच्छा असते, पण त्यासाठी सोसावं लागतंच. परंतु मुलीच्या लग्नासाठी अख्खं घर कफल्लक होऊन देशोधडीला लागण्याचं हे पहिलंच उदाहरण असावं.

छोटं घर ही गौरीताईंच्या नणंद निशाताईंची समस्या. या कारणासाठी त्या मूल होऊ देण्याचा विचारही दूर सारतात. आता छोटय़ाशा ब्लॉकमध्ये सहा माणसं म्हणजे स्पेस मिळण्याचा प्रश्नच नाही. आता एवढय़ाशा घरात कुजबुजलं तरी दुसऱ्या माणसाला ऐकायला जाईल असा तुमचाआमचा समज. पण निशाताई याच इटकुल्या घरात स्वत:च्या फोनवरून शिवदादांच्या आईशी हातमिळवणी करून नवनवी कारस्थानं रचतात आणि सावंतांच्या घरी कुण्णाला काहीही कळत नाही.

चाळी पाडल्या, ब्लॉक संस्कृती आली आणि शेजारधर्म संपला अशा आशयाच्या म्हणी आम्ही ऐकत असतो. बाजूच्या घरात कोण राहतं याची जुजबी माहिती असण्याचा हा काळ. पण परदेस मंडळींचा थाटच भारी. एकदम सर्वसमावेशक माणसं. साखर, पेढे, डाळिंब्यांच्या उसळीपासून खोडरबर, थर्मामीटपर्यंत काहीही मागण्यासाठी ‘मंग्याची आई’ सावंतांच्या घरी सातत्याने येतात. कितीही निम्नस्तरीय माणसं असली आणि हातावर पोट वगैरे असलं तरी उठसूट वाटय़ा घेऊन मुलाच्या नावाने मागायला जाण्याचा ट्रेंड प्रथमच पाहतोय आम्ही. ‘मंग्याची आई’ दिवसाच्या आणि रात्रीच्या अशा कोणत्याही प्रहरी सावंतांच्या घरात थेट घुसते. बरं कायम तुम्ही अशा भिक्षेकरी का असं एरव्ही प्रत्येक बाबतीत स्वाभिमानी सावंत ‘मंग्याच्या आई’ला विचारत नाही. बरं वस्तू नेल्या तर नेल्या. सावंत कुटुंबीय आहेत उदार म्हणून सोडून द्यावं तर ‘मंग्याची आई’ दरवाजा लावून घेण्याऐवजी आदळून जाते. म्हणजे दुहेरी नुकसान. हळदी-कुंकू आणि सण सोडले तर एकमेकांच्या घरी जायला हल्ली गृहिणींनाही वेळ नसतो. आणि समजा कोणाकडे असा आगंतुक वेळ असेल तर दोन किंवा तीन भेटीनंतर यजमानीण बाई योग्य शब्दांत समज देऊन वाटेला लावेल असे दिवस आहेत. अशा परिस्थितीत सावंतांच्या सोशिकतेचं आम्हास अतीव कौतुक वाटतं. बरं ‘मंग्याची आई’ सावंतांच्या मजल्यावर देखील राहात नाही. त्यांच्या मजल्यावरच्या लोकांना सोडून त्या सावंतांकडे येतात. ‘मंग्याची आई’ची एवढी उठाठेव सुरू असताना मंग्याचे बाबा काय करत असतात? बरं मंग्याची आई इतक्यांदा येते की मंग्या हा शालेय किंवा महाविद्यालयीन मुलगा नसून बकासुराचा अवतार आहे असं आम्हाला वाटू लागलं. सगळंच सावंतांकडे मागायचं आहे मग मंग्या आणि कंपनी सावंतांकडे पेइंग गेस्ट म्हणून का येत नाहीत असाही विचार मनी दाटला आमच्या.

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं तुम्ही ऐकलं असेल. यात आता भर पडलीय. प्रेमात पडलं की कुठेही केव्हाही जाता येतं. गोंधळू नका-समजावून सांगतो. शिवदादा आणि गौरीताई प्रेमात पडले. दोघांच्या कचेऱ्या वेगळ्या. पण तुम्हाला सांगतो प्रेम झालं ना की कुठेही संचारता येतं. कचेरीत शिरताना अनेक ठिकाणी कार्ड स्वाईप केल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. कार्ड नसेल तर रजिस्टरमध्ये एंट्री करून ज्याच्याकडे कार्ड आहे त्याच्याबरोबर जावं लागतं. कोणी बाहेरचा भलता माणूस कचेरीत येऊन गोपनीय तपशिलापर्यंत पोहचू नये यासाठी ही खबरदारी बहुतांशी कचेऱ्यांमध्ये घेतात. कार्ड स्वाईपची भानगड नसेल तर मॅन्युअली लिहावं लागतं नाव-गाव-फळ-फूल. पण शिवदादा आणि गौरीताईंची कचेरी एकदम खुली. गौरीताई शिवदादांच्या कचेरीत सहज घुसतात. बरं नुसतं जाऊन कामाच्या ठिकाणी भेटत नाहीत. थेट कॅन्टीनमध्ये जाऊन डबा देतात, भरवतात पण. त्यांना कधी कोणी सिक्युरिटी वगैरे सारखी कारणं देऊन अडवत नाही. प्रेमाची ताकद केवढी असते! भौतिक बांध घालून काय होणार. शिवाय शिवदादा आणि गौरीताई नेक माणसं. दुसऱ्यांच्या कचेरीत जाऊन फक्त भेटून येतात. मन मोठं असलं की सगळं होतं असं जान्हवीताई म्हणायच्या. शिवदादा आणि गौरीताईंनाही लागू होतं.

सावंतसाहेब आकाशवाणीत काम करतात. सावंतबाई शाळेत शिक्षिका आहेत आणि घरी शिकवण्याही घेतात. आजी डब्बे देतात जेवणाचे. नचिकेतराव मध्यंतरी बेरोजगार होते पण आता कामावर आहेत. निशाताई तर वर्किंग वुमन. गौरीताई तर जातातच कामावर. म्हणजे हिशोब समजून घ्या. घरात माणसं सहा-कमावणारी माणसं सहा. तरीही सतत सावंत मंडळी आमची परिस्थिती नाही, आम्ही कसा एवढा खर्च करणार असं सतत म्हणत असतात. सगळे कमावत असले तरी खाणारी माणसंही तेवढी हे आम्ही समजू शकतो. पण एक कमावणारा आणि काहीही न कमावता खाणारी तोंडं चार अशी कुटुंबं चालतात. त्या घरांनाही महागाई असते. शिवदादांच्या वाराणसीच्या बडेजावासमोर सावंत मंडळी अगदी बुजून जातात. ज्या घरातली सहाही माणसं कमावणारी आहेत ती एवढी लेचीपेची होतील? कोणीच कोणावर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून नाही असं हे आदर्श घर. आणि अशा घरात कर्ज घेतात निशाताई. लग्नाचा ‘ल’ म्हटला तरी खर्चाच्या कल्पनेने त्यांचे चेहरे पडतात. बरं ब्लॉकरूपी घर चालवायला असा किती खर्च येणार. महाल किंवा व्हिला सांभाळण्यापेक्षा नक्कीच कमी असणार ना! तुम्हीच विचार करा. इतकं कोषात जाणं, स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा मागास लेखणं बरं नसतं तब्येतीला.

शिवदादांचा आम्हाला खूप हेवा वाटतो. अगदी बॉलीवूड सुपरस्टार्सचा वाटावा एवढा हेवा. का म्हणजे काय विचारता. गौरीताईंना घेऊन सहज म्हणून फिरायला जातात. आणि चक्क तीन वेगवेगळे कॉस्च्युम बदलून सरोवरात गाणी गाऊन परत येतात. असं घडतं तुमच्याआमच्या आयुष्यात. हल्ली तर सीसीडीमध्येही रांग असते टेबलसाठी. एक कॉस्च्युम खरेदी करतानाच घासाघीस करतात माणसं. असं बॉलीवूडसारखं जगणं सगळ्यांच्या नशिबी कुठे..

दहीहंडी मोठा रंजक खेळ. एकदम सांघिक खेळ. थर रचणं, पाणीदही अंगावर झेलत सहकाऱ्यांच्या मदतीने मटकी फोडणं सगळी प्रोसेसच मुळी धमाल अशी. शिवदादांना वाराणसीत दहीहंडीचं सुख लाभलं नाही. सावंतांची सोसायटीची एकदम सांस्कृतिक. आमच्या माहितीप्रमाणे दहीहंडीत धट्टीकट्टी माणसं पहिला थर लावतात. काटक शरीर आणि हलकं वजन असलेली माणसं वर अशी रचना असते. साहजिकच सगळ्यात वर एखादा लहान मुलगा असतो. जो सहज कोणाच्याही खांद्यावर राहू शकतो, पटकन खालीवर जाऊ शकतो. पण हे नियमबियम आपल्यासारख्या पामरांना. शिवदादा असे उंच, पिळदार शरीरयष्टीचे राजबिंडे वगैरे. दहीहंडीच्या वेळेस श्रावणबाळाची इमेज सोडून ते थेट वरच्या थराला जायचा हट्ट धरतात. ज्यांच्या बळकट खांद्यावर पोराटोरांनी उभं राहायला हवं तेच वर जायला बघतात. बरं जुनीजाणती माणसंही या बालहट्टाला बळी पडतात. शिवदादा मजल दरमजल करत वरच्या थराला जातात. पोरंटोरं खाली, शिवदादा वरती असं अनोखं दृश्य पाहून आम्हाला प्रेमाची महती कळते. शिवदादा नेटाने हंडी फोडतात. पण हाय रे दैवा. एकदम खालीच पडतात. आता एवढय़ा बाप्याला किती वेळ खालचे खांदे सावरणार ना..

गौरीताईंच्या जोडीदाराचा निर्णय सावंतसाहेब घेतात. आजींनी डब्बे करायचे की नाही सावंतसाहेब ठरवतात. नचिकेतरावांनी परदेशात जायचं की नाही हेही सावंतसाहेब ठरवतात. पण घरात कामासाठी एक बाई येऊन जातात. हे सावंतसाहेबांना ठाऊक नाही. घरातली कामं घरच्या माणसांनीच करावीत असं त्यांचं म्हणणं. वास्तविक या बाईंमुळे सावंतवहिनी आणि आजींचं काम हलकं होतं. सावंतसाहेब नसताना मधल्या बेचक्या वेळात या बाई काम करून जातात. बाहेरची व्यक्ती दररोज काम करायला येते आणि कर्त्यां माणसाला आणि त्यातही सावंतसाहेबांसारख्या कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुखाला ठाऊक नाही. बरं सावंतसाहेब असताना एकदा बाई काम करतात. तरीही बिंग फुटत नाही. सावंतसाहेब एरव्ही एकदम स्पोर्टिग, प्रागैतिक विचारसरणीचे. पण याबाबतीत एकदम कर्मठ.

गौरीताई एकदम आदर्शवत. आदर्श मुलगी, आदर्श बहीण. या कलियुगात किती चांगले संस्कार. गौरीताई पंजाबी ड्रेसमध्ये वावरतात. घरातही आणि बाहेरही. सावंतसाहेब गौरीताईंचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलाशी ठरवतात. तो मुलगा गौरीताईंना फॅशनसेन्स बदलायला सांगतो. मी असेच कपडे घालते असं गौरीताई ठामपणे सांगतात. आपल्या संस्कृतीला साजेशा राहतात गौरीताई. पंजाबी ड्रेस, छानशी ओढणी, मॅचिंग रंगाच्या अ‍ॅक्सेसरीज, ट्रेन्डिंग अशी पर्स अशी नेटकी राहणी. पण या सगळ्याला अजिबातच न साजेसे असे अनेक मजली हिल्सचे सँडल परिधान करतात गौरीताई. शिवदादांची उंची खूप (बौद्धिक आणि शारीरिकसुद्धा) त्यांच्याबरोबरच्या सीनमध्ये अगदीच मिसमॅच वाटायला नको म्हणून ही क्लृप्ती. अहो प्रेमात कसली उंची, कसले हिल्स. मराठी प्रेक्षक किती प्रगल्भ आहेत. कोणी काही म्हटलं नसतं.

गौरीताईंचं शिवदादांशी लग्न ठरल्यावर नचिकेतराव आणि निशाताई वाराणसीला जातात. पहिला सीन-कॅब, विमान, कॅब असा प्रवास होऊनही दोघांच्याही चेहऱ्यावर जराही थकवा नाही. निशाताईंचा मेकअपही जसाच्या तसा. दुसरा सीन-शिष्टाचार होऊन मंडळी परतीच्या प्रवासाला निघतात. तिसरा सीन-नचिकेतराव आणि निशाताई मुंबईतल्या घरी पोहचतात. निशाताईंचा मेकअप तस्साच. आणि हो दोन ते तीन तास बसून करण्याच्या प्रवासानंतरही दोघांच्याही कपडय़ाला एकही चुणी नाही आणि चेहऱ्यावरती आधीपेक्षा जास्त तजेलपणा.

प्रेमाची वेस जात, धर्म, पंथ यांच्यापेक्षाही राज्यापलीकडे नेण्याचं काम या मालिकेने केलंय. दोन भिन्न संस्कृतीची माणसंही एकत्र येऊ शकतात हा संदेश महत्त्वाचा. बाकी कलाकार मंडळी शेरास सव्वाशेर काम करतात. मुळात ते अभिनय करत नाहीत, ते कॅरेक्टर जगतात. त्यामुळे सच्चेपण भिडतं. या मालिकेच्या निमित्ताने हिंदीतल्या कलाकारांची अदाकारी पाहण्याचा योग जुळून आलाय.

छापता छापता-लग्न होतं. गौरीताई माहेरपणाला मुंबईत येतात. मुंबईत घरावरून घडलेल्या रामायणाची त्यांना कल्पना नाही. पहिल्यांदाच माहेरी आल्याने आजी दृष्ट काढतात गौरीताईंची. वाराणसी ते मुंबई ट्रेन प्रवास करूनही गौरीताईंच्या चेहऱ्यावर थकवा नाहीच उलट उग्र मेकअप आहे. लिपस्टिकही अख्खी स्टिक संपवण्याचा पण केल्यासारखं लावलेलं. हे जाऊ द्या. फारसं महत्त्वाचं नाही. प्रवासात दागिने घालू नयेत, चोरटय़ांची भीती असते असं सांगतात. गौरीताई दागिन्यांनी मढलेल्या. याला म्हणतात बॉलीवूड पॅटर्न.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com
@parabsphatak

First Published on November 4, 2016 3:02 pm

Web Title: marathi tv serial kahe diya pardes
Next Stories
1 अध्यात्माची अशीही बैठक!
2 नयी ‘जिंदगी’
3 अदला‘बदली’चा खेळ