जिल्हाधिकारी मॅडम आणि नामवंत उद्योजक यांची प्रेमकहाणी फुलवायला त्यांनी बॉलीवूड स्टाइलने एकाच आठवडय़ात तीनतीनदा एकमेकांना धडकायलाच हवं का? कॉलेजमधल्या मुलांना आपल्या मोबाइलला कुणी हात लावलेला चालत नाही आणि इथे जिल्हाधिकारी मॅडमचा मोबाइल आई-वडील, बहीण असे सगळे हाताळतात?

मुंबई, पुणं सोडून सांगली शहरासारख्या शहरात घडणारं कथानक ‘किती सांगायचंय मला’ ही मालिका पाहण्यासाठी निमित्त ठरलं. कायमच ब्लॉक-फ्लॅट संस्कृती, बस-ट्रेनची गर्दी, मॉल, समुद्रकिनारे या मुंबईच्या प्रतीकांना मालिकांमधून बघण्याची सवय झालेली. हे सोडून सांगलीसारख्या विकसित सधन शहरातलं कथानक पाहायला मिळेल या अपेक्षेने ही मालिका पाहण्यास सुरुवात केली. वर्किंग वुमन घर, संसार, ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य अशा आघाडय़ा कशा सांभाळते हेही मालिकेच्या निमित्ताने पाहायला मिळू शकतं हा बोनसच. हे सगळं सकारात्मक चित्र पाहून भारावून गेलो. मालिका नेमाने पाहायला लागलो आणि आम्हालाच बरंच काही सांगावंसं वाटू लागलं.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

-सांगलीच्या जिल्हाधिकारी अर्पिता पाटकर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सर्वेसर्वा ओम देसाई हिरो-हिरॉइन आहेत. बॉलीवूड चित्रपट पाहून साधारण प्रेमी युगुलांची पहिली भेट कशी असते याचा साधारण अंदाज आहे. तस्संच या मालिकेतही घडलं. जिल्हाधिकारी मॅडम आणि नामवंत उद्योजक एकमेकांना भेटतात, नव्हे धडकतात.  अनेक चित्रपटांमध्ये घासून गुळगुळीत झालेला फॉम्र्यूला. कामाच्या तंद्रीत एकमेकांना धडकतात माणसं. धडकल्यावर आपल्याला काय लागलंय, आपल्या काय वस्तू पडल्यात हे पाहण्याऐवजी दोन्ही माणसं एकमेकांकडे पाहतच बसतात-स्टॅच्यू म्हटल्यासारखं. एरव्ही कोणी सामान्यजनांची ही कहाणी असती तर ठीक. जिल्हाधिकारी मॅडम आणि नामवंत उद्योजक यांना कामाचा व्याप एवढा असतो की बदाबदा माणसं त्यांच्यासमोर येत असतात. बाहेर जाऊन त्यांनी कुणाला धडकावं अशी वेळ येणंच दुर्मीळ आहे. पण अर्पिताताई आणि ओमदादा धडकतात. कामाच्या तंद्रीत असं होऊ शकतं हा युक्तिवाद मान्य. पण अहो एका आठवडय़ात तीन वेळा धडकतात. मार्केटमध्ये, फोटोकॉपी करायच्या दुकानात, मंदिराजवळ. हल्ली धडक बसल्यावर तात्काळ समोरच्याच्या खानदानाचा उद्धार केला जातो. इथं तसंही काही होत नाही. दोघंही मवाळपंथी असल्याने धडका बसणारच असं म्हणून एकमेकांकडे पाहात बसतात.  अख्ख्या जिल्ह्य़ाची जबाबदारी आणि एका कंपनीची धुरा असलेल्या व्यक्तींना असं एकमेकांना तीन वेळा धडकायला सवड मिळते?अशा या धडक कृती अभियानातून अर्पिता आणि ओम यांचा प्रेमांकुर रुजतो.

– ओमदादांच्या घरी पसाभर माणसं असतात. परवाचा हा प्रसंग. वेळ बाराची. जेवणखाण होऊन मंडळी आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेलेली. एवढी माणसं असूनही प्रत्येकाला स्वतंत्र खोली. याला म्हणतात सधनता. तर ही ओमदादांच्या घरची माणसं झोपतात. त्यांच्या गाढ झोपण्यावरून झोपून तास दोन तास झाले असावेत असं जाणवतं. महाल आणि व्हिलारूपी त्या घरातल्या प्रशस्त हॉलमधला लँडलाइन खणखणू लागतो. फोन हॉलमध्ये, मंडळी आपापल्या खोलीत- मध्ये असंख्य किलोमीटरचं अंतर. फोनच्या आवाजाने खोल्यांमध्ये जाग येते. कोणी चष्मा ओढतं, कोणी पांघरूण ढकलतं. असं करत एकेकजण हॉलमध्ये फोनपाशी येतो. ओमदादांच्या मामाची तब्येत बिघडली असल्याने असा अवेळी फोन. लँडलाइन फोन अजूनही अनेक घरांमध्ये आहेत. मोबाइलचं नेटवर्क कधीही दगा देऊ शकतं त्यामुळे लँडलाइन असणंही स्वाभाविक. पण ज्या घरात माणशी खोल्या आहेत. जिथून हॉल कैक किलोमीटर लांब आहे, त्या घरात सोयीसाठी एखादा कॉडलेस असू नये? खरी गंमत पुढेच आहे. मामा आजारी असल्याने ओमदादांचे आईबाबा दुसऱ्या दिवशी तिकडे जायचं पक्कं करतात. गुणी, आज्ञाधारक, आदर्श ओमदादा लहान भावाला खोलीतून मांडीसंगणक अर्थात लॅपटॉप आणायला सांगतात. फोन वाजू लागला तेव्हा सगळीच मंडळी गाढ झोपेत दाखवलेलं. म्हणजे किमान बारा- साडेबारा. सोयीसाठी साडेअकरा पकडू. ओमदादा लॅपटॉप घेतात आणि तीन मिनिटांत तिकीट बुक करतात. रेल्वेचं आणि बसचं तिकीट ऑनलाइन होतं पण ते विशिष्ट वेळेपर्यंतच करता येतं. आयआरसीटीसीच्या साइटवर रात्री अकराला आरक्षणाची सुविधा बंद होते. एसटीचंही साधारण तसंच. उद्या सकाळी सात वाजता म्हणजे पुढच्या पाच-सहा तासात सुटणाऱ्या गाडीचं तिकीट कसं मिळतं? अशी कुठली साइट आहे जिथे बुकिंग चार्ट तयार झाल्यानंतरही तिकिटं मिळतात. आम्हालाही सांगा. नामवंत उद्योजक मंडळी एसटी किंवा रेल्वेनं जायला लागली तर सगळ्या कार कंपन्यांचं दिवाळंच निघेल त्याचं काय?

– अर्पिताताई जिल्हाधिकारी आहेत. एवढय़ा मोठय़ा पदावरच्या व्यक्तीचा फोन ही संवेदनशील गोष्ट असते. पण त्यांचा फोन त्यांची आई, बहीण कुणीही हाताळतं. घरातल्यांच्या त्या लाडक्या आहेत हे समजू शकतं. अर्पिताताईंच्या फोनवरून आई, बहीण कॉल करतात, घेतात. ही अर्पिताताईंच्या लग्नाची खटपट. पण त्यांना कल्पना दिली जात नाही. अगदी सामान्य घरातदेखील कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींना पालकांनी मोबाइल चेक केलेला आवडत नाही. मोबाइल फोन ही अत्यंत खाजगी आणि वैैयक्तिक गोष्ट आहे. जिल्ह्य़ाची जबाबदारी असणाऱ्या आणि निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीचा फोन इतका सहजी कुठेही ठेवला जातो, घरातले तो वापरतात हे पटणं कठीण आहे. हल्ली अनेकदा मोबाइलचा वापर कामासाठी केला जातो. डॉक्युमेंटेशनची कामं त्याद्वारे केली जातात. असंख्य कामाचे व्हॉट्स अप ग्रुप्स असतात, मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असतो. असं सगळं असलेला फोन अनलॉक करण्यासाठी पासवर्ड किंवा झिगझ्ॉग वालं कोडिंग असणार अशी आमची धारणा होती. पण अर्पिताताईंच्या आई आणि बहीण सहजपणे त्यांचा फोन वापरतात. त्यांनाही पासवर्ड देण्यात आला असेल तर प्रेमाचा पूर म्हणायला हवा.

– ओमदादांच्या घरी पारंपरिक वळणाच्या आजी आहेत. घरातल्या सुनेला आता कोणीतरी मदतीला हवं या भूमिकेतून घरेलू अशी नातसून आजींना हवी आहे. अर्पिताताई आजींना आवडते. पण त्या कलेक्टर आहेत म्हटल्यावर आजींचं मत बदलतं. आजींना नातसून हवीय की घरात २४ तास राबू शकेल अशी कामासाठी बाई हवीय. आजींचं मन मोडणं ओमदादांना पटत नाही. बॉलीवूड स्टाइलच्या लपाछपीच्या गोष्टी झाल्यानंतर अर्पिताताई ओमदादांच्या घरी येतात. त्यांना बोलायला मिळावं म्हणून ओमदादा त्यांना स्वत:च्या खोलीत घेऊन जातात. आजीचं मन मोडू शकत नाही हे धीराने सांगण्याऐवजी ओमदादा स्वत:च मोडून पडतात. रडायलाच लागतात आणि तेही प्रेमात पडलेल्या अर्पिताताईंसमोर. रडणं म्हणजे नामुष्कीचं, कमकुवततेचं, बाईलपणाचं असं आम्हाला वाटत नाही. रडणं ही ओघाने होणारी क्रिया आहे, जी कोणा बाबतीतही घडू शकते. पण एका कंपनीचा सर्वेसर्वा असलेले ओमदादा जेमतेम ओळख झालेल्या अर्पिताताईंसमोर गुडघ्यात डोकं घालून रडतात. भावनिक असावं माणसानं, पण एवढं. कम्फर्ट झोनमधल्या व्यक्तीसमोरच कोणीही रडतं. औपचारिक ओळख झालेल्या व्यक्तीसमोर रडून काय साधणार? गोष्टी बोलून स्पष्ट केल्या तरच पुढे वाटचाल करता येणार ना..

– अर्पिताताईंना बघायला मंडळी येणार म्हणून कार्यक्रम असतो. साधारणत: आमच्या समजुतीप्रमाणे या कार्यक्रमाला ‘कांदेपोहे’ असं संबोधलं जातं. पण इथे वेगळं आहे. अर्पिताताईंना बघायला येणाऱ्या मंडळींसाठी त्यांची आई चिवडा-लाडू तयार करते. चिवडा-लाडू तयार झाले की एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात जाऊन विसावतात. पण एका प्रसंगात प्रशस्त अशा डायनिंग टेबलवर चिवडा आणि लाडू असं पसरून ठेवलेलं असतं. जसं पापड, कुरडया उन्हात वाळवायला ठेवतात तसं. अर्पिताताईंच्या भगिनी आणि त्यांचे बाबा चिवडय़ाचा बुकाणा भरतात, लाडवांची चव बघतात. आता समोर चविष्ट पदार्थ दिसल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटणं साहजिक आहे. हे चिवडा लाडू फक्त पाहुण्यांसाठी आहेत. ते घरातल्यांनी संपवू नयेत म्हणून अर्पिताताईंच्या आई बेडरूममधल्या कपाटात चिवडा लाडूचे डबे ठेवतात आणि कुलूप लावतात त्याला. मुळातच लग्नात आलेल्या मंडळींना घरी जाताना चिवडा लाडू देतात. लग्न ठरतं त्या बैठकीत अजून तरी कांदेपोहे हाच सर्वमान्य आहार आहे. पण तुम्हाला म्हटलं तसं-इथे सगळंच वेगळं आहे.

-ओमदादांच्या वहिनी आहेत. त्यांना झोपायला आवडतं. काम अंगावर पडलं की त्या डाराडूर झोपतात. डिझायनर साडी, मेकअप असं सगळं लेवून दिवसा पांघरूण वगैरे घेऊन झोपतात त्या. पण घरातल्या बाईमाणसाला असं केव्हाही झोपता येतं? उखाळ्या पाखाळ्या करण्याच्या वेळी त्या झोपेतून जाग्या होतात. पण काम पडलं अंगावर की पेंगू लागतात. ज्यांची मुलगी सहावी-सातवीत अशा आयांना दिवसाचे २४ तास कामासाठी पुरत नाहीत. इथं मोठय़ा वहिनी करतील कामं, आपण मस्त झोपू अशा गटाचे प्रतिनिधी आहेत. चंगळवादी संस्कृतीत अशी माणसं आढळू शकतात. पण जिची मुलगी माध्यमिक शाळेत आहे, ती व्यक्ती साहजिकच किंचित मागच्या पिढीची. घरात वडीलधारी माणसं असताना, रात्रभर पुरेशी झोप झालेली असताना, दिवसा पुन्हा कुणी झोपू शकतं? वामकुक्षी एकवेळ ठीक पण सकाळी ऐन घाईगर्दीच्या वेळी काम बाजूला टाकून झोपणं म्हणजे..

– सांगायचं म्हटलं तर असंख्य गोष्टी निघतील. कथानकाला बहरण्याचा उत्तम वाव आहे. विषयाचे कंगोरे उलगडण्याची संधी आहे. चांगल्या कलाकारांची फौज आहे. नेहमीच्या प्रेम, इश्क, मोहब्बत पॅटर्न बाजूला सारून नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण गरज आहे छोटय़ा छोटय़ा गोष्टी अचूक मांडण्याची. पडद्यावरचं जग काल्पनिक आहे अशी पाटी येत असली तरी प्रेक्षकाला जेवढय़ा पडद्यावरच्या गोष्टी पटतात, तेवढीच बघणीयता वाढते. विशिष्ट वेळी मालिका पाहावीशी वाटण्यासाठी सूक्ष्म वाटणाऱ्या पण नंतर मोठं भगदाड पाडू शकणाऱ्या गोष्टी चोख करणाऱ्यावर भर द्यायलाच हवा.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com