04 December 2020

News Flash

खेळवाहिन्यांची बाजारपेठ

स्पोर्ट्स चॅनल्सचा वाढता पायरव टीव्हीविश्वाच्या बदलत्या समीकरणांची नांदी आहे.

टीव्हीवरील इतर चॅनल्सप्रमाणे स्पोर्ट्स चॅनल्सचंही स्वरूप हळूहळू बदलताना दिसतंय. या चॅनल्सची वाढती संख्या, कार्यक्रमांचं बदलतं चित्र, विविध खेळांचं प्रक्षेपण यांमुळे उत्तम निर्मितिमूल्यासह पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. स्पोर्ट्स चॅनल्सचा वाढता पायरव टीव्हीविश्वाच्या बदलत्या समीकरणांची नांदी आहे.

सोनी आणि ईएसपीएन म्हणजे टेलिव्हिजन विश्वातले प्रचंड मोठे ब्रॅण्ड्स. दोन्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी. मात्र यंदाच्या वर्षांत या दोन समकालीन ब्रॅण्ड्सनी एकत्र येत सोनी ईएसपीएन नावाचे चॅनल लाँच केले. भारतात खेळ पाहण्याचे हक्काचे चॅनल म्हणजे स्टार स्पोर्ट्स आणि ईएसपीएन. हजारो भारतीयांना क्रिकेटचं आणि पर्यायाने खेळांचं वेड लावण्याचं काम या चॅनल्सन केलं. २०१२ मध्ये माध्यमसम्राट रूपर्ट मरडॉक यांच्या अखत्यारीतील ईएसपीएनने स्टारपासून अलग होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्पोर्ट्स चॅनलचा प्रभाव कमी होईल अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र घडलं सर्वस्वी उलटं. ईएसपीएनशी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर स्टारने विस्तारीकरणाचा घाट घातला. सगळ्या खेळांना आणि भारतीय क्रीडाविश्वाला व्यापून टाकेल असा हा निर्णय होता. स्टार स्पोर्ट्स १, २, ३, ४ आणि प्रत्येकाचे एचडी चॅनल्स असा प्रचंड सेटअप निर्मिण्यात आला.

क्रिकेटपासून ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धापर्यंत आणि फुटबॉल वर्ल्डकपपासून प्रो कबड्डीपर्यंत असा स्टारचा पसारा आहे. ईएसपीएनशी भागीदारी असतानाही भारतातल्या क्रीडा स्पर्धाच्या प्रक्षेपणावर स्टारचे वर्चस्व होते. मात्र विस्तारीकरणानंतर स्टार समूहाने प्रतिस्पध्र्याना अक्षरक्ष: लोळवलं. एका क्रिकेट मालिकेसाठी आठ ते दहा माजी क्रिकेटपटू समालोचकांचा ताफा, सव्वीसहून अधिक कॅमेऱ्याद्वारे होणारं प्रक्षेपण, सामन्याआधी, मध्ये आणि नंतर एक तासाचे विश्लेषणात्मक कार्यक्रम, मुलाखती असं सर्वसमावेशक कंटेट स्टारने देऊ केलं. यातली मेख म्हणजे आतापर्यंत इंग्रजी प्रमाण मानणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने स्थानिक भाषांमध्ये पाय रोवला. एकाच वेळी एका सामन्याचं इंग्रजीत आणि हिंदीत समालोचन उपलब्ध केलं. सामना सुरू असताना स्कोअरकार्ड आणि अन्य गोष्टी तसंच विश्लेषणात्मक कार्यक्रम स्थानिक भाषेत आणून स्टारने बाजी मारली. एकाच वेळी चार चॅनल्स ताफ्यात असल्याने जगभरातल्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेल्या स्पर्धाचे प्रक्षेपण हक्क मिळवण्याचा विडा स्टारने उचलला. एकदिवसीय तसंच ट्वेन्टी-२० विश्वचषक, बॅडमिंटन सुपरसीरिज, तिरंदाजी विश्वचषक, ऑलिम्पिक स्पर्धा, बॉक्सिंग चॅम्पियनशिप तसंच असंख्य खेळातल्या भारतात होणाऱ्या लीगच्या प्रक्षेपणाची जबाबदारी स्टारकडे आहे. मातीतला खेळ म्हणून कबड्डीला हिणवलं जात असे. मशाल स्पोर्टसच्या प्रो-कबड्डी उपक्रमाला स्टारने प्रक्षेपणाच्या माध्यमातून हातभार लावला. मात्र पहिल्या हंगामातच या खेळाची प्रेक्षकांवरील मोहिनी लक्षात घेऊन स्टारने प्रो-कबड्डीचं पालकत्व स्वीकारलं. आता ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स प्रो-कबड्डी अशी ओळखली जाते. खेळ समजून देणारे ग्राफिक्स, विविध स्थानिक भाषांमध्ये समालोचन, खेळाडूंची माहिती करून देणारे कार्यक्रम, कबड्डी क्षेत्राला वावडं असलेला वक्तशीरपणा या गोष्टींसह स्टारने कबड्डीसाठी कोटय़वधींची गुंतवणूक केली. भारतात स्पर्धा आयोजित करायची असेल तर स्टारला पर्याय नाही अशी मक्तेदारी स्टारने निर्माण केली आहे.

अब्जावधी लोकसंख्या असूनही क्रीडाविश्वातील सर्वोच्च अशा ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याला हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच पदके मिळतात. इतकी कमी पदके का याची कारणं असंख्य आहेत. ही कारणं एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. मुद्दा हा की खेळ खेळण्यापेक्षा खेळ पाहण्यात भारतीय पुढे आहेत. दिवाणखान्यात बसून निवांतपणे आपल्या आवडत्या खेळाचे सामने पाहण्याचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे अब्जावधी लोकसंख्यारूपी मार्केट स्पोर्ट्स चॅनेल्सनी टिपले नसते तरच नवल. जगात क्रिकेट केवळ दहा ते बारा देश खेळतात. क्रिकेटच्या सगळ्या नाडय़ा बीसीसीआयकडे आहेत. भारतीय क्रिकेटपटू खपणीय ब्रॅण्ड आहेत. साहजिकच भारतीय क्रिकेट संघाचे सामने प्रक्षेपणकर्त्यां वाहिनीसाठी हक्काची बेगमी असते. टेनिस रॅकेट धरता येत नसली तरी रॉजर फेडरर श्रेष्ठ की नोव्हाक जोकोव्हिच यावर खमंग चर्चा आपल्याकडे रंगतात. त्यामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धा आपल्याकडे आवर्जून पाहिल्या जातात. रोज ऑफिसला जाताना धावावं लागलं तरी कटकट करणारे भारतीय उसैन बोल्टला बघण्यासाठी हमखास टीव्ही लावतात. भारतीयांच्या मनावरचं स्पोर्ट्स पाहण्याचं गारूड लक्षात घेऊन प्रत्येक स्पोर्ट्स चॅनेलने हजारो कोटी रुपये गुंतवले आहेत. खरंतर स्पोर्ट्समध्ये जीवनमरणाचं असं काहीही नसतं. मात्र जिंकण्यातली चुरस, झुंज, अव्वल प्रतिस्पध्र्यामध्ये रंगणारी टक्कर, सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन हे सामान्य माणसाला प्रेरणादायी असते. स्पोर्ट्स हे लाइफस्टाइल प्रॉडक्ट असलं तरी मुख्य प्रवाहातील चॅनेल्सइतकीच त्यांची लोकप्रियता आहे. हे हेरूनच स्टार स्पोर्ट्स समूहाने २०,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. स्टार स्पोर्ट्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदतर्फे होणाऱ्या स्पर्धाचे पुढील सहा वर्षांसाठीचे प्रक्षेपण हक्क ३८५१ कोटी रुपये खर्चून विकत घेतले आहेत. सोनी समूहातील सोनी सिक्स या नव्या वाहिनीमुळे स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे.

आपल्यासाठी म्हणजे भारतीयांसाठी खेळ पाहणं म्हणजे गंमत, धमाल, थरार वगैरे असलं तरी त्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांची प्रचंड मोठी बाजारपेठ अवलंबून आहे. या चॅनल्समधल्या स्पर्धेमुळे प्रेक्षक म्हणून आपला फायदा आहे. जगातल्या विविधांगी खेळाच्या अधिकाअधिक स्पर्धा उत्तम निर्मितिमूल्यासह पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. केवळ पाहणं या पॅसिव्ह क्रियेशी निगडित असूनही स्पोर्ट्स चॅनल्सचा वाढता पायरव टीव्हीविश्वाच्या बदलत्या समीकरणांची नांदी आहे. बाजारपेठ या पल्याड जाऊन आपण खेळूही लागलो तर हे खेळ पाहणं अंगी लागलं असं म्हणता येईल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:21 am

Web Title: market of sports channels
Next Stories
1 इनसिंक सुरावट
2 चोवीस तासांची अपरिहार्यता
3 पाहणं ‘एपिक’ व्हावं…
Just Now!
X