सासू-सून कटकारस्थानं, प्रेमकथा, ड्रामेबाजी, ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्न्‍स या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मालिकांनी मोर्चा वळवलाय तो ऑफिसकडे. विविध मालिकांमध्ये ऑफिसला केंद्रस्थानी ठेवून कथानक फुलवलं जातंय. ऑफिस हा मालिकांचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
भारतीय माणसं ऑफिसला अतिरिक्त वेळ थांबण्याला प्राधान्य देतात. उशिरापर्यंत थांबलं म्हणजं कामाप्रती अतीव निष्ठा वगैरे आहे असं त्यांना वाटतं अशी एक बातमी वर्षभरापूर्वी समोर आली होती. बातमीत किती तथ्य माहिती नाही, परंतु भारतीय माणसांचा दिनक्रमातला निम्म्यापेक्षा अधिक वेळ कचेरीसाठी जातो. घरी आल्यावरही, सुट्टीच्या दिवशीही त्यांच्या डोक्यात कचेरीतल्या कामांचं चक्र सुरू असतं. आठ-नऊ तास राबताना कचेरीतही अनेक नाती जोडली जातात, ऋणानुबंध घट्ट होतात. नेमकं हेच आता आपल्याकडच्या टीव्ही मालिकांनी टिपलं आहे. म्हणूनच घर, कुटुंब, सासू-सून या कथानकांबरोबरच ऑफिसच्या भोवती रंगणारी कथानकं सादर होत आहेत, हिंदीतही आणि मराठीतही.
बॉलीवूडमध्ये अनेकदा बहुत बडा बिझनेस असतो. तो नेमका कोण आणि केव्हा करतं संपूर्ण चित्रपटात लक्षात येत नाही. साधारण त्याच धर्तीवर मालिकांनीही हीच संकल्पना उचलली होती. घरातल्या बारीकसारीक गोष्टी कथानकात असतात, परंतु माणसं पोटापाण्यासाठी काय करतात याचा मागमूसही लागत नसे. महानगरं, छोटी शहरं आणि अगदी गावातही प्रत्येक माणसाचा नोकरी, व्यवसायापायी प्रचंड वेळ खर्च होतो. त्याविषयी बहुतांशी प्रमाणात अनभिज्ञता दाखवली जायची, पण आता चित्र बदलतं आहे. घराइतक्याच किंबहुना त्यापेक्षा नाटय़मय गोष्टी कार्यालयात घडतात याचा अंदाज आल्याने ऑफिसकेंद्रित मालिका झपाटय़ाने वाढू लागल्या आहेत.
ऑफिस दाखवणं तांत्रिकदृष्टय़ा आणि मनुष्यबळाच्या पातळीवरही कठीण गोष्ट आहे. ऑफिस म्हटलं की सामूहिकता येते. किमान काही विशिष्ट माणसं काम करताना दाखवणं आवश्यक होतं. पात्रं वाढतात, कंगोरे वाढतात. पूर्वी फायली दाखवून पुरेसं व्हायचं, आता संगणक किंवा लॅपटॉप दाखवावा लागतो. केबिन्स, कॉरिडॉर अशा प्रॉपर्टी वाढत जातात. एक कॅन्टीन उभं करावं लागतं, कॉन्फरन्स रूम दाखवणं अनिवार्यच होतं. स्वागत कक्ष, तिथे स्वागताला स्वागतिका, पार्किंग स्लॉट, लिफ्ट, इंटिरिअर असा पसारा वाढत जातो. हे लुटुपुटुचं ऑफिस असतं, आभास असतो, पण तो खरा वाटण्यासाठी खूप गोष्टींची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. सासू-सुनांच्या मालिका दाखवून कंटाळलेल्या वाहिन्या आणि निर्माता ऑफिस मांडण्याचं धाडस सातत्याने करत आहेत.
सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालणं आणि तिथे गेल्यावर टोलवाटोलवीला सामोरे जाणं आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवलं आहे. सरकार कुणाचंही आलं तरी या जाचातून सामान्य माणसाची सुटका झालेली नाही. महालसदृश घरं, सदासर्वकाळ डिझायनर वस्त्रंप्रावरणांमध्ये वावरणारी माणसं, गाडय़ा, नोकरचाकर आणि कोणीही फारसं काहीही काम करत नाही या धाटणीच्या असंख्य हिंदी मालिका सुरू असताना ‘ऑफिस ऑफिस’ मालिका सुरू झाली. पंकज कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या मालिकेने सामान्य माणसाची कहाणी जिवंत केली. कामचुकार, अळंटळं करणारी, कामाच्या वेळेत भलतंच काहीतरी सुरू असणारी, काम करण्यासाठी पैशाची मागणी करणारे असे एकापेक्षा एक नमुने सब टीव्हीवरच्या या मालिकेत पाहायला मिळाले. ऑफिस कल्चरचा चोख अभ्यास, अतरंगी पात्रं, अफलातून अभिनय, कोपरखळ्या लगावताना सामाजिक संदेश देणारं लेखन आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे मालिकेने यशोशिखर गाठलं.
प्रतिमा कुलकर्णीनी दिग्दर्शित केलेली ‘झोका’ ही मालिका ऑफिसमध्ये निर्माण होणाऱ्या नातेसंबंधांवर आधारलेली होती. सुनील बर्वे आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्वत:ची कंपनी असते. या कंपनीत अमृता सुभाष काम करत असतात. कंपनीच्या ग्रेडेशननुसार त्या शेवटच्या पायरीवर असतात. सुनील बर्वे यांचं कॅरेक्टर शिष्टाचार पाळणारं आणि सचोटीने वागणारा असं होतं, म्हणून ते अमृताचा उल्लेख देशपांडे मॅडम असा करतात. अमृता कामात प्रगती करतात, हळूहळू त्यांच्यातलं अवघडलेपण दूर होतं, कार्यालयातल्या अन्य व्यक्तींना या दोघांमधल्या नात्याची जाणीव होते. मग त्यांचं पुढे काय होतं अशी एकूण मांडणी होती. ठरावीक भागात संपलेली आणि आजही रसिकांच्या मनात घर करून राहिलेली अशी ही कलाकृती होती. उत्तम दिग्दर्शन, अफलातून अभिनय आणि कृत्रिमतेचा लवलेशही जाणवू न देता केलेली सहज मांडणी हे या मालिकेचं वैशिष्टय़ होतं.
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘वादळवाट’मध्ये तर एका वर्तमानपत्राचं ऑफिस दाखवण्यात आलं होतं. आबा चौधरी अर्थात अरुण नलावडे संपादक असलेल्या या ऑफिसातल्या क्षिती जोग आणि उदय सबनीस यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. सगळ्यात हॅपनिंग अशा न्यूजरूममध्ये कसं वातावरण असतं हे नेमकेपणाने उभं करण्यात मालिकाकर्ते यशस्वी झाले होते. दोनशे भागांत निरोप घेतलेल्या ‘सांजभूल’ मालिकेतही ऑफिस आणि नातेसंबंधांची गुंतागुंत चांगल्या पद्धतीने मांडली होती.
अंतिम टप्प्यात आलेल्या ‘का रे दुरावा’ मालिकेतल्या ऑफिसमधील मंडळींनीच सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. देव टूर्सचं ऑफिस हा मालिकेचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच हे ऑफिस खरंखुरं वाटावं यासाठी मेहनत घेण्यात आल्याचं जाणवलं. ऑफिस म्हटल्यावर एक प्रतिमा आपल्या डोळ्यात असते. त्या प्रतिमेला साजेसं असं काही दिसलं तरच लोकांना कथानक पटू शकतं. हा मूलभूत विचार करूनच ऑफिसमधली माणसं, खुच्र्या, संगणक, कॉन्फरन्स रूम, केबिन्स, कॉफी मशीन, रिसेप्शन असा संपूर्ण पट उभारण्यात आला. मालिकेतच ऑफिस शिफ्ट झालं. या प्रोसेसमध्ये रिसेप्शनिस्टचा रोल कमी करण्यात आला. या ऑफिसात भरपूर माणसं दाखवण्यात आली. मात्र प्रत्येकाला स्वत:ची ओळख देण्यात आल्याने सगळे जण प्रेक्षकांच्या मनात घट्ट जाऊन बसले. प्रत्येक ऑफिसमध्ये सतत बोलणं सुरू असतं. अनेकदा गॉसिपही चालतं. प्रत्येकाचं एक विश्व असतं आणि त्या सगळ्याचं मिळून एक विश्व असतं. या दोन परस्परपूरक पातळ्यांवरच्या घडामोडी टिपण्यात ही मालिका यशस्वी ठरली. ऑफिस म्हटलं की कल्ला होतो, सेलिब्रेशन असतं, तर कधी सगळ्यांना कडक शब्दांत समज दिली जाते, कधी केऑसरूपी गोंधळ असतो. हे सगळं सहज होतंय, एखाद्या खऱ्या ऑफिसात कॅमेरा लावला तर काय चित्र दिसेल तसं मालिकेतलं ऑफिस बघितल्यावर वाटलं तरच प्रेक्षक कनेक्ट करू शकतात. या मालिकेने हा कनेक्ट अचूक जोडला.
‘अस्सं सासर सुरेख बाई’ मालिकेमध्ये पृथ्वी कन्स्ट्रक्शनचं ऑफिस दाखवण्यात आलंय. कोटींमध्ये डील होणाऱ्या ऑफिसमधले मॅनेजर दबडे इतके हास्यास्पद आणि बाळबोध कसे, असा प्रश्न पडतो. मालक आणि कर्मचारी यांच्यातला समन्वयक माणूस प्रत्येक ऑफिसात असतोच. जबाबदारीचं पद आहे हे. पण मालिकेतल्या दबडेंकडे पाहून असं वाटत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये आणि अगदी मंत्रालयातही हजेरीसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आली आहेत. बहुतांशी कॉर्पोरेट कचेऱ्यांमध्येही हीच पद्धत आहे. पण कोटीकोटींचे डील फायनल करणाऱ्या पृथ्वी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये मात्र बाबा आझमच्या काळातलं रजिस्टरी मस्टर आहे अजूनही. वर्क फ्रॉम होम आणि पेपरलेस ऑफिस अशा संकल्पना रुजत असताना कागदी हजेरी फक्त याच मालिकेत पाहायला मिळते. हिरो-हिरॉइन सोडले तर ऑफिसमध्ये मोजून तीन माणसं दिसतात. बाकी माणसांना चेहरा नाही, संवाद नाही. ऑफिसमध्ये बॉस मंडळी जास्त आणि कर्मचारी कमी असं व्यस्त प्रमाण दिसतं. नेपथ्य म्हणून ऑफिस पटतं, पण सहा महिन्यांत प्रमोशन आणि पगार वाढवणारी कंपनी आहे तरी कुठे हे आम्हालाही सांगा!
नेहा पेंडसे प्रमुख भूमिकेत असलेली ऑफिस कल्चरची धमाल मालिका लाइफ ओके वाहिनीवर ‘मे आय कम इन मॅडम’ सुरू झाली आहे. ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेली आणि मराठी तसेच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केलेली नेहा आता ग्लॅमरस बॉसच्या भूमिकेत आहे. मालिकेच्या प्रोमोनेच लक्ष वेधून घेतलं. आता प्रत्यक्षात मालिका मनात किती इन होते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नोकरीच्या निमित्ताने पुरुष वर्ग आणि आता बहुसंख्य स्त्रियाही बाहेर असतात. घराबाहेरचं हे विश्व अनुभवणाऱ्या प्रत्येकाला ऑफिससंदर्भातील कलाकृती भावतात. आपल्या ऑफिसमध्ये चालणारा जांगडगुत्ता पडद्यावर पाहायला मजा येते. ग्लोबलायझेशनच्या पर्वानंतर ऑफिसचं स्वरूपही पालटलं आहे. अजब वेळांना माणसं काम करतात. सुट्टीच्या दिवशीही काम करतात, घरून तर काम करतातच. कलाकृती मग ती टीव्ही मालिका असो चित्रपट- त्यात सभोवतालचं प्रतिबिंब उमटतं. घराइतकाच खरं तर त्याहीपेक्षा जास्त वेळ माणसं ज्या ठिकाणी व्यतीत करतात ते ऑफिसविश्व आता मालिकांमध्ये दिसू लागलंय. ही सकारात्मक वाटचाल म्हणायला हवी. मात्र त्याच वेळी घरी आणि घरच्यांसाठी दिला जाणारा वेळ कमी होत चालला आहे हेही यानिमित्ताने अधोरेखित होतं आहे. पगार आठ तासांचा आणि बांधिलकी चोवीस तासांची, असं अनेकांना दावणीला बांधलं जातंय. पापी पेट का सवाल या सदराअंतर्गत माणसांना पिळवटून घेणारी ऑफिसेस वाढू लागली आहेत. घरदार सोडून मंडळी ऑफिसनेच व्यापली आहेत हे समीकरण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. मालिकांमध्ये यासंदर्भात कथानकं पाहायला मिळाली तर ते समयोचित ठरेल.
response.lokprabha@expressindia.com