29 November 2020

News Flash

खाद्यमैफल!

आपल्या देशात घरातल्या स्त्रीच्या हाती स्वयंपाकघर असतं. कोणाला काय आवडतं, काय आवडत नाही,

‘आधी पोटोबा’ हे टीव्ही चॅनल्सनी चांगलंच लक्षात ठेवलंय. ड्रामेबाजीच्या विविध चॅनल्ससह आता चोवीस तास सुरू असणारी दोन खाद्यपदार्थाविषयक चॅनल्स मनोरंजन करताहेत. केवळ कृती, साहित्य असा नेहमीसारखा साचा नसल्यामुळे ही चॅनल्स लोकप्रिय ठरली आहेत.

खाणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक. देशाचा कोणताही भाग, प्रांत असो. कोणतीही संस्कृती असो- जेवणासाठी तयारी करणं, जेवण प्रत्यक्षात तयार करणं आणि जेवणं. या मूलभूत प्रक्रियेपासून कोणतंही घर चुकलेलं नाही. ऋतू कोणताही असो, घरात माणसं कितीही असोत-स्वयंपाकघर सतत सुरू असतं. यशाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. टीव्ही विश्वाला या अहर्निश सुरू राहणाऱ्या विविधांगी प्रक्रियेने भुरळ पाडली नसती तरच नवल. टीव्हीला घटनांमध्ये नाटय़ लागतं, वैविध्य लागतं. ते सगळं खाद्यसंस्कृतीत आहे.
आपल्या देशात घरातल्या स्त्रीच्या हाती स्वयंपाकघर असतं. कोणाला काय आवडतं, काय आवडत नाही, डब्यात काय द्यायचं, ज्येष्ठ नागरिक घरात असतील तर कोणते पदार्थ करायचे, साठवणीचे पदार्थ कधी करायचे हे सगळं घरातली स्त्री ठरवते. मात्र भारतीय टेलिव्हिनजवर सुरू झालेला पहिला रेसिपी अर्थात कुकरी शो- संजीव कपूर या एका पुरुषाने सुरू केला. आमच्याकडे बायकाच स्वयंपाक करतात सगळा. ही नसती थेरं नाही आमच्याकडे असा उपरोधिक स्वर त्यावेळी लागला होता. अनेक बायकांनीही नापसंती दर्शवली होती. मात्र संजीव कपूर यांचं लाघवी बोलणं, त्यांच्या कामातली व्यावसायिकता, गृहिणीप्रमाणे स्वयंपाकघराची खडान्खडा माहिती यामुळे प्रेक्षकांचं मतपरिवर्तन झालं. जेवण बनवणाऱ्या पुरुषाला आचारी असं आपल्याकडे म्हटलं जातं. ज्या कार्यक्रमासाठी त्याला पाचारण केलंय तेवढय़ापुरता आचाऱ्याला मान मिळतो पण एरव्ही आचारीगण दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहतो. आचाऱ्याला बल्लवाचार्य करण्याचं महत्त्वाचं काम संजीव कपूर यांनी केलं. संजीव यांचा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर गेला. याच कार्यक्रमाने टीव्ही विश्वात रेसिपी कार्यक्रमांची रुजवात केली. आज बहुतांशी चॅनल्सवर कुकरी कार्यक्रम असतात. त्यात बहुतांशी पुरुष शेफ पदार्थ दाखवतात. चॅनलवरच्या एखाद्या कुकरी शोपासून आता २४ तासांचे पूर्णवेळ चॅनल प्रक्षेपित होत आहेत. टीव्हीवरच्या दोन चॅनल्सची भ्रमंती.
फूड फूड
संजीव कपूर, मलेशियास्थित अ‍ॅस्ट्रो ओव्हरसीज लिमिटेड आणि मोग कन्स्लटंट्स यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे फूड फूड हे चॅनल. जानेवारी २०११ मध्ये या चॅनलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. स्वत: संजीव कपूर चॅनल कर्त्यांपैकी एक असल्याने उत्तम कार्यक्रमरूपी पदार्थ मिळणार याची खात्री होती आणि झालंही तसंच. ‘कुक स्मार्ट’ कार्यक्रमाद्वारे संजीव कपूर स्वंयपाकघरात स्मार्ट काम करण्याच्या युक्त्या सांगतात. स्वयंपाक नवीन शिकणाऱ्यांसाठी, स्वयंपाकाचं प्रमाण अचानक वाढल्यास, बॅचलर्स मंडळींसाठी, कामातून फुरसत मिळाल्यानंतर स्वयंपाकाची आवड जोपासणाऱ्यांसाठी हा शो उपयुक्त आहे. स्वयंपाकघरात फजिती न होता पदार्थ व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण सगळ्यांनाच कामात सफाईदारपणा आणता येत नाही. अशा समस्त वर्गासाठी संजीवजींच्या टीव्हीवरल्या वर्गात उपस्थित राहणे श्रेयस्कर. मुलांचा डबा हा आईवर्गाची कसोटी पाहणारा क्षण. अगदी हाच विचार डोळ्यांसमोर ठेऊन ‘मम्मी का मॅजिक’ नावाचा कार्यक्रम सादर होतो.
काही वर्षांपूर्वी व्हर्लपूलच्या जाहिरातीद्वारे घराघरांत पोहचलेली अमृता रायचंद कार्यक्रमात विविध पदार्थ करुन दाखवते. डिझायनर कपडे, अ‍ॅक्सेसरीज, भरपूर मेकअप अशी आई आपल्या घरात स्वयंपाक करत नाही. परंतु हा कार्यक्रम आणि एकूणच चॅनल सधन वर्गासाठी (जिथे मेड स्वयंपाक करतो/ करते आणि घरातली स्त्री ऑकेजनली स्वयंपाक करते) असल्याने आपल्याला हा बदल स्वीकारून कार्यक्रम पाहावा लागतो. प्रवाही बोलणं आणि स्वत: लहान मुलाची आई असल्याने अमृता सोपे, सुटसुटीत पदार्थ दाखवते. आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्तरानुसार जे शक्य होईल आणि पटेल ते आपण नक्कीच अंगीकारू शकतो. ‘खाता रहे मेरा दिल’ अशा अतरंगी नावाचा कार्यक्रम आहे. गोलगप्पू सदरात मोडणारा अँकर गुरपाल सिंग आपल्याला विविध शहरांतल्या रस्त्यावरच्या फूड जॉइंट्सची सफर घडवतो. दिवाणखान्यात बसल्याजागी इंदूरपासून गुवाहाटीपर्यंत रस्त्यावर कुठे काय चांगलं खायला मिळतं हे समजत असेल तर का सोडा. काही वर्षांपूर्वी एनडीटीव्ही इंडियावर विनोद दुआ यांचा ‘जायका इंडिया का’ नावाचा अफलातून कार्यक्रम लागायचा. शुद्ध हिंदीतलं मिठ्ठास समालोचन, पदार्थाबरोबर परिसर-प्रांताची संस्कृती समजावून देत घडणारी खाद्यमैफल लक्षात राहणारी होती. साधारण त्याच धर्तीवर खाता रहे मेरा दिल आहे. ‘अर्बन तडका’ नाव आपल्याला परिचित आहे. पण ‘टर्बन तडका’ म्हटल्यावर पंजाबी बल्ले बल्ले असणार वाटताय ना- अगदी बरोबर आहे. पंजाब दा पुत्तर हरपाल सिंग खास भारतीय पदार्थ दाखवतात आणि तेही गाणी, गप्पा गोष्टींसकट. त्यांचं ‘नमक शमक डाल देते है’ हे ट्रेडमार्क वाक्यही प्रसिद्ध झालंय.

झी खाना खजाना
झी समूहात असंख्य प्रकारचे चॅनल्स आहेत. मात्र खाण्यापिण्यासंदर्भात चॅनलची उणीव होती. ही पोकळी भरून काढली झी खाना खजानाने. कुठलंही चॅनल तग धरण्यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळ लागतं. या चॅनलच्या मागे झीसारख्या मोठय़ा ब्रॅण्डची छत्री आहे. त्यामुळे चॅनलवरच्या कार्यक्रमांची निर्मिती करताना आर्थिक चिंता नाही आणि म्हणूनच वैविध्यही आहे. ‘किफायती किचन’ नावाचा एक रंजक कार्यक्रम आहे. शेफ पंकज भदौरिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे प्रेक्षकांच्या खिशाला परवडू शकतील अशा साहित्याच्या आधारे पदार्थ तयार केले जातात. अनेकदा चॅनलवरच्या कुकरी शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी महाग असतात. काही साहित्य सहजपणे उपलब्ध होतं असंही नाही. या गोष्टींचा विचार करूनच या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना परवडू शकतील असे बजेट स्मार्टफोन्स असतात तसा हा बजेट कुकरी शो आहे. खंडप्राय क्षेत्रफळाच्या देशाची अनोखी खाद्यसंस्कृती आहे. प्रत्येक राज्य, प्रांत यांची खास खाद्यओळख आहे. ही ओळख समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘द ग्रेट इंडिअन रेसिपी’. पारंपरिक खाद्यपदार्थाचा घेतला जाणारा धांडोळा हे कार्यक्रमाचं वैशिष्टय़.

केवळ पदार्थ तयार करणं म्हणजे कुकरी शो असा आपला समज असतो. पण साचेबद्ध संकल्पनांच्या पल्याड जाण्याचा प्रयत्न ‘वर्ल्ड ऑफ फूड’ कार्यक्रमात केला जातो. जगभरात नवनवीन विकसित होणारे फूड ट्रेंड्स, सवयी, पद्धती याविषयी माहिती दिली जाते. देशात अनेकदा फूड फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. तिथे जाऊन तिकडच्या वातावरणाची झलक कार्यक्रमात मिळते. अनेकदा विविध कंपन्या स्वत:चं प्रॉडक्ट लाँच करतात. या खाद्यपदार्थामागचा प्रवास उलगडला जातो. थोडक्यात पदार्थामागचं अ‍ॅकॅडेमिक्सची माहिती देणारा हा कार्यक्रम ज्ञानवर्धक आहे. महाराष्ट्राच्या चविष्ट खाद्यपदार्थाची ओळख करून देणारा ‘मेन्यूज ऑफ महाराष्ट्र’ कार्यक्रम आपल्यासाठी घरचाच. सेलिब्रेटी आणि त्यातही चित्रपटात काम करणारे सेलिब्रेटींविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना प्रचंड स्वारस्य असते. ही नस ओळखून ‘फिल्मी रसोई’ नावाचा कार्यक्रम या चॅनलने तयार केलाय. एक अभिनेता किंवा अभिनेत्री पदार्थ तयार करतो, तो करता करता गप्पाही मारतो. चित्रपटात विशिष्ट पात्र रंगवणारा नायक किंवा नायिका प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घेण्याची संधी का सोडा. ‘एबीसी अर्थात ऑल अबॉट कुकिंग’ नावाचा खमंग कार्यक्रम आहे. अभिनेत्री गुरदीप पुंज रीतसर पदार्थ तयार करते. या कार्यक्रमासाठीचं स्वच्छ, टापटीप आणि बहुरंगी किचन डोळ्यांना सुकून देणारं आहे.
प्रत्येक माध्यमाचा यूएसपी अर्थात युनिक सेलिंग पॉइंट असतो. प्रेक्षकांना साधारण काय आवडतं याचे ठोकताळे चॅनल्सकरवी पक्के झालेले असतात. रेसिपी शोज सध्या ट्रेंडिंग आहेत. कुठलंही हिंदी किंवा भाषिक चॅनल लावलंत तर दिवसातून किमान दोनदा रेसिपी कार्यक्रम असतो. अर्थात अध्र्या तासाच्या कार्यक्रमाला मर्यादा असतात. २४ तासांची फक्त स्वयंपाकाला वाहिलेली चॅनल्स निघाल्याने खाण्यापिण्यासंदर्भात र्सवकष आणि वेगळा विचार अनुभवायला मिळतोय. खाण्याबरोबरंच कसं खायचं, किती खायचं, केव्हा खायचं यासंदर्भातही उपयुक्त माहिती मिळू लागलेय. पदार्थाबरोबरच सभोवतालची संलग्न संस्कृतीही समजून देण्याचा प्रयत्न दिसतोय. स्वयंपाकघराला प्रयोगशाळा म्हटलं जातं. दररोज असंख्य परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स इकडे शिजतात. काही गोष्टी मागे पडतात, काही नव्या सुरू होतात. करण्याची पद्धत बदलते. आपल्याला आपल्या जात, धर्म, पंथ, परिसर, प्रांतापुरता माहिती असतं. परंतु आपल्या अफाट पसरलेल्या देशाच्या कानाकोपऱ्यात काय खातात, पितात आणि देशाच्या पलीकडे अन्य देशांमध्ये कोणती खाद्यसंस्कृती आहे, कुठल्या पदार्थाचा विशेषत्वाने उपयोग होतो, आपल्या वस्तूंची गुणवैशिष्टय़े असणारे कुठले पदार्थ ते वापरतात यासंदर्भात कार्यक्रम सुरू झाल्याने आपली कक्षा रुंदावते. २४ तास चॅनल चालवायचा म्हणजे वेळेची जागा भरणं आलंच. सगळेच कार्यक्रम खुशखुशीत नाहीत. सगळेच पदार्थ फक्कड झाले तर काय खाऊ आणि काय नको असं होतं. तशी वेळ हे दोन चॅनल पाहताना येत नाही. काही कार्यक्रम साचेबद्ध संकल्पनांवरच आधारित आहे. आपण सत्त्व निवडायचं.

पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2016 1:01 am

Web Title: popular 24 hour food channel
Next Stories
1 खेळवाहिन्यांची बाजारपेठ
2 इनसिंक सुरावट
3 चोवीस तासांची अपरिहार्यता
Just Now!
X