29 October 2020

News Flash

प्रमोशनचा बाजार आणि चांगभलं…

नवीन चित्रपट येतोय हे आता रिअ‍ॅलिटी शो आणि मालिका बघूनच कळतं.

नवीन चित्रपट येतोय हे आता रिअ‍ॅलिटी शो आणि मालिका बघूनच कळतं. ‘आमचा सिनेमा येतोय’ हे सांगण्यासाठी सिनेमातल्या कलाकार आणि इतर लोकांची फौज अशा कार्यक्रमांमध्ये येऊन पोहोचते. हा प्रमोशनचा कार्यक्रम तो सिनेमा प्रदर्शित होईस्तोवर सुरूच असतो. कधी या तर कधी त्या चॅनलवर ही फौज दिसत असते. सिनेमा कसा आहे यापेक्षाही त्याचं प्रमोशन आता महत्त्वाचं झालं आहे.

‘बोंबलणाऱ्याची काकडी खपते, पण गप्प राहणाऱ्याचा हापूसही पडून राहतो’ अशी एक म्हण आपल्या मराठीत आहे. म्हणूनच विपणन अर्थात मार्केटिंग फार महत्त्वाचं. आता जमानाच असा आलाय की वस्तूच्या उत्पादन खर्चापेक्षा मार्केटिंगचा खर्च जास्त असतो. बऱ्या मराठीत याला प्रमोशन असं म्हणतात. चित्रपट, मालिका दृकश्राव्य माध्यम. संवाद, ध्वनी, चित्र यांचा एकत्रित परिणाम दोन्हीमध्ये असतो. नाणं खणखणीत असेल तर हवंय कशाला प्रमोशनरूपी जाहिरात असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तिथेच तुम्ही चुकताय- कथा भारी असो, संवाद खमंग असोत, सिनेमॅटोग्राफी अफलातून असो, कॉस्च्युम एक नंबर असो- या सगळ्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही प्रमोशन दणक्यात करीत नाही. चित्रपट म्हणजे ७० एमएमचा पडदा. पण त्याचं लोकांपर्यंत पोहोचणं त्याच्या निम्म्या आकाराच्या छोटय़ा पडद्यावर अवलंबून आहे. मराठी असो किंवा हिंदीत असे प्रमोशनचे बाजार तयार झालेत. वृत्तवाहिन्याही यामध्ये मागे नाहीत.

शंकराचे दर्शन घ्यायचे असेल तर आधी नंदीला नमन करून पुढे जावे लागते. तद्वत चित्रपट अथवा मालिका खपवायची म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत न्यायची असेल तर या प्रमोशनचा बाजारहाट करावाच लागतो. बरं नंदी अजातशत्रू असतो. नमन करणाऱ्या प्रत्येकाला तथास्तू म्हणतो. प्रमोशनच्या बाजारात काहीही करावं लागू शकतं. जराही हसायला न येणाऱ्या विनोदावर गडबडा हसायचं, जमल्यास खुर्चीतून पडलो हसता हसता असं दाखवायचं, स्त्रीवेशात वावरणाऱ्या आणि बऱ्यापैकी बीभत्स दिसणाऱ्या पुरुषांना सहन करायचं. समस्त इंडस्ट्रीमध्ये स्त्रियांचे प्रमाण एकदमच घटले आहे असे वाटावे इतकी पुरुष मंडळी स्त्रीवेशात असतात. एखाद्या भागात समजू शकतो. परंतु प्रत्येक भागात पुरुष कलाकारांना स्त्री व्हावंच लागतं, कथानकाची गरज या सबबीखाली.

कलाकारांचं वय, कर्तृत्व, अनुभव कितीही असो- प्रमोशनच्या बाजारात त्यांना कुठल्याही सवंग विनोदाला, चमचा-गोटी स्पर्धाना, आचरट अंगविक्षेपांना सामोरं जावं लागतं. साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीला कॅब्रे गाण्यावर डान्स करावा लागतो. एखाद्याला विशिष्ट कौशल्य येत असेल तर ठीक, पण ज्याला जे येत नाही तेच करावं लागतं. उदा. ज्याला जराही नाचता येत नाही त्याला जॅझ, लावणी करायला लागू शकते. बरं या सगळ्या जांगडगुंत्यात रागवायचं नाही, संयम ढळू द्यायचा नाही. तुमच्या संयमाची परीक्षा असं समजायचं. आणि निघताना एवढं एन्जॉय केलं यासदृश वाक्यंही म्हणायची. आणि कार्यक्रम सुरू असताना तो किती भन्नाट आहे अशा आशयाचं ‘हूहूहूहूहू’ असं ऱ्हिदमिक किंचाळायचं.

प्रमोशनच्या बाजारात साधारण दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि अन्य मंडळी येतात. जाहिरातींच्या कचाटय़ातून या सगळ्यांच्या वाटय़ाला साधारण एखादं मिनिट येतं. वेगळा प्रयत्न आहे, वेगळ्या धाटणीची कथा आहे, वेगळा जॉनर आहे, वेगळा प्रयत्न अशी वेगवेगळी वक्तव्यं प्रमोशनच्या बाजारात वारंवार ऐकायला मिळतात. आलेला प्रत्येक जण वेगळं काही तरी केलंय, मांडलंय म्हणतो परंतु प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर ते किती सरधोपट आहेत याचा प्रत्यय येतो. सगळेच जण वेगळा मार्ग कसा चोखाळतात याचे आम्हाला कुतुहूलरूपी आश्चर्य आहे. साधं, नेहमीचं आहे असं कुणीच म्हणत नाही. एकंदरीत आयुष्यात वेगळंच व्हावं आपण या निष्कर्षांप्रत आम्ही आलो आहोत.

चित्रपटानिर्मित्तीदरम्यान कसंही वातावरण असो. प्रमोशनच्या बाजारात सगळं आटपाटनगरी व्हावंच लागतं. ठरलेल्या दिवशी पेमेंट झालं की नाही, स्क्रिप्टमध्ये बदल झाला, सुरुवातीला मोठा असणारा रोल प्रत्यक्ष चित्रपटात मात्र छोटासा झाला, अशा स्वरूपाचं काहीही घडलेलं असलं तरी आमची केमिस्ट्री किती भारी याच्या मनघडत कहाण्या सांगाव्या लागतात. जराही लॉजिक नसणारी पटकथा, अतक्र्य संवाद, बटबटीत मेकअप हे सगळं सहन करूनही असा रोल मला करायचाच होता, किंवा अमुक दिग्दर्शकाबरोबर मला काम करायचंच होतं असं वारंवार म्हणावं लागतं. चित्रपटादरम्यान खटके उडाले तरी आम्ही कित्ती धमाल केली याचे किस्से सांगणं मस्टच आहे.

ज्या चित्रपटाच्या टीमला हा बाजार आर्थिकदृष्टय़ा तसंच एकूणच झेपत नाही ते अगदीच येरागबाळ्या सदरात जातात. अगदी ऑस्करविजेती कलाकृतीची निर्मित्ती करूनही उपयोग नाही जोपर्यंत या बाजारात तुम्ही येत नाही. गेल्या वर्षभरात प्रमोशनच्या बाजारात न आलेल्या आणि प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची आठवण काढा. तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. कारण प्रमोशनशिवाय चित्रपट म्हणजे हृदयाविना शरीर.

बरं फक्त मनोरंजन वाहिन्यांच्या कार्यक्रमात जाऊन पुरत नाही. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, संकेतस्थळं यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. चित्रपटाशी जराही संबंध नसणारे बालिश, बाळबोध स्वरूपाचे प्रश्न विचारणाऱ्या अँकर्सलाही आदर द्यावा लागतो. ज्यांचा खप दुहेरी आकडय़ात आहे आणि एकूणच पसारा ‘येथेच छापून येथेच प्रसिद्ध’ असा आहे अशा वृत्तपत्राच्या टीमशीही गप्पाष्टक रंगवावे लागते. चावट आणि आंबटशौकीन बातम्यांवर कामकाज ढकलणाऱ्या संकेतस्थळांच्या कार्यालयांना भेट द्यावी लागते. तेचतेच प्रश्न असले तरी वेगवेगळ्या स्वरूपात उत्तरे देण्याची शैली विकसित करावी लागते.

प्रमोशनच्या बाजाराच्या पायरीमुळे गुणात्मक वाढ झालेली नाही. अगदी आता म्हणजे पाच वर्षांपर्यंत चित्रपट, मालिका यायच्या ते थेट. चित्रपटगृहात जाऊन पाहिल्यावर किंवा टीव्हीवर मालिका पाहून आपण आपलं मत ठरवू शकायचो. आता गोबेल्स तंत्राचं प्रमोशन होतं. एखाद्या मोठय़ा बॅनरचा किंवा कलाकाराचा चित्रपट असेल तर सहा महिने आधी वादाची राळ उडवून दिली जाते. निगेटिव्ह पब्लिसिटी वर्क्स असं म्हणतात. जेवढं नकारात्मक तेवढी जास्त प्रसिद्धी. कलाकृती घडवताना अतिरेकी प्रमोशन चित्रपटाचं किंवा मालिकेचं यश ठरवतं. प्रसिद्धी व्हायला हवी, लोकांना कळायला हवं हा मूलभूत हेतू बाजूला राहून प्रेक्षकांच्या मनावार आदळायला हवं हा नवाच फंडा विकसित झाला आहे. बसच्या पृष्ठभागावर, ट्रेनच्या डब्यांवर, स्टॅण्ड, स्टेशन्स, चौक, चौपाटय़ा इथे भल्याथोरल्या आकाराचे फ्लेक्स असतात. तुम्ही टीव्ही लावा, कोणताही चॅनेल लावा- एखाद्या तरी कलाकृतीचं प्रमोशन सुरू असतं. रिमोटनं चॅनेल बदला- तीच टीम आणखी कुठे तरी असते. मग पेपर पाहा- तिकडेही तेच. कलाकृती पाहण्यासाठीचा हा अट्टहासी जाच का करावा लागतो याचा विचारही कलाकृती निर्मितीवाल्यांनी करायला हवा.

ज्यांच्या नावावर चालेल, असे कलाकार किंवा एकहाती चालेल अशी सकस कथा आता दुर्मीळ गटात आहेत. आतली वस्तू दर्जेदार नसली की वेष्टन आकर्षक बनवावं लागतं असं म्हणतात. अपवाद सोडला तर बहुतांशी मराठी चित्रपट एका आठवडय़ात गाशा गुंडाळतात. चित्रपटाच्या सुमार दर्जापेक्षाही पायरसीची कीड याला कारणीभूत आहे. प्रमोशनपेक्षाही गटतट बाजूला ठेवून या कारणासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याच वेळी प्रेक्षकाला वेळ असतो आणि खिशात पैसा असतो तेव्हा चित्रपट प्रेक्षागृहात नसतो अशी स्थिती येते. यासाठी छोटी थिएटर्स किंवा चालत्या गाडय़ांमध्ये थिएटर्ससारख्या रचनेचा विचार व्हायला हवा. पिक्चरचं दणक्यात प्रमोशन झालं नाही म्हणजे चित्रपट वाईट असं सामान्य प्रेक्षकाला वाटतं आणि या गडबडीत प्रमोशन न झालेल्या पिक्चरचं मातेरं होतं.

प्रमोशनच्या बाजारामुळे कलाकृतीबाबत निकोप विचार करण्याची आपली वृत्ती कमी होत आहे. कारण चित्रपटाबद्दल एवढं बोललेलं आणि छापून आलेलं असतं की नवं काही तरी पाहिल्याचा अनुभव कोऱ्या पाटीसह घेता येत नाहीत. अनेकदा मार्केटिंगचं गिमिक म्हणून प्रमोशनची दिशा लव्ह, इश्क, मोहब्बत, प्रेमाचे त्रिकोण, चौकोन अशी असते. परंतु प्रत्यक्षात चित्रपट त्यापल्याडही असतो. याने चित्रपटाचं नुकसान होतं. नावडणारा विषय वज्र्य म्हणून चित्रपटावर फुल्ली मारली जाते. प्रेक्षक म्हणून प्रमोशनच्या बाजाराने दिशाभूल होऊ शकते. तसंही बाजारात, जत्रेत हरवतात माणसं. प्रमोशनच्या बाजारामुळे विचार भरकटू शकतात.

पैसा प्रत्येकाला प्यारा आहे. पोटाच्या खळगीसाठीच आपण सगळं करतो. परंतु गुंतवलेला पैसा, ओतलेले पैसे परत तेवढय़ाच किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात परत यायला हे यांत्रिक उत्पादन नाही. हाडामासाच्या माणसांची गोष्ट आहे. आवडनिवड आहे आणि सवडही. आपली कलाकृती सर्व स्तरांपर्यंत पोहोचावी हा दृष्टिकोन बरोबरच परंतु प्रमोशनच्या बाजारात जाणं अपरिहार्यता व्हायला नको.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:08 am

Web Title: promotion on tv
Next Stories
1 मालिका गॅझेट्सच्या जाळ्यात…
2 खाद्यमैफल!
3 खेळवाहिन्यांची बाजारपेठ
Just Now!
X