News Flash

चोवीस तासांची अपरिहार्यता

जागतिकीकरणाचा रेटा येण्यापूर्वी टीव्हीचे स्वरूप बाळबोध होते.

पूर्वीसारखा रात्री नऊ वाजल्यानंतर दिसणारा इंद्रधनुष्यी पट्टा आता टीव्हीवर नसतो. ठरावीक तासांसाठी टीव्हीसमोर बसण्याचा नियमही आता नाही. आता चोवीस तासही कमी पडतील अशी स्पर्धा टीव्ही माध्यमात दिसून येते. दिवस-रात्र सुरू असणाऱ्या या माध्यमाकडे खरंच इतका मजकूर असतो का?

जागतिकीकरणाचा रेटा येण्यापूर्वी टीव्हीचे स्वरूप बाळबोध होते. वाहिन्यांची संख्या मर्यादित होतीच पण प्रक्षेपण कालावधी ठरावीकच होता. सरकारी वाहिनीवर तर नऊ वाजल्यानंतर इंद्रधनुष्यी पट्टा यायचा. आजचे दुकान संपले, आता उद्या असा त्याचा अर्थ होत असे. आपण जसं जेवून खाऊन झोपतो तसं टीव्हीही आराम करतो, अशी प्रेक्षकांची श्रद्धा होती. कोणालाही त्यात वावगं वाटत नसे. पण भारतीय माहिती तंत्रज्ञान विस्तारलं, परकीय गुंतवणुकीला चालना मिळाली, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स रुजू लागले आणि कधीही बंद न होणारा पेटारा अशी टीव्हीची ओळख झाली.

सामाजिक संरचनेत दिवस-रात्र चालणाऱ्या सेवा असतात. डॉक्टर आणि पर्यायाने रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलीस, प्रसारमाध्यमे, दुध केंद्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचा त्यामध्ये समावेश होतो. डॉक्टर आणि हॉस्पिटले माणसाच्या जीवन-मरणाशी निगडित असतात. अग्निशमन केंद्राचंही तसंच आहे. खाण्यापिण्याची सोयी-सुविधा यामध्येच मोडतात. दळणवळणाची साधन माणसाला कायमच लागतात. परंतु टीव्हीचं तसं काहीच नाही. वृत्तवाहिन्यांसकट सर्व वाहिन्यांनी २४ तास प्रक्षेपणाचा विडा उचलला. पण खरंच दिवस आणि रात्रीचेही सगळे तास दाखवण्याएवढा मजकूर असतो का, हा खरा प्रश्न आहे.

वृत्तवाहिन्यांचा अभ्यास केला तर एक बातमी २४ तासांत किमान १३ ते १४ वेळा दाखवली जाते. एक्सक्लुसिव्ह वगैरे काही असेल तर मग अगणित वेळा. गंमत म्हणून एखाद्या दिवशी रात्री १२ ते पुढच्या दिवशीचे रात्रीचे १२ अशी एखादी वृत्तवाहिनी पाहा. दोन-चार तासांत तुम्हाला बातम्या, त्यांचा क्रम आणि तपशील पाठ होईल. आपणही अँकर होऊ शकतो असा विश्वास तुम्हाला वाटू शकतो. भाषिक अर्थात प्रादेशिक भाषांतल्या वृत्तवाहिन्यांचा टार्गेट ऑडिअन्स ठरलेला असतो. उगाच वेळ घालवायचा आहे म्हणून दूर कुठल्या तरी राज्यातलं किंवा कंबोडिया, चिली देशातल्या बातम्या दाखवून उपयोग नसतो. मग आहे त्या मजकुरातच खेळावं लागतं आणि मग रिपीटचाच खेळ रंगतो. फारच कमी बातम्या अशा असतात ज्यात काही अपडेशन, वाढीव माहिती येते. बरेचदा घटना घडते आणि एकगठ्ठा बातमी केली की विषय संपतो. कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम करवून घेणं हे प्रसारमाध्यमातल्या प्रत्येक संस्थेचं ब्रीद असतं. साहजिकच कामाचा बोजा प्रचंड असतो. साधारण मराठी वृत्तवाहिन्यांवर रात्री अकरा किंवा बारा वाजेपर्यंत लाइव्ह बुलेटिन सुरू असतात. नंतर सकाळी सात वाजेपर्यंत रिपीटच सुरू असतं. अगदीच काही जीवन-मरण सदृश घडलं तरच लाइव्ह बुलेटिन दिलं जातं. म्हणजे बारा ते सात रिपीटचा खटाटोप कशासाठी? दिवसभर बातम्यांचा रिपीट रतीब असतोच आणि रात्रीच्या खेळातही तेच. म्हणजे विचार करा- आपण अगदी रिपीट प्रेक्षक आहोत याची तुम्हाला जाणीव होईल. सगळे प्रेक्षक सगळी बुलेटिन्स पाहत नाहीत. प्रत्येक बुलेटिनला स्वतंत्र नवीन अर्थात पहिल्यांदा ती बातमी पाहणारा प्रेक्षक असतो. हे त्रराशिक मान्य केलं तरीही रिपीटचा मुद्दा निकाली निघत नाही. असंख्य घरांमध्ये बॅकग्राऊंडला असावं म्हणून वृत्तवाहिन्या सुरू असतात अष्टौप्रहर. ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, तिथे तर बाय डिफॉल्टच सुरू असते वृत्तवाहिनी. कामानिमित्ताने घराबाहेर पडलेला मुलगा, मुलगी, सून, नात किंवा नातू पुन्हा घरी परतेपर्यंत त्यांच्या काळजीपोटी वृत्तवाहिन्या पाहिल्या जातात. आपल्या आजूबाजूच्या जगात वाईट घटनाच जास्त घडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काळजी वाटणं साहजिकच आहे.

आता मोर्चा मनोरंजन वाहिन्यांकडे वळवू या. धार्मिक स्तोत्र किंवा श्लोकांची कशी आवर्तनं करतात तसं एका मालिकेची किमान सहा ते सात आवर्तनं होतात दिवस आणि रात्रभरात. अनेकदा आपल्या लाडक्या मालिकेचा एपिसोड चुकला की प्रेक्षक हळहळतात. मिस केला तो एपिसोड मी असं फोनवरून आणि व्हॉट्सअपवरही सांगतात माणसं. चुकलेला एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक वेगळी वेळ साधतात आणि त्यांना धक्काच बसतो. कारण रात्री विशिष्ट वेळी प्रक्षेपित झालेला एपिसोड त्याची रात्री आणि दुसऱ्या दिवशी असंख्य वेळा दाखवला जातो. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार, वेळेनुसार पाहतो. त्या दृष्टीने हे योग्यच परंतु २४ तास दाखवण्याएवढे कार्यक्रम नाहीत. म्हणूनच हा रिपीटचा खुराक प्रेक्षकांच्या माथी मारला जातो.

पूर्वी डेली सोप अर्थात दैनंदिन मालिका सोमवार ते शुक्रवार असायच्या. शनिवारी दाखवण्याजोगं काही नसल्याने मालिकांचा परीघ शनिवापर्यंत खेचण्यात आला. आता रविवारीही दाखवण्यासारखं काही उरलं नसल्याने सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत एखाद्या मालिकेचे सोम ते शनी एपिसोड्स एकामागोमाग एक दाखवले जातात. कामाच्या दिवशी एपिसोड पाहता न येणाऱ्यांची सोय होते. पण नवीन दाखवण्यासारखं काही नसल्यानेच ही वेळ येते हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. आणि हे विशिष्ट वाहिनीबाबत घडतं असं नाही, प्रत्येक मराठी वाहिनीला असं करणं भाग पडतं. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर सांगितला जातो. एकच चित्रपट रविवारी तीन वेळा दाखवला जातो. म्हणजे २४ तासांपैकी जवळपास निम्मे तास एकाच चित्रपटावर ढकलले जातात.

पुरस्कार सोहळे वाहिन्यांसाठी अगदी आधारवडच. कुठलाही सोहळा किमान तीन तास चालतो. लेटेस्ट हिट ठरलेल्या गाण्यांवर अल्पवस्त्रांकित नायिकांचे परफॉर्मन्सेस आणि जराही हसू न येणारी खरं तर हसं होणारी स्किट्स हे पुरस्कार सोहळ्यांचे गुणवैशिष्टय़ असते. माणूस आहे त्यापेक्षा टीव्हीवर मोठा दिसतो. परंतु वय आणि नायिका या कॅटेगरीला न साजेसा बेढब आकार, बटबटीत मेकअप, नृत्य सदराखाली कराव्या लागणाऱ्या शारीरिक कसरती या सगळ्याला वॉव वगैरे म्हणतात माणसं नाइलाजाने. या प्रकारात वेळही बराच जातो. दर रविवारी कुठला ना कुठला पुरस्कार सोहळा आयोजित होते. जेणेकरून पुढच्या रविवारच्या पाच तासांची सोय होते. आणि भविष्यात गरज भासेल तेव्हा अनेकदा हा पुरस्कार सोहळा कामी येतो. कर्कश आवाज, वैयक्तिक स्वरूपात केल्या जाणाऱ्या टिपण्या, धांगडधिंगा यामुळे बहुतांशी स्किट्स पाहावतही नाहीत.

नवीन देण्यासारखं सकस, कसदार कार्यक्रम हाताशी नसल्याने आता रविवारी जुन्या मालिका दाखवल्या जातात. जुन्या मालिकांची निर्मिती झाली तेव्हाचा आणि आताचा संदर्भ बदलल्याने चुकल्यासारखे वाटते. आजूबाजूला एवढं काही घडत असताना संकल्पना टंचाईने बहुतांशी वाहिन्यांना ग्रासले आहे. रविवारी बऱ्याच लोकांना सुट्टी असते. साहजिकच प्रेक्षक घरी असण्याची शक्यता वाढते. हे ध्यानात घेऊनच सत्यमेव जयतेसारखा कार्यक्रम रविवारी सकाळी प्रक्षेपित करण्यात आला होता. मात्र असा विचार बाकी वाहिन्या करताना दिसत नाहीत. शिळ्या कार्यक्रमांना नवी फोडणीही दिली जात नाही. थोडक्यात गोडी असते. अंथरूण आहे तेवढंच पसारा मांडण्यात शहाणपण आहे. प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी २४ तासांचे दुकान उघडले आहे म्हणून प्रत्येक वाहिनीला तसे करावे लागते. मात्र यातूनच पुन:पुन्हा एकच कार्यक्रम समोर आल्याने रटाळ कंटाळलेपण हाती येते.

जग जवळ आलंय म्हणून सतत पुढे राहण्याची होड सगळ्या वाहिन्यांमध्ये आहे. पण पूर्वी ज्याप्रमाणे ठरावीक वेळी प्रक्षेपण बंद व्हायचे तसा विचार आताही होणे आवश्यक झाले आहे. २४ तास प्रक्षेपणाच्या हट्टामुळे वाहिन्यांसाठी काम करणाऱ्या माणसांची ससेहोलपट होते. आणि हे होताना दर्जाची घसरण होते तो भाग वेगळाच. प्रक्षेपण वेळेवर मर्यादा आणल्यास चांगलं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यासाठी घायकुतीला येण्याची गरज भासणार नाही. टीव्ही विश्वात नवनवे प्रयोग होत असतात. अष्टौप्रहर प्रक्षेपणाचा हट्ट सोडण्याची वेळ आली आहे.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:16 am

Web Title: tv content
Next Stories
1 पाहणं ‘एपिक’ व्हावं…
2 वाहिन्यांचे दोन सकस अपवाद
3 किती सांगायचंय मला
Just Now!
X