शरीरव्याधी आणि मनोविकार यांच्याकडे बघण्याचा आपल्या आरोग्यव्यवस्थेचा आणि एकंदर समाजाचा दृष्टिकोन भिन्न स्वरूपाचा आहे. इतर वैद्यकशाखांप्रमाणे मनोविकृतिचिकित्सेतही औषधोपचार उपलब्ध आहेत. सतत चाललेल्या संशोधनातून दरवर्षी नवनवीन रसायनं प्रकाशात येत आहेत त्या विषयी आजच्या अंतिम लेखात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचकहो, गेले वर्षभर चालू असलेल्या ‘उद्याचे आज’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख. आजवर मी वैद्यकशास्त्रातल्या विविध शाखांमध्ये नव्याने दाखल झालेल्या निदान आणि उपचार पद्धतींवर लिहिलं आहे. तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगतीमुळे यातील बहुतेक गोष्टी साध्य होत आहेत. साहजिकच यातील बऱ्याच गोष्टी खर्चीक, सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरच्या, सध्या तरी काही मोजक्या केंद्रांमध्येच उपलब्ध अशा आहेत. तसंच विशिष्ट उपचार करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची संख्यासुद्धा कमी आहे. असं जरी असलं तरी यांची माहिती आणि उपयोग जसजसा वाढत जाईल तशा या त्रुटी भरून निघतील, असा माझा विश्वास आहे. पुढे यापेक्षा अधिक प्रभावी, कमी खर्चीक आणि सुरक्षित उपचार भविष्यकाळात आल्यास ते जास्त प्रचलित होतील यात शंका नाही. आजवरच्या वैद्यकशास्त्रातील प्रगतीच्या इतिहासात हेच दिसून येतं.
आजचा समारोपाचा मानसशास्त्रातील नव्या विचारधारेबद्दलचा लेख मात्र पूर्णत: वेगळा आहे. मुळात शरीरव्याधी आणि मनोविकार यांच्याकडे बघण्याचा आपल्या आरोग्यव्यवस्थेचा (आणि एकंदर समाजाचा) दृष्टिकोन भिन्न स्वरूपाचा आहे. शारीरिक तक्रारी घेऊन रुग्ण डॉक्टरकडे पोहोचतो तेव्हा त्याला रोग लक्षणं, शरीर तपासणी, तात्पुरते निदान, रक्त-मूत्र-एक्स-रे इत्यादी तपासण्या करून शिक्कामोर्तब झालेलं रोगनिदान आणि मग उपचार या पायऱ्यांवरून जावं लागतं. तातडीच्या उपचार कक्षाचा (इमर्जन्सी रूम) अपवाद सोडल्यास याच पद्धतीचा वापर केला जातो. मनोविकारांच्या बाबतीत मात्र क्रम उलटा असतो. इथे रुग्ण डॉक्टरकडे पोहोचल्यानंतर डॉक्टर रुग्णाचं स्वागत ज्या पद्धतीनं करतो त्या क्षणापासून त्याचा उपचार चालू होतो. इथे मनोविकृत व्यक्ती स्वत:ची लक्षणं बहुधा सांगत नाही तर बरोबर आलेल्या व्यक्ती (पति/पत्नी, नातेवाईक, मित्र, सहकारी, पोलीस वगैरे) त्याच्या ‘चुकीच्या’ वर्तनाची माहिती देतात. ती माहिती ऐकत असतानाच डॉक्टर त्या रुग्णाच्या वर्तनाचं निरीक्षण करत असतो. याशिवाय रुग्णाशी बोलून तो त्याच्या वर्तनाचं स्पष्टीकरण काय देतो हे ऐकणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं.
उदाहरण म्हणून एका दहावीतल्या मुलाची हकीकत सांगता येईल. आजवर बुद्धिमान समजल्या गेलेल्या या मुलानं अचानक त्याची सगळी वहय़ा-पुस्तकं जाळून टाकली, खाईना-पीईना, काही बोलेना. स्किझोफ्रेनिया समजून त्याला विविध औषधं दिली गेली. इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. काही दिवसांनी तो बोलू लागला तेव्हा समजलं की त्याला पुस्तकातली प्रत्येक ओळ दहा वेळा वाचली पाहिजे, प्रत्येक पान दहा वेळा वाचलं पाहिजे, असा मंत्रचळ निर्माण झाला, त्यामुळे वैतागून त्यानं पुस्तकं जाळली. म्हणजे त्याचं रोगनिदान एकदम बदलून गेलं, उपचार बदलले, हे शक्य झालं त्यानं आपल्या वर्तनाचं स्पष्टीकरण दिल्यानंतर. या ठिकाणी डॉक्टरांनीसुद्धा इतर शक्यतांचा विचार करण्याची तयारी दाखवली हे महत्त्वाचं.
या सर्व गोष्टी पहिल्या भेटीत शक्य नसतात. प्रत्येक भेटीत अधिकाधिक माहिती मिळत जाते. निदानप्रक्रिया चालू राहते, निदानस्वरूप बदलत राहतं. वरील ‘चुकीच्या’ वर्तनामुळे रुग्णाला त्याचे दैनंदिन व्यवहार करायला कितपत अडचण येत आहे यावर त्याचे उपचार ठरतात. चिंता, भीती, निराशा, अपराधी भावना, चीड, द्वेष, तोच-तोच विचार इत्यादी सर्व अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवतोच, परंतु यांच्यावर काबू मिळवून आपला दिनक्रम चालू ठेवणं जमत नसेल तर उपचारांची गरज असते. असा रुग्ण खूप उत्तेजित, बडबडा, आरडाओरडा-शिवीगाळ करणारा, हिंसक असेल तर त्याला शांत करणारी औषधं दिली जातात. याउलट तो अगदी निराश, गप्प, एकलकोंडा, घुमा, निष्क्रिय, स्वत:च्या शरीरधर्माचीसुद्धा काळजी न घेणारा असेल तर त्याला उत्तेजना देणारी औषधं वापरली जातात. मात्र ही औषधं हा केवळ ‘लाक्षणिक’ उपचार असतो. याने रुग्ण ‘बरा’ होतो असं नाही. मनोविकार होण्यापूर्वी रुग्ण काय काय करत असे याचा अभ्यास करून त्याला आपल्या अंगभूत क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याइतका सबल करणे हे उपचार करणाऱ्या डॉक्टरचं उद्दिष्ट असतं. बुद्धिमान रुग्णाला आपल्या वर्तनदोषांची कल्पना असते. त्याचं मन ते दोष समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या दोषांशी जुळवून घ्यायला त्याला भाग पाडतं. उदाहरणार्थ, एखाद्याला गर्दी-गोंगाटाची भीती वाटते. तो अशा जागा टाळतो. तो असा व्यवसाय निवडतो ज्यात त्याला एकटय़ाला शांत बसून काम करता येईल. एखाद्याला बंद जागांची भीती वाटते. तो लिफ्टचा वापर करत नाही. प्रसंगी आठ-आठ मजलेसुद्धा चढून जातो. मात्र ही अडॅप्टेशनची-जुळवून घेण्याची प्रक्रिया आहे. ‘बरे’ होणे म्हणजे त्याच्या मनातील तो त्रासदायक विचार आणि ती भावना निघून जाणे, तशा विशिष्ट परिस्थितीतही त्याने कार्यक्षम राहणे.
इतर वैद्यकशाखांप्रमाणे मनोविकृतिचिकित्सेतही औषधोपचार उपलब्ध आहेत. मनाचा अधिवास मेंदूत असतो. मेंदूत अनेक प्रकारची रसायनं सक्रिय असतात. सतत चाललेल्या संशोधनातून दरवर्षी नवनवीन रसायनं प्रकाशात येत आहेत. तसंच ती रसायनं मेंदूच्या कोणत्या विशिष्ट ठिकाणी कार्य करतात ते मेंदूपेशींचे भाग (रिसेप्टर्स)सुद्धा ओळखले जात आहेत. विविध मनोविकारात विशिष्ट रसायनांची पातळी वाजवीपेक्षा कमी किंवा जास्त असते, असं आढळून आलेलं आहे. परंतु एखादा मनोविकार केवळ अमुक रसायनाच्या कमी-जास्त असण्याने होतो (कार्यकारणभाव) असं अद्यापि सिद्ध झालेलं नाही. भविष्यात असे नि:संदिग्ध पुरावे मिळतीलही, परंतु तोपर्यंत मनोविकृतींच्या उपचारात चाललेला वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा वापर हा प्रायोगिक पातळीवरचा, निरीक्षणातून प्रचलित झालेला असाच म्हणावा लागेल. मनोविकारशास्त्राच्या या शाखेला न्यूरोसायकियाट्री असं नाव आहे.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी मांडला गेलेला पण अलीकडे डॉ. रॉबटरे फर्नाडिस आणि सहकारी यांच्या प्रयत्नामुळे जास्त प्रकाशझोतात आलेला आणखी एक विचारप्रवाह रुग्णाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमीकडे आपलं लक्ष वेधतो आहे. कोणत्याही मनोरुग्णाकडे बघताना तो कोणत्या परिस्थितीतून घडत आला आहे, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. माणसाचं व्यक्तिमत्त्व त्याचा देश, वंश, आर्थिक आणि सामजिक स्तर, त्याचं शिक्षण, लिंगभाव, धर्म आणि अध्यात्म याविषयीच्या कल्पना अशा अनेक गोष्टींनी घडत असतं. त्याच्या समाजातील समज-अपसमज, रूढी-परंपरा, त्याला प्रभावित करणाऱ्या व्यक्ती (आई, वडील, शिक्षक, ज्येष्ठ नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित लोक) हे सगळे त्याला घडवणारे, त्याच्यात बदल घडवून आणणारे घटक असतात. भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळ्या देशांत आणि समाजात वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, पाश्चात्त्य देशात माणसं ‘मला राग आला आहे, निराश वाटतं आहे, पश्चात्ताप होतो आहे’ या पद्धतीनं भावना थेटपणे पोहोचवतात. तर पौर्वात्य देशात याच भावनांचं शारीरिक लक्षणात रूपांतर केलं जातं, जसं की-‘माझे हातपाय गळून गेले, डोक्यात मुंग्या आल्या, छातीत धडधडत आहे, बधिर झालो इत्यादी. एखादी उच्चशिक्षित बहुश्रुत अनुभवी व्यक्ती ‘माझ्यावर कोणी करणी केली, लिंबू मारलं’ असं बोलत असेल तर ती खूप गंभीर विकृती ठरेल, परंतु हाच रुग्ण जर दुर्गम ग्रामीण भागातला असेल तर त्याची मानसिक जडणघडणच तशी आहे हे विचारात घ्यावं लागेल.
मानसशास्त्राचा हा प्रवाह (कल्चरल सायकियाट्री) आपल्याला सांगतो आहे की, मनोरुग्णाची सामाजिक-सांस्कृतिक पाश्र्वभूमी जाणून घेतल्यास त्याच्या विकृत वर्तनाचं तो देत असलेलं स्पष्टीकरण डॉक्टरला चांगलं समजू शकेल. औषधोपचाराचा केंद्रबिंदू रुग्ण असावा, असं ठामपणे समजणारे डॉक्टर्स आहेत तसेच शेकडो-हजारो रुग्णांवर केलेल्या विशिष्ट उपचारांच्या निष्कर्षांवर आपण अवलंबून असलं पाहिजे (एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन) असं मानणाराही एक वर्ग आहे. हा वाद तर वैद्यकशास्त्रात निरंतरचा आहे. मात्र या दोन्हीचा समन्वय रुग्णोपचारात केल्यास तो अधिक यशस्वी होईल, असं या मानसशास्त्राच्या विचारप्रवाहातून दिसून येतंय.
एक फिजिशियन म्हणून मला जाणवतंय ते हेच की केवळ मनोरुग्णच का, कोणत्याही शरीरव्याधी झालेल्या रुग्णाच्या बाबतीतही डॉक्टरने ‘एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन’ बरोबर ‘कल्चरल मेडिसिन’चा विचारसुद्धा केला पाहिजे आणि ही सम्यक् दृष्टी ठेवली पाहिजे.

या लेखासाठी विशेष साहाय्य :
डॉ. वासुदेव परळीकर, एम.डी. पीएच.डी., ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ,विभागप्रमुख के.ई.एम. हॉस्पिटल, पुणे paralikarv2010@gmail.com
(सदर समाप्त)
drlilyjoshi@gmail.com

मराठीतील सर्व उद्याचे आज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New trends in psychology
First published on: 26-12-2015 at 01:19 IST