13 August 2020

News Flash

शास्त्र पुनर्रचनेचे

कोणत्याही कारणाने बिघडलेला शरीराचा आकार प्लास्टिक सर्जरीने पुन्हा प्राप्त करता येतोच

कोणत्याही कारणाने बिघडलेला शरीराचा आकार प्लास्टिक सर्जरीने पुन्हा प्राप्त करता येतोच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या अवयवाचं बंद पडलेलं काम पुन्हा सुरू होतं आणि तो रुग्ण एक सर्वसामान्य जीवन आनंदाने जगायला लागतो, हे या शास्त्रशाखेचं योगदान आहे.

प्लास्टिक सर्जरी म्हणजे अधिक सुंदर, बांधेसूद दिसण्याच्या तीव्र इच्छेतून आपणहून करून घेतलेली शस्त्रक्रिया असा बहुतेकांचा समज असला तरी प्लास्टिक हे विशेषण मूळ ग्रीक शब्द ‘प्लास्टिकॉस’ यापासून आलेलं आहे. त्याचा अर्थ आहे घडवणं किंवा आकार देणं, पुनर्रचना करणं. जन्मजात दोष, जंतुसंसर्ग, अपघात, दुखापत, टय़ूमर अशा कोणत्याही कारणाने बिघडलेला शरीराचा आकार प्लास्टिक सर्जरीने पुन्हा प्राप्त करता येतोच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या अवयवाचं बंद पडलेलं काम पुन्हा सुरू होतं आणि तो रुग्ण एक सर्वसामान्य जीवन आनंदाने जगायला लागतो, हे या शास्त्रशाखेचं योगदान आहे.
प्रागैतिहासिक काळापासून प्लास्टिक सर्जरीचे उल्लेख आढळतात. उदा. ख्रिस्तपूर्व २५ ते ३० शतकांपूर्वीचे इजिप्शियन पॅपिरस किंवा ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील सुश्रुत संहिता. व्यभिचार अथवा चोरीची शिक्षा म्हणून कापून टाकलेल्या नाकाच्या दुरुस्तीची पद्धत, तीसुद्धा कपाळाची त्वचा वापरून केलेली दोन्हीकडे सापडते हे विशेष. एकोणिसाव्या शतकात करण्यात आलेली फाटलेल्या टाळूची दुरुस्ती ही आधुनिक प्लास्टिक सर्जरीची सुरुवात म्हणता येईल. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तीव्र भाजण्याच्या जखमांमुळे घायाळ झालेल्या सैनिकांच्या भयानक विद्रूप चेहऱ्यांची पुनर्घडण करून त्यांना पुन्हा माणसात आणायचं काम तत्कालीन शल्यवैद्यांनी केलं. अशा प्रकारे प्लास्टिक सर्जरी ही शल्यविद्येची एक महत्त्वाची शाखा मानली जाऊ लागली.
या शाखेचे दोन मुख्य हेतू आहेत. अवयवाचं बंद पडलेलं काम पुन्हा चालू करणं आणि त्याचा आकार सुधारणं. त्यापैकी पहिला अधिक महत्त्वाचा. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठेही प्लास्टिक सर्जरीची गरज लागू शकते. असं असलं तरी सर्वत्र काही ठरावीक तत्त्वानुसारच या शस्त्रक्रिया केल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे त्वचेवर घेण्याचा छेद हा फार काळजीपूर्वक, त्या अवयवाच्या नैसर्गिक ठेवणीनुसार घेतला जातो, जेणेकरून जखमेचा व्रण उठून दिसणार नाही. शस्त्रक्रियेची हत्यारं नाजूक, कमीत कमी इजा करतील अशी असतात. शस्त्रक्रिया पुरेसा वेळ घेऊन अगदी सावकाश काळजीने केली जाते. काही शस्त्रक्रिया दोन किंवा अधिक टप्प्यात करतात. रुग्णाचं समुपदेशन महत्त्वाचं असतं. त्यानं संयम बाळगला पाहिजे. शस्त्रक्रियेनंतर सांगितलेले व्यायाम आवर्जून केले पाहिजेत. तेलाने मसाज करण्यामुळे त्वचेखाली कोलाजेन हा पदार्थ चांगला आकार घेतो आणि शस्त्रक्रियेचे व्रण जवळजवळ दिसेनासे होतात. रुग्णानं उन्हात जाऊ नये आणि उच्च पोषणमूल्य असलेला आहार घ्यावा म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी व्हायला खूपच मदत होते. भरपूर प्रथिनयुक्त पदार्थ, ताज्या भाज्या आणि फळं, ३-४ लिटर पाणी, दही-दूध-ताक अशा आहारामुळे जखमा लवकर भरून येतात.
प्लास्टिक सर्जन पुष्कळदा इतर अनेक डॉक्टरांच्या टीमचा एक भाग असतो. भारतात मोठय़ा प्रमाणावर सापडणाऱ्या गालाच्या कर्करोगाचं उदाहरण घेऊ. इकडे कर्करोगतज्ज्ञ टय़ूमर काढतो, त्याबरोबर आजूबाजूचा गालाचा भाग- तिथली त्वचा, स्नायू आणि जबडय़ाच्या हाडासकट काढून टाकतो आणि त्याच वेळी प्लास्टिक सर्जन पायाच्या हाडाचा तुकडा, मांडीच्या त्वचेचा तुकडा काढण्याच्या उद्योगात असतो. त्या सामग्रीने गालाजवळ निर्माण झालेला विकृत खड्डा भरून रुग्णाला त्यातल्या त्यात सर्वसामान्य दिसेल असा चेहरा तो देऊ करतो.
जन्मजात व्यंग असलेल्या बाळांमध्ये सर्वात जास्त आढळणारा (६००-७०० मुलांत एक) दोष म्हणजे फाटलेला वरचा ओठ आणि तशीच फाटलेली टाळू. याच्या जोडीला बसलेले गाल आणि चपटे नाक हेही दोष अनेकदा असतात. या नवजात बाळाला पाहिलं की आई आणि बाकी नातेवाईकांना जबर धक्का बसतो. या बाळाला दूध ओढता येत नाही. बाळ आणि आईचं नातं निर्माण होणंसुद्धा कठीण असतं. त्या सर्वानाच समुपदेशनाची गरज असते.
या बाळाचे उपचार दीर्घकाळ अनेक टप्प्यांत करायचे असतात. ४ ते ६ महिन्यांत वरचा ओठ शिवून बंद करतात. बाळ ९-१० महिन्यांचं झालं की, त्याचं बोलणं सुरू व्हायच्या आत टाळू शिवून बंद करावी लागते म्हणजे बाळाचे शब्दोच्चार स्पष्ट होऊ शकतात. याच वेळी टाळूचा आकार नैसर्गिक कमानदार राहील अशी काळजी घेतात. हे मूल १२ वर्षांचं झालं की, त्याचं चपटं नाक सरळ करण्याची शस्त्रक्रिया होते. १८ वर्षांचं झालं की, आत बसलेला जबडा बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया करता येते, कारण तोपर्यंत मुलाच्या चेहऱ्याच्या हाडांची वाढ पूर्ण झालेली असते. हा आता १८ वर्षांचा तरुण असेल तर ओठावरच्या पांढुरक्या व्रणावर मिशीचे केस रोपण करतात. त्यामुळे तो व्रणही लपून जातो. या मुलाच्या एवढय़ा शस्त्रक्रिया झाल्या आहेत असं कळूनही येत नाही.
कधीकधी बाळाला बाहेरचा कानच नसतो. त्या ठिकाणी एखादा छोटासा मांसल तुकडा तेवढा दिसतो. तोच वापरून जोडीला त्याच्या बरगडीतून आवश्यक तेवढा कुर्चेचा (कार्टिलेज) तुकडा काढून त्यातून कान ‘बनवला’ जातो. कानाजवळची त्वचा वापरून त्यावर आवरण तयार करतात. काही मुलांची बोटं जन्मत: चिकटलेली असतात. टप्प्याटप्प्याने ती सोडवून मोकळी करतात. ‘रेडियल क्लब हँड’ या विकृतीमध्ये हाताला अंगठा नसतो. कोणतीही वस्तू पकडण्यासाठी अंगठय़ाची नितांत गरज आहे. अशा वेळी अंगठय़ाजवळच्या बोटाचं म्हणजे तर्जनीचं रूपांतर अंगठय़ात केलं जातं. त्यासाठी तर्जनी फिरवून अंगठय़ाजागी आणतात. मूल वर्षांचं होईपर्यंत या दुरुस्त्या करतात म्हणजे मुलांची प्रगती इतर सामान्य मुलांसारखी होते.
हायपोस्पेडियस हा मुलांचा जन्मजात दोष आहे. यामध्ये मूत्रनलिका शिश्नाच्या टोकाला न उघडता, त्याच्या खालच्या पृष्ठभागावर उघडते. यापैकी बऱ्याच मुलांचं शिश्न खालच्या बाजूला वळलेलं असतं. टोकाची त्वचासुद्धा नीट विकसित झालेली नसते. त्यासाठीच्या शस्त्रक्रियेत शिश्न सरळ केलं जातं. टोकाच्या त्वचेची दुरुस्ती केली जाते. आतमध्ये मूत्रनलिकासुद्धा बनवतात. मुलाच्या गालाच्या आतली त्वचा यासाठी वापरतात. या मूत्रनलिकेचं तोंड शिश्नाच्या अग्रालाच राहील अशी काळजी घेतली जाते. हायपोस्पेडियस हा दोष असलेल्या मुलांपैकी सुमारे १० टक्के मुलांच्या शुक्राणुग्रंथी (टेस्टिकल्स) नेहमीच्या जागेवर नसतात. त्या नेमक्या कुठे आहेत हे शोधून त्यांचीपण शस्त्रक्रिया करावी लागते.
वरील दोषापेक्षा तुलनेने दुर्मीळ स्थिती म्हणजे जन्मजात योनिमार्ग नसणे हा काही मुलींमध्ये सापडणारा दोष. वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रक्रिया करून अशा मुलींना नवा योनिमार्ग मिळू शकतो. सामान्य लैंगिक सुखाला त्या पारख्या होत नाहीत. मातेचं वय ३५ पेक्षा जास्त असणं, मूल होण्यासाठी विविध हार्मोन्सचा उपयोग, धूम्रपान, मद्यपान या गोष्टी अशा दोषांना कारणीभूत असतात, असं तज्ज्ञ निरीक्षकांचं म्हणणं आहे. आपल्या देशात कुष्ठरोगाची समस्या मोठी आहे. प्लास्टिक सर्जरी अनेक प्रकारे अशा रुग्णांना मदत करते.
तुटलेल्या अवयवांच्या पुनजरेडणीसाठी अशाच प्रकारचं कौशल्य गरजेचं आहे. अनवधानाने घरगुती मिक्सरमध्ये अडकून तुटलेली बोटांची अग्रं, उसाच्या चरकात सापडल्यामुळे, लिफ्टमध्ये किंवा अवजड मशिनरीमध्ये अडकल्यामुळे तुटलेला हात, धान्य आणि कोंडा वेगळे करण्याच्या यंत्रात अडकून केसांसकट ओरबाडली गेलेली डोक्याची आणि चेहऱ्याची त्वचा, अशा भीषण अपघातांतून रुग्ण बरा होऊ शकतो केवळ प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्याने.
तुटलेला शरीराचा भाग लगेच स्वच्छ धुऊन, सलाइनमध्ये बुडवलेल्या कपडय़ात गुंडाळून, ती गुंडाळी एका प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवावी. ही पिशवी बर्फावर ठेवून त्वरित प्लास्टिक सर्जरीची सुविधा असलेल्या रुग्णालयात आणल्यास हा अवयवजोड यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. रस्त्यावरील अपघातात बहुधा अवयवाचा चेंदामेंदा झालेला असतो, तर तलवारीसारख्या तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या जखमेत पेशींची हानी तुलनेनं कमी झालेली असते. रुग्ण अपघातानंतर किती वेळाने रुग्णालयात पोहोचतो हेही महत्त्वाचं आहे. शस्त्रक्रियेची यशस्विता या गोष्टींवर बरीच अवलंबून असते.
कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत बहुधा टय़ूमर आणि त्याच्या भोवतालचा बराचसा भाग काढून टाकतात. जबडय़ाचा उल्लेख सुरुवातीला आलाच आहे. स्तनाचा कर्करोग हाही फार मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. टय़ूमरच्या बरोबर बरेचदा संपूर्ण स्तन काढून टाकतात. नंतर त्या ठिकाणी पाठीच्या किंवा पोटाच्या भागाची त्वचा काढून जखमेवर तिचं आवरण घालतात. रुग्णाची इच्छा असल्यास सिलिकॉनचा वापर करून नवीन स्तनाची निर्मिती केली जाते. स्त्रियांना अत्यंत त्रासदायक वाटणारा दुसरा एक विकार म्हणजे प्रमाणाबाहेर मोठे आणि वजनात भारी असे स्तन. त्यामुळे चारचौघात वावरणं कठीण होतं. पाठदुखीचा त्रास होतो. शाळकरी मुलींना लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिक शस्त्रक्रियेमुळे अशा रुग्णांचे हे सारे प्रश्न निकालात निघतात. त्यांना एक सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी मिळते.
दुर्दैवाने आपल्याकडे ‘जळिताची’ प्रकरणे खूप मोठय़ा प्रमाणावर होतात. गॅस सिलिंडरचा स्फोट, स्टोव्हचा भडका उडून भाजणे, फटाक्याच्या स्फोटामुळे होरपळणे, उकळतं दूध किंवा पाणी अंगावर पडणे अशा अनेक गोष्टींमुळे त्वचा कमीअधिक प्रमाणात भाजते. यातले बहुतेक अपघात सर्वसाधारण सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे होतात. कधी हा प्रकार खून किंवा आत्महत्येचा असू शकतो. प्रचंड उष्णतेमुळे त्वचेच्या पेशी नष्ट होतात, जळून जातात, आजूबाजूला पेशींचा दाह होतो. उघडा पडलेला मांसल भाग आखडतो, शरीराचा एक भाग दुसऱ्याला चिकटतो. अशा रुग्णांना त्वरित करण्याचे उपचार आणि जखमा कोरडय़ा झाल्यावर निर्माण होणारी व्यंगे दुरुस्त करण्याच्या शस्त्रक्रिया अशा दोन टप्प्यांत उपचार केले जातात. असे रुग्ण आणि अपघातात अवयव तुटलेले रुग्ण ही बहुधा लहान मुलं किंवा काम करून रोजीरोटी कमावणारे तरुण स्त्री-पुरुष असतात. असे अपघात मुळात होऊच नयेत म्हणून खूप प्रबोधन केलं पाहिजे आणि प्रतिबंधक उपाय योजले पाहिजेत.
लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल विविध माध्यमांतून माहिती येते. समाजात त्याविषयी बरंच कुतूहलसुद्धा असतं; परंतु नेमके किती रुग्ण यासाठी डॉक्टरांकडे येतात हे सांगणं कठीण आहे. ज्या व्यक्ती असे उपचार घेतात, त्या पूर्ण गुप्तता पाळण्याचा आग्रह धरतात. केवळ पुरुष लिंग बदलून त्याचं स्त्रीच्या अवयवात रूपांतर किंवा स्त्री लिंग बदलून त्या ठिकाणी शिश्न तयार करणं एवढं याचं मर्यादित स्वरूप नाहीये, तर त्याच्या जोडीला स्तन काढणे, नवीन बसवणे, चेहऱ्यावर केशरोपण करणं किंवा असलेले केस कायमचे काढणं, नैसर्गिक आवाजात इष्ट बदल घडवून आणणं अशा इतर शस्त्रक्रियासुद्धा रुग्णाच्या इच्छेप्रमाणे केल्या जातात. हे सगळं करण्याआधी त्या व्यक्तीची मनोरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून असे उपचार करण्याची खरोखर गरज आहे का हे बघितलं जातं. सध्या थायलंडमधील बँकॉक शहरामध्ये जगातील सर्वात जास्त लिंगबदल शस्त्रक्रिया होतात.
समाजाचा एक छोटा हिस्सा बऱ्याच श्रीमंत, उच्चभ्रू लोकांनी बनलेला आहे, जे स्वत:च्या शरीरप्रतिमेबद्दल समाधानी नसतात. त्यांच्या सौंदर्याच्या, आकर्षकतेच्या कल्पनांमध्ये बसेल असं शरीर त्यांना पाहिजे असतं. मात्र ही मंडळी रूढार्थाने ‘आजारी’ नसतात. प्लास्टिक सर्जरी हा या लोकांच्या इच्छापूर्तीचा मार्ग असू शकतो; परंतु लेखात वर्णन केलेल्या रुग्णांसाठी प्लास्टिक सर्जरी एक वरदान आहे. वेगवेगळ्या कारणांनी विद्रूप आणि व्यंग असलेल्यांना पुन्हा कार्यक्षम करणारं, सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी देणारं हे शास्त्र आहे, तशीच संजीवक कलासुद्धा. drlilyjoshi@gmail.com

या लेखासाठी विशेष साहाय्य: डॉ. निखिल पानसे, एम.एस., एम.सी.एच. प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, ई-मेल
drnikhilpanse@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2015 2:13 am

Web Title: plastic surgery and bueaty
Next Stories
1 शक्यता दुर्बीण वापराच्या
2 मातृत्व डॉक्टरांच्या मदतीने
3 प्रतिमा आणि वास्तव
Just Now!
X