व्हर्टिगोविषयी आज बदललं आहे ते वैद्यकशास्त्राचं आकलन, रुग्णाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याला होणाऱ्या त्रासाचं मूळ कुठे आहे याचा शोध लावून त्यानुसार उपचार करणं! व्हर्टिगोच्या प्रश्नाला उत्तर आहे हे सांगणारा लेख.
शरीर स्थिती आणि शरीराचा तोल या दोन्ही क्रिया वास्तविक बऱ्याच गुंतागुंतीच्या असल्या तरी आपण त्या अगदी स्वाभाविक समजतो आणि गृहीत धरतो. मात्र एखादे वेळी या गृहीतकात गडबड होते आणि लक्षात येते की सुमारे २० टक्के लोकांना (स्त्रियांना अधिक) हा तोल ढळण्याचा, शरीरस्थिती बिघडण्याचा त्रास कधी ना कधी झालेला आहे. त्यामुळे अचानक खाली पडून दुखापतसुद्धा झाली आहे. चक्कर, घेरी, डोळ्यांपुढे अंधारी येणं, ढकलल्यासारखं वाटणं, गरगरणं, तोल जाणं हे शब्द बरेचदा समानार्थी वापरले जातात.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत वैद्यक व्यावसायिकही खोलात न शिरता ठरावीक ४-५ औषधं आलटूनपालटून वापरीत आणि रुग्णाचं समाधान करीत. अर्थात, ‘अंधारात गोळी मारण्याचा’ हा प्रकार बरेचदा अयशस्वी ठरत असे. परिणामी, दीर्घकाळ ती औषधं घेऊन त्यांचे दुष्परिणाम व्हायचेच, पण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा रुग्ण औषधांवर अवलंबून राही आणि रोजचे व्यवहार एकटय़ानं करणं त्याला अशक्य वाटू लागे. मग कामावर जाण्याची गोष्ट तर दूरच. आता मात्र ही परिस्थिती बदलू पाहते आहे. आज बदललं आहे ते वैद्यकशास्त्राचं या विषयाचं आकलन, शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेला रुग्णाचा अभ्यास आणि त्याला होणाऱ्या त्रासाचं मूळ कुठे आहे याचा शोध लावून त्यानुसार उपचार करणं. आजच्या या लेखात या समस्येला उत्तर आहे हेच सांगायचं आहे.
शरीरस्थिती आणि शरीराचा तोल यावर मेंदूचं नियंत्रण असलं, तरी डोळे, कानाचा आतला भाग, तळपाय आणि पायाचे सांधे या विविध अवयवांकडून मेंदूला सतत शरीर स्थितीची माहिती मिळत असते आणि त्यावरून निर्णय घेऊन मेंदू सांधे आणि स्नायूंना तोल सांभाळण्याविषयी आदेश देत असतो. वयपरत्वे, झीज होऊन किंवा मधुमेहादी विकारामुळे डोळे आणि पायाच्या नसा खराब झाल्यास आंतरकर्णातील व्हेस्टिब्युल या अवयवावर तोल राखण्याची जबाबदारी येऊन पडते. अशातच त्या ठिकाणी काही विकृती निर्माण झाल्यास मेंदूला मिळणाऱ्या संदेशात त्रुटी निर्माण होते आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू होतो. व्हेस्टिब्युलमध्ये तीन अर्धवर्तुळाकृती कॅनॉल्स असतात. त्यात एन्डोलिम्फ नामक द्रव अभिसरित होत असतो. त्या द्रवात बुडलेली संवेदनशील मज्जातंतूंची टोकं सामान्य स्थितीत प्रति सेकंदाला ९०-१०० इतक्यावेळा मेंदूला संदेश पाठवत असतात आणि शरीराच्या स्थितीमध्ये घडणाऱ्या बदलाची माहिती पुरवत असतात. चक्कर येणाऱ्या सुमारे २० टक्के रुग्णांत व्हेस्टिब्युलमध्ये कधी विषाणू संसर्गाने सूज आल्यामुळे, कधी एन्डोलिम्फ द्रवाचा दाब (प्रेशर) वाढल्यामुळे, कधी रक्तपुरवठय़ात खंड पडल्यामुळे, तर कधी तिथे वाढणाऱ्या टय़ुमरमुळे हे मज्जातंतू आपलं काम करीत नाहीत. अशा वेळी दोन्ही कानांतून मेंदूला मिळणाऱ्या माहितीत तफावत पडते, मेंदू गोंधळून जातो आणि तोल जायला सुरुवात होते. बहुधा इतर काही तक्रारीसुद्धा याचबरोबर उद्भवतात, जसं की सर्दी, नाक चोंदणे, कान बधिर किंवा गच्च होणे, कानात गुणगुणल्यासारखा आवाज येणे (टिनिटस) इत्यादी. अशा त्रासांवरून पुढच्या तपासण्यांची दिशा मिळते आणि निदान होताच योग्य उपचार करता येतात.
सुमारे ५० ते ५५ टक्के रुग्णांना बीपीपीव्ही म्हणजेच बिनाइन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो नामक रोगानं पछाडलेलं असतं. बिछान्यात कूस पालटताना, उठून बसताना, उठून उभं राहताना, मान पटकन वळवताना किंवा नुसतं वेगाने फिरणारा पंखा, संगणक स्क्रीन, टीव्ही, रस्त्यावरील रहदारीकडे पाहतानासुद्धा अचानक त्रास सुरू होतो. डोक्यात गरगरतं किंवा भोवतालच्या वस्तू फिरताहेत असं वाटतं. मळमळ, उलटी, प्रचंड घबराट होते. हा प्रकार बहुधा एक मिनिटांत आपोआप कमी होतो, पण पुन:पुन्हा होतो. डोळे मिटले तर अधिक वाढतो. या नाटय़मय प्रकाराचं कारण समजून घेणं रोचक ठरेल. वर उल्लेख केलेले अर्धवर्तुळाकृती कॅनॉल्स युट्रिकल नावाच्या एका पिशवीला जोडलेले असतात. डोक्याची पोझिशन बदलली असता या पिशवीतून कॅल्शियमचे स्फटिक निसटतात आणि एखाद्या अर्धवर्तुळाकृती कॅनॉलमध्ये (बहुधा मागील बाजूच्या) शिरतात. या स्फटिकांमुळे एन्डोलिम्फच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, तिथले मज्जातंतू उत्तेजित होतात आणि मेंदूला डोके हलत असल्याचा संदेश पाठवतात. यामुळे मेंदूला दोन्ही कानांतून मिळणाऱ्या माहितीत विसंगती निर्माण होते आणि सुरू होतो व्हर्टिगो!
डोळे आणि कान यांच्यात सतत संवाद चालू असतो. जेव्हा कानात गडबड होते तेव्हा डोळेपण अनियंत्रित, अनैच्छिक पद्धतीने हलू लागतात. डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे, वरून खाली किंवा गरागरा म्हणजे वर्तुळाकार. या हालचालीला म्हणतात निस्टैग्मस. याचा अभ्यास करून कोणत्या कॅनॉलमध्ये स्फटिक अडकले आहेत हे कळू शकतं. एप्ली नावाच्या डॉक्टरांनी असा अभिनव विचार मांडला की गुरुत्वाकर्षणाचा वापर करून अडकलेले स्फटिक जागेवर आणता येतात. रुग्णाला टेबलावर झोपवून टेबलच्या कडेवरून सुमारे ३० अंश डोकं खाली लोंबत असताना डोळे ज्या बाजूला हलतात, त्या बाजूला डोकं ४५ अंशात वळवून २० ते ३० सेकंद त्याच स्थितीत ठेवायचं आणि नंतर ते ९० अंशातून फिरवून (विरुद्ध दिशेला वळवून) पुन्हा २० ते ३० सेकंद थांबायचं आणि त्यानंतर रुग्णाला उठून बसवायचं. या उपचाराला रिपोझिशनिंग असं म्हणतात. बहुधा, एकाच सिटिंगमध्ये किंवा फार तर दोन-तीन वेळा हे उपचार केल्यास रुग्ण त्रासमुक्त होतो आणि दीर्घकाळ कोणतंही औषध न घेता तसा राहू शकतो.
बाकी राहिलेल्या रुग्णांमध्ये व्हर्टिगोची वेगवेगळी कारणं असू शकतात. व्हेस्टिब्युलची अर्धशिशी हा असाच एक प्रकार. रुग्णाला चक्कर येण्याबरोबर डोकेदुखीचा त्रास असला तर निदान सोपं असतं. अर्थात, अर्धशिशीवरची औषधं यावर उपयोगी पडतात. अतिरिक्त ताणतणाव हेही एक महत्त्वाचं कारण आहे. व्हर्टिगोच्या अनुभवाने ताण अधिकच वाढतो. अशा रुग्णांना धीर देऊन तणाव कमी करण्याची औषधं दिल्यास आराम मिळतो. जेंटामायसिनसारख्या काही औषधांचा शरीराचा तोल राखण्यावर विपरीत परिणाम होतो. निस्टैग्मसचा नेमका प्रकार कळण्यासाठी ईएनजी नावाची तपासणी करतात कान बधिर झाला असेल तर अधिक माहितीसाठी ऑडियोमेट्री ही तपासणी केली जाते. क्वचित प्रसंगी मेंदूचा व कानाचा सीटीस्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केला जातो. पण व्हर्टिगोच्या एकूण रुग्णांपैकी फार थोडय़ांनाच याची गरज पडते.
मानवी शरीराचा चमत्कार असा की कोणत्याही कारणानं शरीराचा तोल जाऊ लागला तर मेंदू आपणहून या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. रुग्ण स्वत:च सावकाश उठायला, शरीरस्थिती बदलायला शिकतो. चालताना दोन पायांत अंतर जास्त ठेवतो. वळताना फक्त मान न वळवता संपूर्ण शरीर वळवतो. मात्र अतिरिक्त औषधांच्या सेवनानं मेंदूचे हे प्रयत्न निष्प्रभ होतात. म्हणून रुग्णांनी आणि डॉक्टरांनीसुद्धा जास्त औषधांचा वापर टाळला पाहिजे.
अर्थात, मेंदूची ही यंत्रणा नेहेमीच परिपूर्ण आयुष्य देऊ शकत नाही. या रुग्णांचं समाधानकारक पुनर्वसन करणारे व्यायाम हेच शरीराचा तोल आणि शरीरस्थिती सुधारण्याचं काम परिणामकारकपणे करू शकतात. म्हणून मेंदूचे काही गंभीर आजार वगळता बाकी सर्व रुग्णांना पुनर्वसन व्यायाम शिकवले जातात. यामध्ये झोपून डोळ्यांच्या आणि मानेच्या हालचाली करणे, उठून बसणे-पुन्हा झोपणे, बसून तसंच उभे राहून या हालचाली करणे, पाय जुळवून डोळे मिटणे, टाचा उचलणे, आणखीसुद्धा बरेच व्यायाम या पुनर्वसनामध्ये अंतर्भूत आहेत. या सर्व व्यायाम प्रकारांचा उद्देश आहे आपलं काम करण्याचं विसरलेल्या व्हेस्टिब्युलला प्रशिक्षण देणं. सुरुवातीला चक्कर वाढल्यासारखी वाटेल, पण संयम दाखवून सातत्य ठेवून व्यायाम करत राहिल्यास हळूहळू मेंदू येणाऱ्या चुकीच्या संदेशांकडे दुर्लक्ष करायला शिकतो. याखेरीज पोटाचे आणि पाठीचे ‘कोअर’ स्नायू विशिष्ट व्यायामानं सशक्त करण्याकडेही लक्ष द्यायला हवं, कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ‘सावरून’ धरणारे हे स्नायू कान किंवा डोळ्यांनी असहकार पुकारला तरी आपल्या मदतीला येतील. या सर्वच व्यायामांची माहिती आपल्या डॉक्टरांकडून किंवा प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टकडून घ्यावी.
डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com
(या लेखासाठी विशेष सहाय : डॉ. विनया चितळे-चक्रदेव, एमएस. ईएनटी, यूएसए, चक्कर आणि तोल जाणे या विकाराच्या तज्ज्ञ.)

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Sultan Bathery -Wayanad, Kerala
विश्लेषण: भाजपाला नाव बदलायचे आहे त्या सुलतान बथेरी शहराचा इतिहास नेमका काय सांगतो?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Prime Minister Narendra Modi
उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख