04 August 2020

News Flash

अशिक्षितपणाला मागे ठेवणारी जिद्द

फोनवरून चपलांच्या ऑर्डर्स घेऊन चपला तयार करायच्या आणि ठरलेल्या दिवशी इच्छित स्थळी पोचत्या करायच्या

साधी आकडेमोडही न शिकलेल्या शकुंतला खडतरे यांनी आठवडय़ाला सुमारे पन्नास हजार रुपयांची विक्री होण्याइतका आपला पादत्राणांचा उद्योग वाढवला आहे. सूतकताईपासून सुरुवात करून त्यांनी स्वत:चा चप्पल बनवण्याचा कारखाना आणि दुकान थाटण्यापर्यंत त्यांची या कामातली झेप कौतुकास्पद!

फोनवरून चपलांच्या ऑर्डर्स घेऊन चपला तयार करायच्या आणि ठरलेल्या दिवशी इच्छित स्थळी पोचत्या करायच्या, असा शकुंतला खडतरे यांचा नेहमीचा शिरस्ता. बाजूच्या चपला कारखान्याच्या चपलाही तिथेच जायच्या, त्यामुळे शकुंतलाताईही आपल्या चपलांची ऑर्डर त्या कारखानदाराच्याच गाडीतून पोहोचत्या करायच्या. शकुंतलाताईंची ऑर्डर ही बरहुकूम असल्यानं पूर्णत: संपायची; पण त्या  कारखानदाराच्या न विकलेल्या चपला मात्र परत यायच्या. ते पाहून एक दिवस त्या कारखानदाराने स्वत:च्या गाडीतून यांची ऑर्डर न्यायला मनाई केली. शकुंतलाताईंची फारच पंचाईत झाली. वेळेवर ऑर्डर पोहोचली नाही तर पुढच्या वेळी मिळणार नाहीत अशी परिस्थिती. मग वेगळं जास्तीचं भाडं ठरवून त्या दिवशीची ऑर्डर पूर्ण केली खरी, पण पुन्हा पुढच्या आठवडय़ात हाच प्रसंग येणार हे ओळखून त्यांनी लगोलग बचत गटातून कर्ज घेतलं आणि पहिला हप्ता भरून पुढच्या पैशांच्या बोलीवर सेकंडहँड तीनचाकी टमटम थेट दारातच आणली. मग पुढचा आठवडा टेचात आपल्या स्वत:च्या टमटमने त्यांनी आपली चपलांची ऑर्डर बाजारात पोचवली!

असा रोखठोक निर्णय घेण्याच्या करारीपणातूनच शकुंतला खडतरे यांचा आजचा ‘सिद्धनाथ फुटवेअर्स’ व्यवसाय उभा राहिला आहे. सांगोल्यातलं त्यांचं लहानपण लाडात गेलं. वडिलांना मुलगीच हवी होती आणि ही पाचवं अपत्य. आधीचे भाऊ  शाळेत गेले, पण शाळा लांब म्हणून लेकीला शाळेत घातलं गेलं नाही. रोज आईला घरकामात मदत करण्यात दिवस जायचा. सतरा-अठराव्या वर्षी लग्न लागलं तरी एकत्र कुटुंबामुळे घरकाम वगैरे तसंच सुरू राहिलं. शकुंतलाताईंचे पती खडतरे यांचं चुलतभावाबरोबर चपलांचं दुकान होतं. साधारण वर्ष-दीड वर्षभर एकत्र राहिल्यानंतर मात्र त्यांनी गोडीगुलाबीनं वेगळं राहायचा निर्णय घेतला; पण त्या वेळेस दुकानही चुलतभावाचं असल्यानं खडतरे यांनी दुसरीकडे नोकरीची व्यवस्था केली आणि नवा संसार सुरू झाला. अशी काही र्वष गेली. त्या तुटपुंज्या पगारात तीन लहान मुलांचा खर्च जमेना आणि मग काही तरी करायला पाहिजे, अशी शकुंतलाताईंना जाणीव व्हायला लागली.

त्याच वेळी त्यांना सांगोल्यातल्या माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ.  संजीवनी केळकर यांची मदत मिळाली. या संस्थेनं दिलेलं पायाने/हाताने सूतकताईचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. थोडे पैसे उचलून पाच किलो लोकर पिंजून आणली आणि घरच्या घरी सूतकताईला सुरुवात केली. पंधरा दिवस दिवसभर कताई केल्यावर फार तर दीडशे रुपये मिळायचे. त्या पैशातून संजीवनीताईंनी पन्नास रुपयाचं बचत गट खातं उघडायला लावलं. घरात खर्च करूनही कोणालाच न सांगता बचत गटाचे पन्नास रुपये आठवणीनं गुपचूप त्या बाजूला ठेवायच्या.
तीन वर्षांनी एकरकमी तीन हजार रुपये मिळाले तेव्हा शकुंतलाताईंना व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांना वाटायचं की, आताही नवरा आणि त्या दिवसभर दुसऱ्यासाठी राबतात. कितीही काम केलं तरी शेवटी हातात फक्त ठरलेला पगारच मिळायचा. मग त्यापेक्षा स्वत:साठी राबलेलं काय वाईट. घरदार सांभाळून स्वत:चा व्यवसाय केला तर जास्त पैसे मिळतील, अशी शकुंतलाताईंना खात्री होती. त्यामुळे त्यांनी हे सगळं आपल्या नवऱ्यालाही पटवून दिलं; पण या तीन हजारांत व्यवसाय उभा राहाणं शक्य नव्हतं, त्यामुळे शकुंतलाताईंनी स्वत:ही काम करून आणखी थोडे पैसे जमवायचं ठरवलं.

शकुंतलाताईंनी नवऱ्याला राजी करून स्वत:ही नवऱ्याबरोबर चपला कारखान्यात जायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांची चेष्टा केली जायची, लोक आपसात कुजबुजत, टोमणे मारत; पण शकुंतलाताई जिद्दीने नोकरी करत राहिल्या. या नोकरीत त्यांनी चपला कशा बनवायच्या, कच्चा माल कसा आणायचा, कारखान्यात काय काय लागतं हे सगळं बघून बघून शिकून घेतलं. असं सहा-सात महिने काम केल्यावर थोडे पैसे गाठीशी आले. आधीचे तीन हजार होतेच. मग अजून थोडे पैसे कर्जाऊ घेतले. शकुंतलाताईंनी स्वत:च पदर खोचून फळकुटाच्या भिंती उभारल्या आणि चक्क स्वत:चा चपलांचा कारखाना सुरू केला. त्या ज्या ठिकाणी नोकरी करायच्या तिथल्या मालकाने त्यांना मदत केली आणि शकुंतलाताईंचा कारखाना सुरु झाला.

स्वत:चा कारखाना थाटल्यावर काम वाढलं, पण त्यात आनंदच होता. कच्चा माल घेऊन यायचा, पंधरा दिवस खपून चपला बनवायच्या आणि मग डोक्यावर माल घेऊन जाऊन तो विकायचा असा एकूण व्यवसाय होता. चपला विकण्यासाठी खूप वेगवेगळ्या गावांतून एकटंदुकटं फिरायला लागायचं, उन्हातान्हातून वणवण करायला लागायची. ट्रक, टेम्पो, जे वाहन मिळेल त्यातून गावोगावी प्रवास करायचा. एक चप्पल विकली, की त्यामागे पाच-दहा रुपये सुटायचे! शकुंतलाताई शाळेत शिकल्या नसल्याने त्यांना हिशेब अजिबात कळायचा नाही. मग ज्याला चप्पल विकली त्यालाच एका वहीत लिहून ठेवायला सांगायच्या. मिळालेले पैसे भाकरीच्या फडक्यात बांधून ठेवायच्या. असं वर्षभर एकटीनं कष्ट केल्यावर मग दोन कामगार हाताशी घेतले. आता कारखान्यात चपला बनवायचं काम हे कामगार करायला लागले. नवीन चपला डिझाईन आणि कागदावरचं कटिंग शकुंतलाताईंनी करून दिलं, की कामगार चपला बनवायचे. त्यामुळे शकुंतलाताईंना जास्त वेळ फिरून चपला विकता यायला लागला. अनेक वेळा तर शाळात जाणारी त्यांची मुलंही मदतीला बरोबर जायची.
हळूहळू व्यापाऱ्यांशी ओळखी झाल्या आणि त्यांनी फोनवर ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे बाजारगल्ल्यांत होणारी वणवण जरा कमी झाली. त्यांचे पतीही मदतीला होतेच. आजूबाजूच्या कारखानदारांबरोबर बोलणी करून एकत्र माल न्यायला सुरुवात केली. वापरलेली टमटम शकुंतलाताईंच्या दाराशी आली. ही टमटम माल नेताना वापरायचीच, पण एरवी भाडय़ानेही दिली जायची, त्यामुळे त्यावरचं कर्ज लगेचच फिटलं आणि पुन्हा सुमारे नव्वद हजार रुपये कर्ज घेऊन तीनचाकी गाडी आणि नंतर चारचाकी गाडीही त्यांनी घेतली. या कर्ज घेण्यालाही घरातून विरोध होता, पण शकुंतलाताईंनी न जुमानता घरच्यांना राजी करून गाडी घेतली आणि ती भाडय़ाने द्यायला सुरुवात केली.

एव्हाना दहा र्वष जुना कारखाना चांगलाच वाढला होता. आठवडय़ाला सुमारे पाचशे जोडी चपला तयार होत होत्या. साधारण सतरा जण कारखान्यात काम करत होते. त्या सगळ्यांचं घर या कामावर चालत असल्यानं तेही आपुलकीनं राहात होते. कधी काही अडलंनडलं तर बचत गटाची मदत खूप आश्वासक होतीच, त्यात नियमाने बचत केली जात होती. मुलंही शिकत होती. गाडी घेऊन कुर्डुवाडी, अकलूज, मिरज इथून कच्चा माल आणून सांगोला, जत तालुका, कर्नाटकातलं विजापूर या भागांत तयार पादत्राणं पोचती केली जात होती. स्वत:च्या मालकीची थोडीफार जमीनही झाली होती. थोडक्यात सगळं स्थिरस्थावर असताना एक एजंट त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कंपनीच्या चप्पल विकायची फ्रँचायझीची ऑफर देऊन गेला.

धडाडीच्या शकुंतलाताईंनी बदलाचं हे वारं जोखलं. हाताने बनवलेल्या चपलांच्या व्यवसायाची मर्यादा त्यांच्या लक्षात आलीच होती, त्यामुळे दार ठोठावणाऱ्या या नव्या संधीसाठीही त्यांनी दरवाजा उघडला. या वेळी मुलगा गुरू हाताशी होताच. पैसा उभा करून मुख्य बाजारात भाडय़ानं एक दुकान घेतलं आणि पाच लाख रुपयांच्या कंपनीच्या चपलांनी नवीन कामाला सुरुवात केली. आता या नव्या दुकानात स्वत:ची आणि कंपनीची पादत्राणं असा दोन्ही प्रकारचे फुटवेअर विकायला ठेवले जातात. इथे आठवडय़ाला पन्नासेक हजार रुपयांची विक्री सहज होते.
मान वर करून बाहेरची मजा बघत राहिलं, की काही मिळत नाही; पण खाली बघून काम करत राहिलं की पैसा मिळत राहातो, असं शकुंतलाताईंचा अनुभव आहे. म्हणूनच आज सांगोल्यासारख्या ठिकाणी त्यांचा स्वत:चा इतका मोठा व्यवसाय उभा राहू शकला आहे.

नवउद्योजकांना सल्ला
बचत गटाची मदत घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारणं शक्य आहे. ‘कष्टाविना फळ ना मिळते’ हा मंत्र अवलंबला तर नक्की यश मिळेल.

करियर मूलमंत्र
सतत नव्याच्या मागे राहायचं. उगाच जुन्याला कुरवाळत न बसता जगात जे नवीन आहे, जे चालतंय त्या दिशेने आपली वाटचाल करायची.

 

शकुंतला खडतरे, सांगोला  
सिद्धनाथ फुटवेअर
बापू खडतरे सभागृहाच्या मागे, खडतरे गल्ली, सांगोला, जि. सोलापूर
(विशेष आभार – फोटोसर्कल सोसायटी, ठाणे)

– स्वप्नाली मठकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:02 am

Web Title: business women shakuntala khadtare
Next Stories
1 बॅगेत न मावणारी स्वप्नं
2 ‘ईझी टू कुक’चा फंडा
3 ब्लेड विक्री ते कारखानदारी
Just Now!
X