22 July 2018

News Flash

इनफॅबची ‘समर्थ’ वाटचाल

अगदी योगायोगानेच पीव्हीसी कोटेड कापडाच्या डीलरशिपचं काम गीतांजली समर्थ यांच्याकडे आलं.

अगदी योगायोगानेच पीव्हीसी कोटेड कापडाच्या डीलरशिपचं काम गीतांजली समर्थ यांच्याकडे आलं. ऑनिंग म्हणजे कापडी कनाती बनवण्यासाठी हे कापड वापरता येईल असं गीतांजली यांच्या लक्षात आलं आणि त्यातून सुरू झालं ‘इनफॅब’. गुणवत्ता हा पहिला निकष असलेल्या ‘इनफॅब’ची यशस्वी वाटचाल गीतांजली समर्थपणे सांभाळत आहेत.

फ्रान्स किंवा इटलीमधल्या कुठल्या तरी शांत गल्लीतलं रेस्टॉरंट; काचेच्या मोठमोठय़ा तावदानातून आतलं दृश्यही सहज दिसणारं; चकचकीत आणि तरीही एक वेगळाच जुनेपणाचा आब राखून असलेला अंतर्भाग, मात्र आपल्याला खुणावतं ते पांढरा शुभ्र लेसचं टेबलक्लॉथ घातलेलं, सुबक नक्षीदार पांढऱ्या खुच्र्या असणारं पण बाहेरच ठेवलेलं टेबल. तावदानापुढच्या रस्तावरच्या जागेत छानशा लाल, हिरव्या किंवा निळ्या पांढऱ्या कापडाचं छत करून त्याखाली मांडलेलं हे टेबल त्या एकंदर वातावरणामुळेच आवडून जातं. मग सकाळी सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी फेसाळती कॉफी पीत आरामात वेळ घालवण्यासाठी असंच एखादं टेबल पकडून निवांत रहदारी बघत बसायचं. युरोपात फिरताना ही अशी कापडाच्या कनाती लावलेली दुकानं म्हणजे रेस्टॉरंट असावीत असं काहीसं एक समीकरण डोक्यात बसून जातं. या कनाती म्हणजेच ऑनिंग (ं६ल्ल्रल्लॠ). आजकाल भारतातही ऑनिंग सर्रास पाहायला मिळत असलं तरी नव्वदच्या दशकात मात्र ही नवीनच संकल्पना होती.

त्यामुळेच केवळ कच्चा माल उपलब्ध आहे, त्यापासून काय करायचं याचा विचार करत ऑनिंगसारखं उत्पादन भारतात बनवणं आणि ते विकून दाखवणं हे मोठं आव्हान होतं. मात्र पुण्याच्या गीतांजली समर्थ यांनी ते यशस्वीरीत्या पेललं. १९ व्या वर्षीच लग्न झालं त्या वेळी त्या शिकत होत्या. नंतर त्यांनी आपली पदवी पूर्ण केली आणि त्यांच्या पतीबरोबर त्या कुवेतला गेल्या. तिथे सुमारे तीन वर्षे राहून परत आल्यावर त्यांना स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यायचं होतं. त्याच दरम्यान त्यांच्या आर्मीत असलेल्या वडिलांना त्यांच्या ओळखीतून पीव्हीसी कोटेड कापडाची डीलरशिप घेण्याविषयी विचारलं गेलं. गीतांजली यांच्या वडिलांना या कामात रस नव्हता आणि अगदी योगायोगानेच हे डीलरशिपचं काम गीतांजली यांच्याकडे आलं.

हे जाड पीव्हीसी कोटेड कापड मुख्यत: तंबू किंवा ताडपत्रीसाठी वापरलं जाई. या व्यवसायात गीतांजली यांना पुढे फारसा वाव दिसेना. त्यामुळे या कापडाचा वापर अजून कुठे करता येईल या दृष्टीने त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी एस.आर.एफ. कंपनीने नवीन पट्टेरी डिझाइनचं लाल पांढऱ्या निळ्या रंगाचं कापडही बाजारात आणलं. बराच विचार केल्यावर ऑनिंग म्हणजे कापडी कनाती बनवण्यासाठी हे कापड वापरता येईल असं गीतांजली यांच्या लक्षात आलं. पण नुसती कल्पना डोक्यात येऊन उपयोग नव्हता. असं कापडी छत बनवायचं तर त्याची फ्रेम कशी बनवायची, त्यात उघडबंद करण्यासाठी काय उपाय करायचे याची काहीच कल्पना येत नव्हती. खूप शोधाशोध केल्यावर दिल्लीच्या एका छोटय़ा कंपनीत अशा फ्रेम आणि गिअरब्लॉक्स बनतात हे गीतांजली यांना कळलं. लगेचच त्या दिल्लीला रवाना झाल्या. तिथल्या छोटय़ाशा त्या कंपनीत जाऊन कनातीबद्दल हवी असलेली माहिती मिळवली.

ऑनिंगचं कापड एका फ्रेमवर घट्ट ताणून बसवलं जातं. ते सहज उघडबंद करता यावं यासाठी गिअरबॉक्स, हॅण्डल असतात. गीतांजली यांना हे सगळंच करण्यासाठी वेळ उपलब्ध नव्हता, त्यामुळे या कंपनीकडून हार्डवेअर विकत घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार बोलणीही केली. आता कापड आधीपासूनच उपलब्ध होतं, हार्डवेअरही मिळालं मात्र ते कापड हवं तसं शिवून द्यायला कुणी राजी होत नव्हतं. बरेच ठिकाणी विचारणा केल्यावर त्यांना कुणी तरी साठे गादी कारखान्याचं नाव सुचवलं. तिथे सारंग साठे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनाही हा प्रयोग करून बघावासा वाटला. १९९१ मध्ये पाहिलं ऑनिंग बनून ते एका गच्चीला बसवलं आणि गीतांजली समर्थ यांचा ऑनिंगचा व्यवसाय सुरू झाला. इंडस्ट्रियल फॅब्रिक या संज्ञेचं छोटं रूप म्हणून ‘इनफॅब’ या नावाने कामकाज सुरू झालं.

१९९१ मध्ये ऑनिंग ही खूपच नवी संकल्पना होती. ते कुठे वापरायचं हे लोकांना फारसं माहीत नव्हतं. त्यामुळे या उत्पादनाची बाजारपेठ तयार करण्यासाठी फार वेळ लागला. सुरुवातीला अगदी गच्चीसारख्या ठिकाणी घरगुती स्वरूपातही काही ठिकाणी त्यांनी कनाती लावून दिल्या. त्याकाळात कंपन्यात बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांना जेवायला सोयीची जागा उपलब्ध नसायची. मग असलेल्या थोडय़ा मोकळ्या जागेत किंवा गच्चीवर सुरेख कनाती घालून जेवणाचे कॅफेटेरिया बनवून दिल्या आणि हळूहळू व्यवसाय वाढायला लागला. मोठमोठय़ा कंपन्यांसाठी पार्किंग किंवा कॅफेटेरिया बनवायची कामही गीतांजली यांना मिळायला लागली.

व्यवसायात नुकताच जम बसायला लागला आणि मध्येच २००२ मध्ये गीतांजली यांची तब्येत बिघडली. त्यातून सावरण्यासाठी बरेच महिने लागले. तब्येत पहिल्यासारखी परत होईपर्यंत दीड-दोन वर्षांचा कालावधी गेला. आजारपणामुळे आता पुन्हा आपण काही करू शकू की नाही अशा परिस्थितीतून सावरून गीतांजली पुन्हा एकदा व्यवसायात लक्ष घालू लागल्या. त्यानंतर २००६ हे वर्ष मात्र गीतांजली यांच्यासाठी वाईट गेलं. इतके दिवस सारंग साठे यांच्या मदतीने नवीन डिझाईन करता येत होतं. पण सारंग साठे यांचा आजारपणामुळे मृत्यू ओढवला आणि पुन्हा एकदा आपण खरंच हा व्यवसाय करावा का याविचाराने त्यांना घेरलं. पण त्याचवेळी एक नवीन मोठ्ठी ऑर्डर त्यांना मिळाली. त्यात सगळ्या बाजूंनी वेढल्या असलेल्या एका जागी, अजिबात पाणी गळणार नाही अशी कनात घालून हवी होती. मग गीतांजली यांनी स्वत:च एक डिझाईन बनवलं, स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून ते अप्रूव्ह करून घेतलं आणि एक छानसं ऑनिंग तयार करून दिलं. एकटीने केलेल्या या कामामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ‘इनफॅब’चं काम अधिक जोमानं सुरू झालं.

आता या व्यवसायात बरीच स्पर्धा आहे असं गीतांजली म्हणतात. अनेक जण कमी किंमत घेऊन दुय्यम दर्जाचं ऑनिंग विकतात. कापडातही देशी आणि परदेशी असे अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत. पण ‘इनफॅब’मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार अगदी उत्तम दर्जाचं ऑनिंग बनवलं जातं. गुणवत्ता हा पहिला निकष असल्याने कधीकधी किंमतही जास्त असते पण ग्राहकांचा विश्वास कमवायचा तर गुणवत्ता गरजेचीच आहे. त्याशिवाय आपण करून दिलेल्या कामात काही खोट असेल तर त्यामुळे ग्राहकांचं नुकसान नको म्हणून त्या उत्पादनावर वॉरंटीही देतात. आता ‘इनफॅब’मध्ये चार जण ऑफिस स्टाफ आहे तर कापड शिवायला अजूनही साठे गादी कारखान्यामध्ये दिलं जातं. इथून पुढे ऑनिंगची फ्रॅन्चायझी द्यायचा विचार सुरू आहे. सुरुवातीला ज्या छोटय़ा कंपनीकडून गीतांजली या हार्डवेअर मागवत होत्या त्या कंपनीचा सिस्टम्स इंडिया या नावाने व्यवसाय भरभराटीला आला आहे. ‘इनफॅब’ही अधिकाधिक यश नक्की मिळवेल, याबद्दल शंका नाही.

सल्ला

चिकाटी आणि जिद्द व्यवसायात खूप जरुरी आहे. कुठलीच गोष्ट सहज साध्य होत नाही तर त्यासाठी कष्ट घ्यायची तुमची तयारी हवी. त्याबरोबर कंपनीमधल्या छोटय़ा छोटय़ा खर्चाची नोंद ठेवायला हवी. स्वत:वर विश्वास ठेवा म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होतात.

उद्दिष्ट

‘इनफॅब’साठी फ्रँचायझी द्यायची त्यांची इच्छा आहे, त्यामुळे देशभरात ऑनिंगच्या उत्पन्नाची विक्री होईल.

– गीतांजली समर्थ, पुणे

infabpune@gmail.com

http://www.infabawnings.com

swapnalim@gmail.com  

 

तुम्ही आहात सर्वार्थाने जोडीदार आपल्या पत्नीचे?

आज अनेक घरांतली स्त्री ही नोकरी- करिअर वा व्यवसाय करणारी, वेगळं काही करू पाहाणारी आणि म्हणूनच खूपच व्यग्र झाली आहे. खूप मेहनत घेऊनही अनेकदा तिला घर आणि नोकरी याच्यातला समतोल साधणं शक्य होतोच असं नाही. मग असमाधान, निराशा, दु:ख, त्यातून होणारी चिडचिड, या गोष्टी येतात. अशा वेळी तिचा पती तिच्या मदतीला आला, त्याने तिच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर तिचा प्रत्येक दिवस आनंदाचा,  समाधानाचा असेल यात शंका नाही. आज अनेक पुरुष अशी मदत करत असतात. म्हणूनच समस्त नवरे मंडळींना (निवृत्त नव्हे)आम्ही आवाहन करतो आहोत, तुम्ही करता असं सहकार्य? अर्थात हे सहकार्य फक्त मदतीपुरतं मर्यादित न राहता एखाद्या कामाची संपूर्ण जबाबदारी, तीही नियमितपणे घेणं अपेक्षित आहे. आपल्या बायकोचा सर्वार्थाने जोडीदार असणाऱ्या पुरुषांकडून आम्ही त्यांचे अनुभव मागवत आहोत. आम्हाला कळवा ३०० शब्दांमध्ये. अनुभव प्रामाणिक हवेत, हे तर खरंच. मात्र पूर्वापार ‘तिच्या’ समजल्या जाणाऱ्या नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही घेता? पारंपरिक पुरुषी मानसिकतेपलीकडे जाऊन तुमच्या पत्नीला तुम्ही नेमकी कशी साथ देता ते आम्हाला कळवा. योग्य अनुभवांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. पत्रावर ‘जोडीदार सर्वार्थाने’ असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८,

टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.  

ई-मेल – chaturang@expressindia.com किंवा chaturangnew@gmail.com

 

First Published on December 3, 2016 12:20 am

Web Title: gitanjali samarth infab