21 September 2018

News Flash

‘रचना’कार

नीलिमा दिवटे १९९९च्या आधी आपल्या टेक्स्टाईल डिझाईनच्या कामात फारच व्यग्र होत्या.

बांधकाम क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करायचं असं ठरवत शिशिर दिवटे यांनी नागपूरमध्ये ‘रचना’ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी सुरू केली. त्याला नीलिमा यांनी आपला टेक्सटाईल डिझाईनचा व्यवसाय सांभाळत हिरिरीने साथ दिली. नीलिमा बांधकाम साहित्य खरेदी, आर्थिक बाबी, कामावर देखरेख करणं आणि अपार्टमेंटची विक्री, जाहिरात या बाबी सांभाळतात. तीन अपार्टमेंटचे बांधकाम करून सुरू केलेल्या या व्यवसायाचा आज एकमेकांच्या साथीने वटवृक्ष झाला आहे.

HOT DEALS
 • Apple iPhone 6 32 GB Space Grey
  ₹ 24790 MRP ₹ 30780 -19%
  ₹4000 Cashback
 • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
  ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
  ₹1129 Cashback

नीलिमा दिवटे १९९९च्या आधी आपल्या टेक्स्टाईल डिझाईनच्या कामात फारच व्यग्र होत्या. तेव्हाही हाताखाली पाच-सहा जणी कामाला होत्या आणि हा व्यवसाय बऱ्यापैकी चांगला सुरू होता. त्याच दरम्यान त्यांचे यजमान शिशिर दिवटे यांचं सिव्हिल इंजिनीअिरगचं सरकारी कामही सुरू होतं. प्रचंड मेहनत करूनही मानसिक समाधान मात्र नव्हतं. मग बांधकाम क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करायचं असं त्यांनी ठरवलं, त्याला नीलिमा यांनी हिरिरीने साथ दिली आणि आजच्या ‘रचना’ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची घोडदौड सुरू झाली.

सुरुवातीला दिवटे दाम्पत्याने स्वत:चा पैसा घालून एक अगदी छोटीशी जागा खरेदी केली आणि त्यावर केवळ तीन अपार्टमेंट बांधायचा आराखडा आखला. शिशिर दिवटे त्यांच्या नोकरीत व्यग्र असल्याने जागेची खरेदी आणि तांत्रिक बाबी सोडल्या तर बहुतांश गोष्टी नीलिमा यांनी आपल्या हातात घेतल्या. हे बांधकाम क्षेत्रातलं पहिलंवहिलं प्रोजेक्ट, त्यामुळे नीलिमा यांना खूप गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. साहित्याची खरेदी, आर्थिक उलाढाली, विक्रीकौशल्य या सगळ्याच आघाडीवर त्यांनी खूप कष्ट घेतले. प्रचंड मेहनत आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी यामुळे हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करता आला. त्यानंतर लगेचच नऊ  अपार्टमेंट होतील इतकी जागा घेऊन दुसरा प्रकल्पही सुरू केला. या वेळी आत्मविश्वास थोडा वाढला होता. बऱ्याच गोष्टींची माहिती झाली होती. त्यामुळे हाही प्रकल्प अगदी वेळेत पूर्ण करून ग्राहकांना सुपूर्द करता आला आणि मग पुढे प्रकल्पांची संख्या वाढतच गेली. आज अगदी तीनशे अपार्टमेंट असलेल्या मोठय़ा इमारतीही त्यांनी उभ्या केल्या आहेत.

सुरुवातीला नीलिमा आपला टेक्स्टाईल डिझाईनचा व्यवसाय आणि हे काम दोन्ही एकत्र करत होत्या. मात्र कामाची व्याप्ती खूपच वाढली तसा तो व्यवसाय बंद करून नीलिमा यांनी पूर्ण वेळ याच व्यवसायात झोकून दिलं. साधारण २००० मध्ये नागपुरात अपार्टमेंट संस्कृती फारशी नव्हती पण तरीही जिद्दीने त्यांनी सुरुवातीचे प्रकल्प पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर फक्त आठ लोक कामाला होते. आज ती संख्या आठशेपर्यंत पोहोचली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचे आठ लोक अजूनही त्यांच्याबरोबर आहेत ती माणसं जोडून घेण्याच्या त्यांचा कौशल्यामुळेच.

या व्यवसायात उतरल्यानंतर शिशिर यांनी जागेची खरेदी-विक्री आणि बांधकामाच्या इतर तांत्रिक बाबी सांभाळायच्या आणि नीलिमा यांनी बांधकाम साहित्य खरेदी, आर्थिक बाबी, कामावर देखरेख करणं आणि अपार्टमेंटची विक्री, जाहिरात या बाबींची जबाबदारी पार पाडायची असा अलिखित करारच झाला आणि आजही ते दोघे या गोष्टी कटाक्षानं पाळतात. जागांच्या खरेदीच्या बाबतीत वगैरे नीलिमा अजिबात लक्ष घालत नाहीत तर कुठलं बांधकाम साहित्य वापरायचं, विक्री करणं, बोलणी यात शिशिर दिवटे अजिबात ढवळाढवळ करत नाहीत.

त्या काळात किंवा तसं म्हटलं तर आजही बांधकाम क्षेत्रात स्त्रिया फारशा नाहीत. त्यामुळे सुरुवातीला घाऊक बाजारात सामान खरेदीसाठी गेल्यावर तिथले दुकानदार फारसा प्रतिसाद देत नसत. त्यांना वाटायचं की ही बाई काही फार मोठी खरेदी करणार नाही. पण या विषयातलं ज्ञान मिळवून, दुकानदारांशी बोलून हळूहळू नीलिमा यांनी दुकानदारांचा विश्वास संपादन केला आणि आज तर ‘रचना’ कन्स्ट्रक्शनची रीतसर कोटेशन निघतात आणि घाऊक विक्रेते स्वत: ‘रचना’साठी साहित्य पुरवायला तयार असतात. नीलिमा बांधकामाच्या जागी जाऊन देखरेख करायच्या, काही सूचना द्यायच्या तेव्हा तिथल्या लोकांना आणि कामगारांना एखाद्या स्त्रीकडून सूचना घ्यायला आवडायचं नाही. मात्र स्वत: शिकून आपलं ज्ञान अद्ययावत ठेवल्यामुळे त्या लोकांनाही नीलिमा यांच्याविषयी आदर वाटायला लागला आणि या आघाडीवरचं त्यांचं काम सुरळीत व्हायला लागलं. आज त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक स्त्रिया कामाला आहेत हे त्या अभिमानानं सांगतात.

तीच गोष्ट विक्रीच्या बाबतीतही. एखाद्या अपार्टमेंटची खरेदी ही ग्राहकांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची असते. हे लाखोंचे व्यवहार करायचे तर ग्राहकाला आपल्याबद्दल विश्वास आणि आपुलकी वाटली पाहिजे, असं नीलिमा यांना वाटतं. त्यामुळे त्या ग्राहकांना अपार्टमेंट विकताना सगळी मदत करणं, कुठलाही प्रकल्प सांगितलेल्या वेळेवर पूर्ण करणं या गोष्टी त्या कटाक्षानं करतात. बांधकाम साहित्य वापरताना कसलीही तडजोड न करता उत्तम साहित्य वापरतात, इमारतीमध्ये नवनवीन कल्पना आणि सुखसोयी पुरवतात. विक्री झाली की ग्राहकाशी संबंध संपला असं त्या करत नाहीत. त्याशिवाय विक्रीनंतर इमारतीची एक वर्षांची देखभाल आणि सुरुवातीच्या काळात लागणारी मदतही पुरवतात. याचाच परिणाम म्हणून आज ‘रचना’ कन्स्ट्रक्शनचं नाव नागपूरमध्ये मानाने घेतलं जातं. नागपूरप्रमाणेच पुण्यातही त्यांनी तीन प्रोजेक्ट्स उभी केली पण इतक्या दूरच्या ठिकाणी काम करताना फारच ओढाताण व्हायला लागली त्यामुळे तात्पुरतं त्यांनी नागपूरमध्येच काम सुरू ठेवायचं असं ठरवलं आहे. आता ‘रचना’मध्ये घर घ्यायचं अशी स्वप्न ग्राहक बघतात यातच नीलिमा आणि शिशिर दिवटे यांचं यश सामावलं आहे.

आज जमिनीचे भाव गगनाला भिडत असताना या जमिनीशी संबंधित असलेल्या या व्यवसायात दिवटे यांना पदोपदी जागरूक राहावं लागतं. एकदा त्यांनी एक जागा खरेदी केली, त्यावर बांधकामही सुरू केलं आणि नंतर ग्राहकांना बँकेनं कर्ज नाकारलं. तेव्हा लक्षात आलं की खरेदी केलेली जागा आधीच गहाण पडलेली आहे. हा खूपच मोठा धक्का होता. आता ग्राहकांना घर न देणं म्हणजे फसवणूक झाली असती. त्या वेळी मात्र दिवटे दाम्पत्यानं स्वत:चे पैसे घालून ती जागा सोडवली आणि मग त्यावर इमारत पूर्ण करून घरं ग्राहकांच्या सुपूर्द केली. त्या अनुभवानंतर मात्र खूप सखोल चौकशी करूनच जागा विकत घेतली जाते.

सुरुवातीला अगदी एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये ऑफिस असलेल्या ‘रचना’चं ऑफिस तीनच वर्षांत ३००० चौरस फुटांच्या जागेत गेलं. त्यानंतरही ‘रचना’चा व्यवसाय भरभराटीस येतच होता. आपल्या आयुष्यात आपण जे कमावतो त्याचा थोडाफार उपभोगही घेतला पाहिजे, चांगल्या गोष्टींचा समरसून आस्वाद घेता आला पाहिजे, असं नीलिमा यांना वाटतं. त्यामुळे ज्या वेळेस ‘रचना’ कन्स्ट्रक्शनने नागपुरातल्या मुख्य भागात एक मोठी व्यावसायिक इमारत बांधली तेव्हा एक मजला ‘रचना’च्या ऑफिससाठी त्यांनी राखून ठेवला. आज त्या ६००० चौरस फुटांच्या जागेत ‘रचना’ कन्स्ट्रक्शनचं सुरेख ऑफिस आहे. आपले इतर छंद जोपासण्यासाठीही नीलिमा विशेष वेळ काढतात हे महत्त्वाचं. गाणं शिकणं, प्रवास, परदेशवाऱ्या या सगळ्याच त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि कामाबरोबरच स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टीत त्या मन रमवतात. परदेशात फिरताना व्यावसायिकाची नजर मात्र सतत जागरूक असते. तिथे दिसणाऱ्या नवीन सुखसोयी, बांधकामाच्या पद्धती इथे आणायचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

आता गेल्या वर्षांपासून नीलिमा यांनी ‘फ्लोरिकल्चर’ या आपल्या आवडत्या क्षेत्रातही पाय रोवायला सुरुवात केली आहे. एका फार्म हाऊसमध्ये ऑर्किडसारख्या फुलझाडांची लागवड आणि जोपासना सुरू आहे आणि लवकरच याही क्षेत्रात त्या मोठी भरारी घेतील हे नक्की. नीलिमा यांचा वास्तुरचनाकार मुलगाही आता त्यांच्या ऑफिसमध्ये रुजू झाला आहे. हळूहळू नव्या पिढीनं अधिक जबाबदारी घेतली की आणि निवृत्ती घ्यावीशी वाटेल तेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्कीम उभी करायचा त्यांचा विचार आहे. ती घरं ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून बनवली जातील, त्यांना लागणाऱ्या सोयी-सुविधा, जेवणखाण, औषधोपचार आणि कामाला मदतनीस अशा सगळ्या गरजेच्या गोष्टी तिथे उपलब्ध असतील असा त्यांचा ‘प्लान’ आहे आणि त्यांनतर घरी बसून न राहता त्या प्रोजेक्टमध्येच पूर्ण वेळ द्यायचा असं त्यांनी आतापासूनच ठरवून ठेवलं आहे.

उद्दिष्ट

ग्राहकांना वेळेवर, उत्तम गुणवत्तेची घरं देणं आणि विक्रीपश्चात सेवा आणि सोयी उपलब्ध करून देणं यातच व्यवसायाचं यश सामावलं आहे. पुढेमागे ज्येष्ठ नागरिकांना आरामात राहता येईल अशी एक योजना सुरू करायची आहे, त्यानंतर त्यातच पूर्णवेळ झोकून देऊन काम करायचं आहे.

सल्ला

कुठल्याही गोष्टीला न घाबरता सामोरं जाणं स्त्रियांनी शिकायला हवं. स्त्री आहे म्हणून एखादं काम जमत नाही असं मानू नका, प्रयत्न केले, कष्ट घेतले तर काहीच अशक्य नाही. तसंच नवीन पिढीला सगळ्या गोष्टी, अगदी यशही, ‘इन्स्टंट’ हव्या असतात. पण आयुष्यात ‘इन्स्टंट’ काही नाही आणि मेहनतीला, अभ्यासाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

 • नीलिमा दिवटे
 • रचनाकन्स्ट्रक्शन प्रा. लि. ,नागपूर
 • संपर्क क्रमांक : ९८२२१८६३२०

 

स्वप्नाली मठकर

swapnalim@gmail.com

First Published on November 5, 2016 1:02 am

Web Title: information about rachana construction co pvt ltd