कोल्हापूरच्या शैलजा सूर्यवंशी यांच्यावर अचानकच आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. ती सांभाळता सांभाळता त्यांनी फावल्या वेळेत टाकाऊ लोखंडाच्या वेडय़ावाकडय़ा तुकडय़ांना आकर्षक आकार देऊन, वेल्डिंग करून, गार्डन फर्निचर करायला सुरुवात केली आणि त्यातून मोठा व्यवसाय उभा राहिला. त्यांच्या या छंदानेच त्यांना प्रसिद्धी तर दिलीच शिवाय आनंदही.

बहुतेक वेळा आपला व्यवसाय आणि छंद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. व्यवसायाच्या धकाधकीने थकलेल्या मनाला छंदामुळे उभारी येते त्यामुळेच कुठला तरी एखादा छंद जोपासणारा माणूस आनंदी राहू शकतो. पण जे करायला आवडतं तेच आयुष्यभर करायला मिळणं आणि त्यातून अर्थार्जनही होणं ही फारच दुर्मीळ बाब. कोल्हापूरच्या शैलजा सूर्यवंशी यांना मात्र हे कसब साध्य झालं आहे.
शैलजा सूर्यवंशी यांना लहानपणापासूनच व्यवसाय करायचे वेध लागले होते. नोकरी पत्करून कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं नाही त्यामुळे त्यांनी वाणिज्य शाखा निवडली. पदवीनंतर खरं तर त्यांना एमबीए ला प्रवेशही मिळाला होता पण त्या काळात कोल्हापूरसारख्या ठिकाणी शिक्षण संपता संपताच मुलीचं लग्न करून देण्याची पद्धत! शैलजा यांचंही लगेच लग्न झालं आणि त्यामुळे एमबीएसाठी एक वर्ष थांबावं लागलं. लग्नानंतर मध्य प्रदेशात जाऊन त्यानंतर सगळं स्थिरस्थावर व्हायला काही काळ गेला आणि त्याच दरम्यान शैलजा यांच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा कोल्हापूर इथला इंजिनीअरिंग व्यवसाय उघडय़ावर पडला. त्यांचा भाऊ त्या वेळी अगदी लहान म्हणजे आठच वर्षांचा होता, त्यामुळे काही काळ कोल्हापुरात राहून वडिलांचा व्यवसाय मार्गी लावायचा, असं सूर्यवंशी दाम्पत्याने ठरवलं. इथे येऊन इथला व्यवसाय हातात घेऊन त्याचं काम पाहायला दोघांनी सुरुवात केली. त्या वेळी शैलजा या व्यवसायातले अकाऊंटिंग आणि इतर प्रशासन याकडे लक्ष देत होत्या. त्याच दरम्यान त्यांच्या सासऱ्यांचेही अपघाती निधन झाले त्यामुळे त्या दोघांना मिळून सासर आणि माहेरची दोन्ही कुटुंबं सांभाळायची होती. इंदोर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी राहून ते जमणार नव्हतं. त्यात कोल्हापूरला व्यवसाय असल्याने सगळ्यांनी तिथंच राहायचं ठरवलं. आणि घरातला व्यवसाय पुढे सुरू झाला.
शैलजा यांनी फावल्या वेळेत इंजिनीअरिंग व्यवसायातलं वाया जाणारं लोखंड म्हणजे रॉट आयर्नच्या वेडय़ावाकडय़ा तुकडय़ांना वेगवेगळ्या प्रकारे आकार देऊन, वेल्डिंग करून, त्याच्या काही शोभेच्या वस्तू बनवून आपल्या बगिच्यामध्ये ठेवल्या होत्या. अनेक जण त्याबद्दल विचारणा करायला लागले, मग त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी गार्डन फर्निचर बनवून द्यायला सुरुवात केली. असेही दोन दोन कुटुंब सांभाळायची तर अधिकची कमाई हवीच होती. विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, बागेत ठेवण्यासाठी खुच्र्या आणि इतर सामान अशा वस्तू बनवायचा छंदच शैलजा यांना जडला. आपल्या या आवडत्या छंदातून बनणाऱ्या वस्तूंना मागणी आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी एक प्रदर्शन भरवायचं ठरवलं. १९८२ मध्ये शाहू स्मारक इथे झालेल्या त्यांच्या पहिल्याच प्रदर्शनात पहिल्या तासाभरातच गार्डन फर्निचर हातोहात विकलं गेलं आणि तिप्पट वस्तूंच्या ऑर्डर्सही मिळाल्या. हे यश अभूतपूर्वच होतं!
त्यामुळे हिंमत करून शैलजा यांनी पुण्याला प्रदर्शन भरवायचं ठरवलं. पुण्यातल्या प्रदर्शनाला तर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की लोकांच्या रांगा लागल्या. अशा प्रकारचं गार्डन फर्निचर त्या वेळी महाराष्ट्रात तरी कुठे उपलब्ध नव्हतं. सुंदर नाजूक दिसणारं, तरीही दणकट आणि टिकाऊ असणारं हे फर्निचर पुण्यातल्या नावीन्याची आवड असणाऱ्या लोकांना खूपच आवडलं आणि शैलजा यांच्या फर्निचरला भरपूर मागणी यायला लागली.
प्रदर्शनातून मिळालेल्या नफ्यावरच व्यवसायाचं भांडवल उभं राहिलं. त्यामुळे मग शैलजा यांनी आपलं रॉट आयर्न फर्निचरचं वेगळं युनिट सुरू केलं. त्यांनी स्वत: डिझाइन बनवून त्यानुसार वेल्डर्सकडून वस्तू बनवून घ्यायला सुरुवात केली. बनवलेल्या या वस्तू त्या काळात चक्क हाताने रंगवल्या जायच्या. वेगळ्या फिनििशगसाठी त्यांनी पावडर कोटिंग मशीन्स आणली आणि आता गेले काही र्वष फर्निचरवर पावडर कोटिंग सुरू केलं आहे. सुरुवातीच्या काळात अतिउत्साहात चुकीचे आराखडे मांडून एखादं दोन प्रदर्शनात त्यांना नुकसानही झालं, पण व्यवसाय म्हटला की रिस्क असतेच हेही शैलजा सहज सांगतात. नोकरीत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पण ठरावीक पगार मिळणार असतो त्यामुळे रिस्क कमी. पण व्यवसायात झोकून देऊन काम केलं की प्रचंड यश, पैसा तुम्हाला मिळू शकतो. अर्थातच जितकी रिस्क घ्यायची क्षमता जास्त, मानसिकरीत्या सक्षम असाल तितकं यश तुमच्याकडे चालत येतं. शैलजा याही अशाच रिस्क घेऊन झोकून देऊन काम करणाऱ्या आहेत आणि त्याचं यशही त्यांना मिळत आहे.
आज शैलजा यांच्या ‘बेटर लिव्हिंग’ या फर्निचर ब्रॅण्डचं पहिलं शोरूम ‘सजावट’ कोल्हापूरमध्ये साकारलं आणि आता पुणे, मुंबई, कोल्हापूरसारख्या ठिकाणीही शोरूम्स आहेत. स्वयंपाकघर, बाथरूम, लिव्हिंग रूम, बागेत वापरलं जाणारं सर्व प्रकारचं फर्निचर या शोरूम्समध्ये उपलब्ध आहे. मोठय़ा वस्तूंबरोबरच शैलजा यांनी स्वत: तयार केलेल्या अनेक छोटय़ा छोटय़ा शोभेच्या (डेकोरेटिव्ह वस्तूही या शोरूम्समध्ये मिळतात. त्याचबरोबर फ्यूजन प्रकारातले काच, लाकूड, बांबू यांचा रॉट आयर्नबरोबर वापर करून विविध प्रकारचे फर्निचर बाजारात आणले जात आहेत. वस्तू सुंदर असण्याबरोबरच ती उपयोगीही असावी हा नियम त्या कटाक्षाने पाळतात. अजूनही दिवाळी, नवीन वर्ष अशा खास प्रसंगी शोरूम्स सजवण्याचं काम त्या स्वत:च करतात. आता तर ‘बेटर लिव्हिंग’चे फर्निचर ‘अ‍ॅमेझॉन’ वर ऑनलाइन उपलब्ध आहे. या कामातून नुसता पैसा नाही तर एक आत्मिक समाधानही मिळतं आणि त्या समाधानासाठीच मी काम करते, असं शैलजा आवर्जून सांगतात.
या कामाबरोबरच १९८७ पासून त्या कोल्हापूरमधल्या महिला सहकारी बँकेच्या संचालकपदी असून त्याचबरोबरीने गेली दहा र्वष अध्यक्षपदाची धुराही वाहत आहेत. नुकताच ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक इन इंडिया’ अशा पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं असून उद्योग क्षेत्रातील अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. या बँकेचा पदभार घेतला तेव्हा त्या सर्वात तरुण पदाधिकारी आणि अध्यक्ष होत्या. एखाद्या व्यक्तीला तुम्ही खायला दिलंत तर ती एका वेळची मदत होईल आणि दुसऱ्या वेळेसाठी तिला पुन्हा कोणाकडे तरी हात पसरावेच लागतील. त्यामुळे कोणालाही मदत करताना अशी असावी की त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात फरक पडेल असं शैलजांना वाटतं. एकटय़ा व्यक्तीने मदत करण्यातही अनेक अडचणी येतात त्यामुळे या महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून गरजू स्त्रियांना व्यवसायासाठी, घरासाठी कर्ज दिलं जातं. अनेक स्त्रियांना त्यातून उपजीविकेच्या संधी मिळतात. तरीही शैलजा यांना एक छोटीशी खंत आहे.
कोल्हापुरात सधन घरं, शेतीवाडी, दुग्धव्यवसाय यामुळे स्त्रिया घराबाहेर पडून स्वत:चा वेगळा मार्ग चोखाळत नाहीत. त्या घरातच अडकून पडतात आणि अगदी काही करायचा विचार केलाच तर गृहउद्योगाच्या पलीकडे जात नाहीत. पण आपली मानसिकता थोडी बदलून स्त्रियांनीही विविध प्रकारचे व्यवसाय करून बघावेत, असं शैलजा यांना मनापासून वाटतं.
व्यवसायात अडचणी येतातच. पण केवळ मी स्त्री आहे म्हणून मला अमुक अडचणी आल्या, असे त्या मानत नाहीत. ‘‘व्यवसायात पडलात की स्त्री-पुरुष दोघेही समान असतात. दोघांनाही समान स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ग्राहकही त्यांच्यात काही भेदभाव करीत नाहीत. आत्मविश्वासपूर्वक पण नेमकेपणाने सगळीकडे वावरणं, झोकून देऊन काम करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.’’ असं त्यांचं रास्त म्हणणं आहे. त्याचप्रमाणे व्यवसायात स्पर्धाही असणारच. पण आपण आपल्याला आणि ग्राहकांना काय पाहिजे याचा विचार करून उत्तम गुणवत्तेच्या वस्तू बनवल्या तर या स्पर्धेवरही मात करता येते, असं त्या मानतात.

उद्योजकांना सल्ला
हात सतत चालता राहिला तरच हाताला यश लाभतं. कठोर परिश्रमांना पर्याय नाही आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी कुठलाच शॉर्टकट उपलब्ध नाही, त्यामुळे सतत झोकून देऊन काम करायलाच पाहिजे.

उद्दिष्ट
इंजिनीअरिंग आणि कला यांचा संगम असलेला या व्यवसायात आतापर्यंत जसं झोकून काम केलंय तसंच पुढेही करत राहायचं आहे. व्यवसायातला अजून पुढचा टप्पा गाठायचा आहे.

शैलजा सूर्यवंशी, कोल्हापूर
Better Living
http://www.better-living.in
०८४४७५५६८९५
swapnalim@gmail.com