साडय़ांचा व्यवसाय सुरू तर केला पण घरगुती असल्यानं त्याला उधारीचा फास आवळला गेला. तो इतका की एक क्षण उधारीसाठी व्यवसाय बंद करावा का असा विचार मंजिरी आर्डे यांच्या मनात तरळला. मात्र क्षणातच या विचाराला बाजूला सारून साडी भिशीची अभिनव कल्पना अमलात आणली आणि.. सुरू झाली कपडा व्यवसायातील कोटय़वधींची उलाढाल!

वर्षभर पूर्ण विचार करून सुरू केलेला साडय़ांचा व्यवसाय! सुरू करतानाच अनेकांनी सांगितलं होतं की, या व्यवसायात पैसा लवकर सुटत नाही. पण तरीही मंजिरी आर्डे यांना कापड व्यवसायातच उतरायचं होतं. सुरुवातीला कर्ज काढून साडय़ा विकायला आणल्या. या साडय़ा उधारीनं लगोलग विकल्या गेल्या. पुन्हा एकदा कसाबसा पैसा उभा केला आणि साडय़ा आणल्या. याही वेळी तेच. उधारीने साडय़ा विकल्या जात होत्या पण हातात पैसा मात्र येत नव्हता. तेव्हाच मंजिरी यांना एक अभिनव कल्पना सुचली, साडय़ांच्या भिशीची. त्यातून त्यांच्या हातात पैसा येत गेला आणि आज नागपुरात त्यांचा मोठा कापड व्यवसाय उभा राहिला आहे.
पूर्वाश्रमीच्या मंजिरी भिडे मध्य प्रदेशातल्या भिलई इथे लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना शिक्षिकाच व्हायचं होतं त्यामुळे हिंदीतून शिक्षण घेत त्यांनी बी.एड. पूर्ण केलं. लग्न होऊन त्या नागपूरला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, इथे शिक्षिका व्हायचं तर मराठीतून शिक्षण होणं जरुरी होतं. शिक्षिका होता येणार नसलं तरी घरी बसून न राहता काही तरी व्यवसाय करायचं त्यांच्या मनाने घेतलं. घरातली परिस्थिती यथातथाच होती त्यामुळे व्यवसायाला भांडवल मिळणं कठीण होतंच. भिलईमध्ये एक कपडय़ांचे व्यापारी ओळखीचे होते, त्यांच्याशीही चर्चा केली आणि मंजिरी यांनी कापड व्यवसायच करायचा असे मनाशी ठरवून टाकले.
एकदा हे ठरल्यावर त्यांनी अनेक कपडय़ाची दुकानं जाऊन बघायला सुरुवात केली. बाजारात काय प्रकार उपलब्ध आहेत, कशाला मागणी आहे याचा अभ्यास केला. नागपुरात त्या काळात बहुतेक कापड दुकानदार सिंधी आणि मारवाडी होते. त्यांना मंजिरी यांनी मार्गदर्शन करण्याबद्दलही विचारले पण सगळीकडून नकारच मिळाला. शिवाय या व्यवसायात नफा मिळायला अनेक वर्षे लागतात, ग्राहकाच्या मागण्या आणि आवडी बदलत असल्यानं पैसा अडकत जातो असंच अनेक जणांनी सांगून निराश करायचा प्रयत्न केला. मंजिरी यांच्याकडे दुकानाला जागा नव्हती त्यामुळे त्या राहत्या घरातूनच व्यवसाय सुरू करणार असे कळल्यावर तर ‘क्रेडिट’वर कपडे द्यायलाही कोणी तयार होईना. एव्हाना आपल्याला हाच व्यवसाय करायचा आहे आणि त्यात जे काही व्हायचे ते होवो, पण पाऊल मागे घ्यायचे नाही, असे मंजिरी यांनी ठरवले. त्यांचे पती विलास आर्डे यांचाही त्यांना पाठिंबा होता.
१९८३ मध्ये व्यवसायाला सुरुवात करतानाच त्यांनी बँकेकडून पाच हजार रुपयांचं कर्ज मिळवलं. सुरुवातीला कमी किमतीच्या पण वेगळेपणा असलेल्या, सुमारे अडीचशे रुपये किमतीच्या विलासपूरच्या कोसा साडय़ा आणल्या. त्या हातोहात विकल्या गेल्या पण उधारीवर! उधारीवर व्यवसाय वाढणं कठीण होतं. वेगळा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात मंजिरी यांना साडय़ांच्या भिशीची कल्पना सुचली. काही स्त्रियांशी बोलल्यावर त्यांना जाणवलं की दर महिन्याला थोडे थोडे करून पैसे भरले तर वर्षांकाठी एक चांगली साडी होते ही कल्पना अनेक स्त्रियांना आवडतेय. आज आपल्याला अनेक प्रकारची भिशी माहीत असली तरी त्या काळात ही नवीच कल्पना होती. आधी स्त्रियांनी फक्त पैशाची भिशीच पाहिली असल्याने ही वेगळी भिशी करून बघण्यात त्यांनाही उत्सुकता होती. मग मंजिरी यांनी नागपूरला एक आणि भिलईला एक अशा दोन भिशी सुरू केल्या. यामुळे मंजिरी यांनाही हातात पैसा मिळायला लागला. थोडा नफा मिळाल्यावर तो नफा भांडवलात टाकून त्यांनी आणखी नवनवीन प्रकारच्या साडय़ा, सोलापुरी चादरी आदी विकायलाही सुरुवात केली. दर काही महिन्याला, वर्षांला त्या नवीन प्रकार आणत. त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा या व्यवसायात फारशा कोणी स्त्रिया नव्हत्या. नागपुरातल्या होलसेल बाजारात त्या जायच्या तर एकटय़ा स्त्रीला बघून अनेक लोकांना आश्चर्य वाटायचं. लोक त्यांच्याकडे विचारणाही करायचे. नवनवीन ठिकाणी फिरायचं, तिथल्या लोकांशी बोलून माहिती गोळा करायची यामुळे त्यांना खूप नवीन गोष्टी शिकता आल्या.
१९८८ पर्यंत व्यवसायातून बऱ्यापैकी नफा व्हायला लागला आणि पतीनेही नोकरी सोडून व्यवसायात उडी घेतली. अजूनही व्यवसाय घरातूनच सुरू होता. बराचसा माल उधारीवरच विकला जात होता. हळूहळू अनेक प्रकाराच्या वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध व्हायला लागल्या. मध्येच एक काळ असाही आला की खूपच उधारी झाली आणि व्यवसाय बंद करायचा की उधारी वसूल करायची असा प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेला. पण लगेचच ठाम राहात त्यांनी अनेक ठिकाणी फिरून उधारी वसूल केली आणि आपला व्यवसाय वाचवला. २००५ पर्यंत व्यवसाय खूपच वाढला होता. कोटय़वधींच्या उलाढाली होत होत्या त्यामुळे इथून पुढे व्यवसाय वाढवायचा असेल तर दुकान घेणं गरजेचं आहे हे दोघांनाही जाणवलं आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केले.
२००६ मध्ये नागपुरातल्या मुख्य रस्त्यावर ‘मंजिरी टेक्स्टाइल्स’ हे तब्बल साडेचार हजार चौरस फुटांचं भव्य दुकान उभं राहिलं. सुटकेसमध्ये भरून दहा साडय़ा आणून सुरू केलेला व्यवसाय आलिशान दुकानापर्यंत पोहोचला होता. पांढऱ्या शुभ्र रंगात सजवलेलं हे दुकान अनेकांसाठी आकर्षण ठरलं आहे. दुकान सुरू झाल्यापासून त्यांनी हळूहळू उधारी कमी करत आणली आणि आज त्यांच्या दुकानात पूर्ण रोखीनेच व्यवहार होतात. उधारीवरून पूर्ण रोखीत व्यवहार होणे ही मंजिरी यांच्यासाठी खूपच मोठी आश्वासक बाब होती. दर वर्षी एक तरी नवीन वस्तू विक्रीच्या यादीत आणता आणता आज त्यांच्याकडे इतकी विविधता आहे की त्यांच्या दुकानाचे घोषवाक्यच मुळी ‘साखरपुडय़ापासून बारशापर्यंत’ असं आहे. मंजिरी यांचा मुलगा आणि सूनही आता या व्यवसायात आले आहेत आणि कौटुंबिक व्यवसाय म्हणूनच हा नावारूपाला आला आहे. ग्राहकाला त्याच्या आवडीच्या वस्तू कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि आपुलकीच्या वातावरणात मिळतात त्यामुळे त्यांच्या ग्राहकांशीही त्यांची अनेक वर्षांची बांधिलकी आहे.
दुकानात सुमारे ३० स्त्रिया कामाला आहेत आणि त्याही अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत. दुकानात काम करणारा प्रत्येक जण मंजिरी यांच्या कुटुंबाचा एक सदस्य असल्यासारखाच आहे. त्यांच्यासाठी वार्षिक सहल, भत्ते, विमा योजना या सगळ्या गोष्टी मंजिरी आणि आर्डे कुटुंबीय आपुलकीने पुरवतात. ‘मंजिरी टेक्स्टाइल्स’मध्ये वेळेची शिस्तही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. सकाळी साडेदहाला दुकानात सगळे हजर राहणारच, मंजिरीही त्याला अपवाद नाहीत. शिवाय सुट्टय़ा कधी, कुठल्या घायच्या, वर्षांतून एकदाच सवलत योजना चालवायची यांचे वार्षिक वेळापत्रकही ठरलेलं आहे.
आपल्या यशाचं रहस्य सांगताना मंजिरी आर्डे एक व्यथाही बोलून दाखवतात. बऱ्याच स्त्रिया व्यवसाय करायचं ठरवतात, सुरूही करतात पण त्याला कायम दुय्यम स्थान देतात. घरात काही कार्य असलं, घे सुट्टी. काही काम आलं, घे सुट्टी. असा व्यवसाय केल्यानं त्यांचं नुकसान होतंच पण ग्राहकांचीही खूप अडचण होते आणि मग व्यवसाय अधोगतीला लागतो. व्यवसाय करायचा तर तो शिस्तीनं आणि सचोटीनं. व्यवसायात संयमही हवा. त्यातून नफा मिळायला कधी कधी काही र्वष जावी लागतात, पण त्या काळात धीर धरून नेटानं व्यवसाय सुरू ठेवावा लागतो. व्यवसायाबद्दल सांगताना मंजिरी त्याला चक्क एका रथाची उपमा देतात. मेहनत, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता या चार चक्रांवर हा रथ चालतो. पण अकाऊंट्स, अर्थ, मार्केटिंग, जाहिरात, विक्रयकला, मानवी नातेसंबंध आणि ग्राहकाभिमुखता या सात घोडय़ांचा लगाम मालकाच्या हाती असायला हवा आणि त्याला योग्य तो आवरही घालता यायला हवा. तरच हा व्यवसायरूपी रथ योग्य मार्गावर राहतो. इतक्या विचारपूर्वक व्यवसायाचं हे मर्म जाणून घेतल्यामुळेच मंजिरी आर्डे आणि कुटुंबीय आज इतका मोठा उद्योग उभा करू शकले,यात शंका नाही.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल

मंजिरी आर्डे, मंजिरी टेक्स्टाइल्स
रिंग रोड, विद्या विहार कॉलनी, प्रताप नगर, नागपूर
०७१२-२२८८८००
सल्ला
स्त्रियांनी खूप शिकावं, मोठं व्हावं. पण शिकून नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट ठेवावं. त्यातून आणखी काहींना रोजगार पुरवावा आणि आपल्यासारख्या काही महिलांना पायावर उभं राहायला मदत करावी.

व्यवसायातील तत्त्व
वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि सचोटी हे व्यवसायात हवेतच. कर्म करत राहिलं तर त्याचं चांगलं फळ मिळतं यावर मनापासून विश्वास.

swapnalim@gmail.com