सुरुवातीला केवळ दोन स्त्रियांना घेऊन सोनल पाटील यांनी गणवेश शिवण्याचं काम सुरू केलं होतं, पण आज त्या साठ कंपन्या, ७०/८० शाळा, विविध सिक्युरिटी फम्र्स, कॉर्पोरेट ऑफिस, हॉस्पिटल्स इत्यादींचे युनिफॉर्म शिवतात. त्यासाठी आज त्यांच्याकडे ११५ जण रोजगारावर असून दरवर्षी कोटय़वधीची उलाढाल होते आहे. मात्र त्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच मोठी जोखीम घेतली आणि त्यातून त्याचं मोठय़ा व्यवसायाचं ‘श्री युनिफॉम्र्स अ‍ॅण्ड गारमेण्ट्स प्रा. लि.’चं स्वप्न पूर्ण झालं.

खूप जण स्वत:चा व्यवसाय सुरू करताना त्यात पैसा गुंतवायला घाबरतात किंवा सुरुवात म्हणून घरगुती स्वरूपात करून बघू असा विचार करतात. अर्थात त्यात काही चूक नाही. व्यवसायाचा अनुभव गाठीशी नसताना, फारसे खेळते भांडवल नसताना किंवा क्वचित प्रसंगी खायचीच भ्रांत असताना मोठी उडी मारणं तसं कठीणच. मात्र, असं म्हणतात की, व्यवसायात आणि आयुष्यात जितकी मोठी जोखीम घ्याल तितके मोठे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. काही लोक ही मोठी जोखीम सहजी घेतात, कारण त्यांना यशस्वी भविष्य खुणावत असतं. पुण्याच्या सोनल पाटील याही अशाच मोठी गुंतवणूक करून व्यवसायात उतरलेल्या, त्याचा परतावा म्हणून मिळालेलं यशही तितकंच भव्यदिव्य आहे.

मूळच्या नाशिकच्या असलेल्या सोनल पाटील यांनीही इतरांप्रमाणेच बीएड केलं आणि शाळेत नोकरीही सुरू केली; पण ते करत असताना आपण यात रमत नाही, आयुष्यात काही तरी वेगळं करायला हवं, कुठे तरी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करून आपण लोकांना रोजगार द्यावा, असं सातत्यानं वाटत होतं. लग्न होऊन पुण्याला आल्यावर ती नोकरी बंद झाली आणि काही काळातच त्यांचे पती गजानन पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांचीही नोकरी गेली. घरात पैशाची चणचण सुरू झाली. पुन्हा शिक्षक म्हणून नोकरी करत तुटपुंज्या पगारात घर चालवायचं किंवा आधीपासून डोक्यात असलेला व्यवसायाचा मार्ग निवडायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यात त्यांनी व्यवसायाची निवड केली, पण कोणता व्यवसाय सुरू करायचा हा प्रश्न होताच. गजानन पाटील हे आधी परचेस विभागात काम करत होते. त्यांना कंपन्यांसाठी गणवेश वगैरे विकत घेण्याची माहिती होती, त्यामुळे मग सोनल यांनी गणवेश बनवायचा व्यवसाय करण्याचं नक्की केलं.

इतर कुणी असती तर घरी एक मशीन घेऊन कपडे शिवू असा विचार केला असता; पण इथेच सोनल यांचं वेगळेपण लक्षात येतं. आधी त्यांनी आसपासच्या शाळांमध्ये सर्वेक्षण केलं आणि त्यांना कशा प्रकारच्या गणवेशांची अर्थात युनिफॉर्मची गरज आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, पालकांचं काय म्हणणं आहे ते माहिती करून घेतलं. मोठय़ा ऑर्डर मिळवायच्या तर घरगुती उद्योग आहे, असं दाखवून चालणार नाही हे त्यांनी ओळखलं. बिझनेसमध्ये उतरायचे तर ते पूर्ण तयारीने हे ठरवून स्वत:चे दागिने विकून त्यांनी भांडवल उभं केलं. त्यातून एक गाळा भाडय़ाने घेतला, त्यात चार शिवण मशीन्स आणल्या आणि दोघींना रोजगारावर ठेवले. पहिलीच ऑर्डर मिळाली ती एका शाळेचे साठ युनिफॉर्म शिवायची. ती ऑर्डर वेळेत पूर्ण केली आणि व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.

त्यानंतर थोडय़ाच काळात त्यांच्या लक्षात आलं की, शाळेचे युनिफॉर्म शिवणं हे ठरावीक काळापुरतं काम होईल. त्यामुळे त्यांनी आजूबाजूचे गॅरेज, वर्कशॉप, छोटय़ा कंपन्या इथे चौकशी करायला सुरुवात केली. मग तिथूनही ऑर्डर्स मिळायला लागल्या. हळूहळू ऑर्डर वाढल्या तशी जागा कमी पडू लागली, त्यामुळे सोनल यांनी एक बंगला भाडय़ाने घेतला, त्यात सुमारे ५० मशीन्स घेऊन तिथल्या स्त्रियांना रोजगार दिला. गरज पडली तेव्हा स्वत:चे राहते घरही विकून भांडवल उभं केलं.
व्यवसाय इतका वाढला की, वर्षभर काम पुरायला लागलं आणि जागा कमी पडायला लागली. त्यांच्या लक्षात आलं की, जागा भाडय़ाने घेतल्याने मिळवलेला नफा भाडं भरण्यात खर्च होतोय. त्यामुळे त्यांनी २०१२ मध्ये कर्ज काढून स्वत:ची तीन गुंठे जागा घेतली व तिथे १३० मशीन्स आणि ऑफिसची सोय केली.

सुरुवातीला या व्यवसायासाठी बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या; पण भारतीय युवाशक्तीच्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळालं. या सुमारास त्यांचे पती बरे होऊन दुसरीकडे नोकरी करत होते, पण सोनल यांनी त्यांनाही याच व्यवसायात यायला सांगितलं आणि घरचाच एक हात त्यांना मिळाला. त्यामुळे मार्केटिंगची जबाबदारी गजानन पाटील यांच्याकडे, तर कारखान्यातील रोजचं कामकाज, लोकांना सांभाळणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, कामाचे एस्टिमेट देणं ही कामं सोनल यांच्याकडे आली.
सोनल यांनी इंडियामार्टमध्ये कंपनी रजिस्टर केली, वेबसाइट सुरू केली आणि आता विविध ठिकाणांहून त्यांना ऑर्डर्स मिळतात. सुमारे साठ कंपन्या, ७०/८० शाळा, विविध सिक्युरिटी फम्र्स, कॉर्पोरेट ऑफिस, हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी त्या युनिफॉर्म पुरवतात. याचबरोबर वर्षभर शालेय युनिफॉम्र्स व इतर संबंधित गोष्टी मिळाव्या म्हणून पुण्यात सिंहगड रोडवर एक किरकोळ विक्री दुकानही त्यांनी सुरू केलं आहे.

सगळं सुरळीत झालं, व्यवसाय चांगला सुरू होता आणि अचानकच एका मोठय़ा संकटाचा सामना पाटील कुटुंबाला करावा लागला. दिवाळीच्या सुमारास दरवर्षीप्रमाणे रिटेल दुकानात भरपूर कपडेही भरले होते आणि एके रात्री शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. सगळे कपडे जळून गेले, शिवाय आग विझवण्यासाठी पाणी मारल्याने उरलेले कपडेही खराब झाले. हे नुकसान खूप मोठं होतं.

इन्श्युरन्स होता, पण त्यातून तुटपुंजा परतावा मिळाला. मग सोनल यांनी नव्याने भांडवल गोळा करून काम सुरू केलं. कर्ज आणि त्याचा काळ वाढवला आणि विस्कटलेली घडी पुन्हा बसवली. हा मोठा फटका सोसूनही २००८ मध्ये सुरू झालेला ‘श्री युनिफॉम्र्स अ‍ॅण्ड गारमेण्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’
हा व्यवसाय आज कोटय़वधी रुपयांची उलाढाल करत आहे.
सुरुवातीला केवळ दोन स्त्रियांना घेऊन सोनल यांनी काम सुरू केलं होतं, पण आज त्यांच्याकडे ११५ जणांना रोजगार उपलब्ध असून स्त्रिया जास्त संख्येने आहेत. जगभरात स्त्रियांना कमी पगार, नोकरीची नसलेली हमी वगैरे विषयांवर चर्चा झडत असताना ‘श्री युनिफॉम्र्स अ‍ॅन्ड गारमेण्ट्स’मध्ये मात्र वेगळं चित्रं दिसतंय. इथे स्त्रियांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसारखी नोकरी, वर्षभराने पगारवाढ, बोनस इत्यादी सोयी आहेत, तर पुरुष कामगारांना मात्र जितके काम केले त्याप्रमाणे रोजगार आहे. सोनल म्हणतात, ज्या भागात स्त्रिया कामासाठी उपलब्ध होतील अशाच भागातली जागा घेतली. या स्त्रियांना त्यांच्या घराजवळ, चांगल्या पगाराची नोकरी मिळते, त्यामुळे नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण नगण्य आहे. काही स्त्रिया पूर्णवेळ काम करू शकत नाही. अशा वेळी घरी मशीन असेल तर त्या काम घरीही घेऊन जातात. कारखान्यात २४ तास दोन शिफ्टमध्ये काम सुरू असतं.
आज त्यांनी या व्यवसायात ‘आयएसओ ९००१-२००८’ सर्टिफिकेशन मिळवलं आहे. तसंच सुरुवातीला प्रोप्रायटरी असलेला हा व्यवसाय प्रचंड गतीने वाढत असल्याचे पाहून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. कामात अडचणी आल्या. प्रसंगी नुकसानही झालं. त्यातून बरेच धडे त्या शिकल्या; पण काम नेहमीच उत्तम प्रतीचे, ऑर्डरबरहुकूम आणि अगदी वेळेवर झालं पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. २०१५च्या यंग आंत्रप्रेनर म्हणून ‘युथ बिझनेस इंटरनॅशनल’मार्फत त्यांना सन्मानित केलं आहे.

अर्थात पुढची वाट खुणावते आहेच. अजून व्यवसाय वाढवायचा आहे, मोठय़ा कंपन्यांच्या ऑर्डर्स , सरकारी ऑर्डर मिळवायच्या आहेत, हे च आता त्यांचं लक्ष्य आहे.
– सोनल पाटील, पुणे</p>

उद्दिष्ट/तत्त्व
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ग्राहकाशी प्रामाणिक राहून त्यांची मागणी वेळेत पूर्ण करणं फार गरजेचं आहे. प्रसंगी नफा कमी झाला तरी ग्राहकाचा विश्वास संपादन केला तरच पुढे भरभराट होत राहते.

सल्ला
आजकाल सरकार व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहे त्याचा फायदा घ्या. व्यवसायात उतरणं कठीण वाटलं तरी इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे. अडचणी येणारच, पण त्यावर मार्ग काढत आपलं काम पुढे सुरू ठेवा.

– स्वप्नाली मठकर