19 January 2021

News Flash

‘खोटय़ा’ दागिन्यांची ‘खरी’ कहाणी

रोजच्या सारखेच ठाण्याच्या राममारुती रोडवर दागिन्यांचे टेबल लावले होते.

रस्त्यावर टेबलावरच सुरू केलेला त्यांचा दागिन्यांचा व्यवसाय जेव्हा उधळला, फेकला गेला तेव्हाच आपलं स्वत:चं दुकान थाटायची त्यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यातूनच उभं राहिलं, तीन मजली दुकान ‘जयश्री कलेक्शन.’ जयश्री रामाणे यांच्या शून्यांतून भरारी घेतलेल्या या उद्योगाविषयी..

रोजच्या सारखेच ठाण्याच्या राममारुती रोडवर दागिन्यांचे टेबल लावले होते. नवीन डिझाइनचे दागिने घेण्यासाठी बायका नेहमीसारख्याच झुंबड करून उभ्या होत्या. इतक्यात कसलासा गोंधळ ऐकू आला. काही कळायच्या आतच अतिक्रमण रोखणाऱ्यांची, पालिकेची गाडी आली आणि पळापळ सुरू झाली. टेबलावर निगुतीने लावलेला माल धसमुसळेपणाने उचलला गेला आणि अतिक्रमणविरोधी गाडीत फेकला गेला. अर्धे दागिने रस्त्यावर पडले. तिथे उभ्या असलेल्या ग्राहक स्त्रिया आपापल्या परीने दागिने उचलून पिशवीत भरायला मदत करायला लागल्या. रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून मेहनतीने बनवलेले दागिने असे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले बघून जयश्रीताईंना काय वाटले असेल याची कल्पनाच करवत नाही. खाली पडलेल्यामधला थोडा माल हाताशी आला, बाकी सगळा बुडीत खात्यात गेला. झालेल्या नुकसानाच्या दु:खामुळे आणि अपमानामुळे डोळ्यांतून पाणी वाहत असले तरी मनाशी मात्र एक निर्णय पक्का होत होता, स्वत:चे दुकान थाटण्याचा!
ठाण्याच्या जयश्री रामाणे यांनी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कपडे विकण्यासारखे विविध घरगुती उद्योग करून पाहिले होते. पण हातातील कलेला वाव मिळाला तो दागिने बनवण्याच्या कामामुळे. सुरुवातीला घरच्या घरी दागिने करून त्या विकायच्या. नंतर व्यवसाय वाढवण्यासाठी रस्त्याच्या कडेला टेबल भाडय़ाने घेऊन तिथे विक्री सुरू केली. रोज घरदार सांभाळून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत दागिने बनवायचे आणि संध्याकाळी चार वाजता ते टेबलावर दुकान लावून विकायचे. सुरुवातीला फक्त सुटीच्या दिवशी चालणारा हा व्यवसाय ग्राहकांच्या मागणीनुसार वाढला आणि रोज टेबल लावणे सुरू करावे लागले. घरातले आटपून, मुलीला सांभाळत मुंबईला जाऊन कच्चा माल आणायचा, दुपारी चार ते रात्री नऊ  दुकान लावायचे. पुन्हा घरी आले की मुलीला सांभाळत स्वयंपाकपाणी करायचे आणि रात्री दोन वाजेपर्यंत नवे दागिने घडवायचे, असा अत्यंत व्यग्र दिनक्रम. मेहनतीने घडवलेल्या या दागिन्यांना दुसऱ्या दिवशी ग्राहकांची पसंती मिळाली की त्यांना स्वत:च्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटे. जयश्रीताईंच्या नवनवीन डिझाइनच्या दागिन्यांची चर्चा बायकांच्या गप्पांमध्ये, ट्रेनमध्ये व्हायला लागली, डोंबिवली-कल्याण अशा ठिकाणांहूनही त्यांच्याकडे ग्राहक यायला लागले. २००० मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय वाढत असतानाच अतिक्रमणविरोधी दलाच्या धाडीही पडायला लागल्या आणि अशीच एके  दिवशी रोजची ससेहोलपट असहय़ होऊन त्यांनी दुकान घेण्याचे नक्की केले.
सुरुवातीला नौपाडा येथे दुकान सुरू केले आणि अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले. जयश्रीताईंकडचे बहुतेक सगळेच दागिने त्यांनी कल्पकतेने घडवलेले असतात. मात्र दुकानात दागिने ठेवायचे तर ते एक, दोन नग ठेवून चालणार नव्हते. एकेका डिझाइनचे जास्त नग लागणार. ते पुरवण्यासाठी मग कारखानाही सुरू केला. ऐरोलीतल्या आनंदनगर इथल्या गरीब वस्तीत सुरू केलेला, सुरुवातीला आठ जणी असणारा हा कारखाना आता पंचवीस स्त्रियांचे घर चालवतो. जागेचा प्रश्न सुटला की हा कारखाना अजून वाढवायचा जयश्रीताईंचा मानस आहे.
सात-आठ वर्षे नौपाडा इथले दुकान चालवल्यावर जयश्रीताईंची पुढची झेप म्हणजे मोक्याच्या ठिकाणावरचे जांभळी नाक्याचे तीन मजली दुकान. याची कहाणी वेगळीच. आधी हे दुकान भाडय़ाने घेतले, उद्घाटन केले आणि पहिल्या दिवशीच प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण दुर्दैवाने काही दिवसांनीच मूळ मालकाने कर्ज फेडले नसल्याने दुकान सील करण्याबाबत बँकेची नोटीस आली. आता इतका प्रचंड माल, फर्निचर सगळेच फुकट जाणार असे वाटायला लागले. मात्र पुन्हा एकदा या कठीण प्रसंगानेच त्यांना पुढे जायची संधी दिली. डेक्कन बँकेचे मॅनेजर मोरे यांनी हे दुकान विकत घेण्याबाबत सुचवले आणि शाब्दिक पाठिंबा दिला. तीनेक कोटींचे हे दुकान विकत घ्यायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. पण या वेळी सगळा कर्मचारीवृंद मदतीला आला, त्यांनी हिंमत दिली. इतके वर्ष इथे काम करणारे सगळेच आपुलकीने आणि प्रेमाने खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांच्या आधाराने पंखांना बळ आले आणि मोठी भरारी घेत हे मोठे तीन मजली दुकान घ्यायचा सौदा पक्का झाला. एकदा हा निर्णय पक्का झाल्यावर मात्र आलेल्या सगळ्या अडीअडचणींना तोंड देत त्यांनी समर्थपणे हे शिवधनुष्य पेलले.

जांभळी नाक्याच्या ‘जयश्री कलेक्शन’मध्ये एकदा पाय ठेवला की सगळी खरेदी इथेच करता यावी, असा विचार करून अनेक प्रकारचे दागिने आणि वस्तू इथे ठेवल्या जातात. मोत्याचे-खडय़ांचे फॅन्सी दागिने, नाजूक सेटपासून ठसठशीत पारंपरिक दागिने, असंख्य प्रकारची मंगळसूत्रे, बांगडय़ा, एक ग्रॅम ज्वेलरीचे अनेक प्रकार इथे उपलब्ध आहेत. अगदी एकदाच घातले जाणारे ‘ब्रायडल कलेक्शन’ही आहेतच पण काही ब्रायडल सेट्स चक्कभाडेतत्त्वावरही उपलब्ध आहेत. इथल्या कर्मचारी अगदी हौसेने, प्रेमाने आणि न कंटाळता कितीही वेळ सगळ्या ग्राहकांना दागिने दाखवत असतात, कोणाला काय सूट होईल, कोणत्या साडीवर कोणते दागिने चांगले दिसतील याबद्दल सुचवतात, दागिने घालून पाहायला मदत करतात. त्यामुळे ग्राहकही खूश असतात. जांभळी नाक्याच्या दुकानाचा हा मोठा पसारा सांभाळायला त्यांची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण निकिता त्यांना मदत करतात आणि जाऊ  कार्तिकी यांनी नौपाडा येथील दुकानाची जबाबदारी घेतली आहे. लवकरच दादरला नवीन दुकान सुरू करायचा त्यांचा विचार आहे, शिवाय आता फ्रँचायजीही द्यायच्या आहेत.

इतका मोठा व्यवसाय सांभाळतानाही जयश्रीताई रोज एक तास त्यांच्या आवडत्या कामाला म्हणजे नवीन डिझाइन तयार करण्यासाठी देतात. प्रत्येक सणाच्या वेळी, नवीन सीझनला नवीन काही तरी ग्राहकाला द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. या वर्षी नवरात्रीला खणाचे कापड वापरून केलेले दागिने ही खासियत होती. इमिटेशन ज्वेलरीमधली पहिली बुगडी त्यांनी बनवली, बकुळीहार, फुले यांचे डिझाइन्स आणले. नवीन दागिने पहिल्यांदा ‘जयश्री कलेक्शन’मध्ये उपलब्ध होतात आणि नंतर बाजारात इतरत्र मिळतात. ‘होणार सून मी हय़ा घरची’ या मालिकेतील जान्हवीचे प्रसिद्ध मंगळसूत्र ही त्यांची कलाकृती आहे. ऊर्मिला मातोंडकरच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी दागिने घडवले आहेत. वेगळ्या प्रकारचे दागिने घडवणे म्हणजे त्यांच्यासाठी कलेची साधना आहे आणि त्यातून ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांना खूप काही देऊन जातो. त्यांच्या दागिन्यांचे पॉलिशही खास प्रकारचे असते, त्यामुळे ते काळे न पडण्याची हमी दिली जाते.

त्यांचा व्यवसाय घाऊक असल्याने अनेक स्त्रिया प्रदर्शनासाठी किंवा घरगुती व्यवसायासाठी ‘जयश्री कलेक्शन’ मधून कच्चा माल घेऊन जातात. आज शंभरपेक्षा जास्त स्त्रिया इथून दागिने घेऊन जाऊन आपापला व्यवसाय करतात. कुणा गरजू स्त्रीकडे ते घ्यायला पैसे नसतील तरीही तिला माल दिला जातो आणि मग विक्री झाल्यावर ती पैसे आणून देते. अडचणीत असलेल्यांना त्या नेहमीच मदत करतात. कामासाठी आलेल्या व्यक्तीला नाराज केले जात नाही. हजारो रुपयांचे दागिने घेताना अनेकींना भीती वाटते पण जयश्रीताई त्यांना हिम्मत देतात. जमेल तितक्या स्त्रियांना त्या व्यवसायाकडे वळवतात. गरज असेल तर पतपेढीतून कर्ज मिळवून द्यायला मदत करतात. आता त्यांचे हे दागिने धुळे, नागपूर, पुणे, नाशिक इतकेच काय तर अमेरिकेलाही जातात. मुळात मराठी स्त्रिया व्यवसायात फार कमी उतरतात, असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या स्त्रियांना व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्या स्वत: अगदी साध्या घरातून आलेल्या. परिस्थितीमुळे या व्यवसायात उतरल्या तेव्हा घरातून त्यांना आर्थिक आधार मिळण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही जिद्दीने त्या आज इथवर आल्या.

कधी तरी स्वत:च्या आयुष्याकडे त्या त्रयस्थपणे बघतात तेव्हा एक रस्त्याच्या कडेला दुकान टाकणारी स्त्री इतका मोठा डोलारा उभा करू शकते याबद्दल त्यांचे त्यांनाच आश्चर्यही वाटते. आपल्या साध्यासुध्या आईच्या नजरेत दिसणारा मुलीबद्दलचा सार्थ अभिमान त्यांना पुढचे काम करण्याची प्रेरणा देतो. रोटरी क्लबचा ‘फीमेल आन्त्रप्रनर पुरस्कार’, ‘नवउन्मेष पुरस्कार’, माळी समाजाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ असे पुरस्कार स्वीकारताना त्या या यशाचे श्रेय त्यांच्या विविध टप्प्यांवर मदत करणाऱ्या माणसांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना देऊन टाकतात. व्यवसाय वाढवतानाच अजून एखादी अशी ‘जयश्री’ तयार करण्याची इच्छा मनात बाळगत नवी झेप घ्यायला सिद्ध होतात.

आयुष्याचा आणि करिअरचा मूलमंत्र
‘‘माझ्यासारखी अजून एक तरी ‘जयश्री’ तयार झाली तर माझ्या अनुभवाचे सार्थक होईल.’’

उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी सल्ला
‘‘व्यवसायात फायदा-तोटा होतच असतो पण आपण चिकाटी न सोडता कष्ट करत राहिलं पाहिजे. स्त्रियांचे जीवन कष्टप्रद असते पण तरीही त्यांनी जिद्दीने स्वावलंबी बनत अडचणींवर मात करायला शिकलं पाहिजे.’’
– जयश्री रामाणे, ठाणे
जयश्री कलेक्शन, जांभळी नाका, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 1:03 am

Web Title: success story ofjayashri collection
Next Stories
1 उद्योगवर्धिनी
Just Now!
X