06 July 2020

News Flash

ब्लेड विक्री ते कारखानदारी

व्यवसाय उद्योग म्हटलं की असंख्य अडचणी येणारच.

सुलोचना भाकरे यांनी सुरू केलेल्या ब्लेडविक्रीतून त्यांना सलून आणि पार्लरला आवश्यक सामान पुरवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. त्यातूनच त्यांनी सलूनला लागणाऱ्या खुच्र्या बनवणेही सुरू केले. अडतिसाव्या वर्षी कारखानदार झालेल्या सुलोचनाताईंना आता सुपर बाझार उभारण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.
व्यवसाय उद्योग म्हटलं की असंख्य अडचणी येणारच. अडचणीवर मात करून त्याचे नवीन संधीत रूपांतर करणं हा उद्योगाचा खरा पाया म्हणायला हवा. मोठमोठय़ा बिझनेस स्कूल्समध्येही हे शिकवलं जातं. पण काही जणांना मात्र हे ज्ञान उपजतच असतं. कितीही अडीअडचणी येवोत, ते त्यातून तावूनसुलाखून पुन्हा एकदा झळाळत्या रूपात पुढे येतात.
सोलापूरच्या सुलोचना भाकरे यांना हे कौशल्य उपजतच असावं. सोळा-सतराव्या वर्षी सुलोचनाताईंचं लग्न झालं. त्यांचे पती कृष्णा भाकरे खासगी कंपनीत कामाला असल्याने पगार अगदीच तुटपुंजा होता. घरातल्या हलाखीच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लग्न झाल्या झाल्या आठवडाभरात शिलाई मशीन घेऊन तयार कपडे शिवून देणं, टॉवेलला टिपा मारून देणं अशी कामं करायला त्यांनी सुरुवात केली. कुटुंब वाढलं पण त्याला पुरेसा पैसा घरात येतच नव्हता. त्यामुळे त्या कुक्कुटपालनाकडे वळल्या.

सुमारे पाचशे कोंबडय़ांपर्यंत वाढलेला व्यवसाय सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्याने बंद करावा लागला. मग पनवेलवरून खडे मीठ आणून किरकोळीत विकायचा व्यवसाय सुरू केला. इथेही खीळ बसली कारण मिठात आयोडिन असण्याचा नियम झाला. झालं! हाही व्यवसाय बंद पडला. मग घराजवळच्या विडी कारखान्यात त्या विडय़ा वळायला लागल्या. दिवसाला पंधराशे विडय़ा वळल्यावर तुटपुंजी रक्कम हाताशी यायची.

त्यांचे पती नोकरी संपल्यावर संध्याकाळी सलूनमध्ये काम करत. या काळात दोघांनी मिळून सलूनच्या व्यवसायात काय सामान लागतं याची माहिती करून घेतली. एकदा सुलोचनाताईंनी मैत्रिणीकडून आणि टॉवेल दुकानदाराकडून थोडे पैसे उधार घेतले. ३९० रुपयांचं एक २०० ब्लेडचे पाकीट विकत आणले. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा करून आपल्या नव्या व्यवसायाला आरंभ केला. प्रत्येक सलूनमध्ये ब्लेड द्यायचे आणि दोन दिवसांनी एका ब्लेडचे दोन रुपये वसूल करायचे. मग दुकानदारांनी सलूनमध्ये लागणाऱ्या क्रीम, लोशन अशा इतर वस्तूही मागितल्या. त्यामुळे घाऊक मालाची दुकानं शोधून तिथून वस्तू आणून दुकानदारांना पुरवल्या.

हळूहळू दुकानदारांची मागणी वाढली. सलूनमध्ये लागणाऱ्या अनेक वस्तू, अगदी पंखा, टय़ूबलाइटसुद्धा सुलोचनाताई आणि त्यांचे पती पुरवायला लागले. या सगळ्या वस्तू अध्र्या किमतीत देऊन आठवडय़ाने हप्ते वसुलीला जावं लागायचं. अनेक वेळा मुलांना सायकलवर बसवून ताई वसुली करत हिंडायच्या. सगळीकडे फिरून वसुली करणं अधिकाधिक कठीण होऊ लागलं, तसं त्यांनी एक दिवस ठरवून घेतला. त्या दिवशी त्या घराच्या ओटय़ावरच विडय़ा वळत बसत आणि लोक जाता येता त्यांचे पैसे चुकते करत.

१९९८ मध्ये संस्कृती प्रतिष्ठानतर्फेचे महिला उद्योजकांचं एक प्रदर्शन भरलं होतं. त्या प्रदर्शनातल्या स्टॉलचं भाडं भरायलाही पैसे नव्हते. त्या वेळी त्या ‘उद्योगवर्धिनी’च्या चंद्रिकाताई चौहान यांना भेटल्या. त्यांनी नफा झाला तरच भाडं द्या, असं सांगून स्टॉल घ्यायला लावला. तिथे दीड दिवसातच सगळा माल संपला आणि त्या नफ्यातून सुलोचनाताईंनी स्टॉलचं भाडं दिलं. २००० मध्ये एकरकमी दोन हजार रुपये पहिल्यांदाच हाताशी आले आणि त्यांनी तडक पुणे गाठले. तिथे चार-पाच पिशव्या भरून सलूनचे सामान घेऊन आल्या व तो विकून पावणेतीन हजार रुपये मिळवले. त्या वेळी पहिल्यांदा त्यांना नफ्याची मार्जिन कशी आखायची हे कळलं आणि व्यवसायाचं नवं पर्व सुरू झालं.

या सुमारास त्यांच्या सासूबाई खूप आजारी पडल्या. सगळं काही अंथरुणावर. अनेक र्वष त्यांची सगळी सेवा करत, आपल्या लहान मुलांना सांभाळत सुलोचनाताई आपला व्यवसायही वाढवत होत्या. सलूनमध्ये लागणाऱ्या वस्तू त्या पुण्याहून घाऊक खरेदी करत. स्त्रियांना व्यवसायात उभं राहताना किती प्रकारे घरादारातल्या अडचणी सोडवायला लागतात हे सांगताना त्या एक प्रसंग सांगतात. ‘उद्योजक कसे घडवायचे’ या विषयावरचं जिल्हा उद्योग केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाला त्यांनी सुरुवात केली. सोबत दीड महिन्याचं बाळ घेऊन त्या रोज पाच-सहा किमी पायपीट करत प्रशिक्षणाासाठी यायच्या. एकदा बाळ आजारी पडलं, त्याला जुलाब व्हायला लागले. त्याच्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून त्या बाळाला घेऊन बाहेर बागेत बसल्या आणि तिथून ते लेक्चर ऐकत होत्या. त्या वेळी तिथले व्यवस्थापक योगिराज देवकर यांना त्यांची अडचण कळली. आजारी बाळाला त्यांनी स्वत: सांभाळत सुलोचनाताईंना लेक्चर ऐकायला पाठवलं. त्या वेळी अशी मदत मिळाली नसती तर ते प्रशिक्षण पूर्ण करणं कठीण होतं.

सुरुवातीला सुलोचनाताई सलूनमध्ये लागण्याऱ्या पाइप खुच्र्याही पुण्याहून घेऊन येत. सुटय़ा भागांमध्ये आलेल्या पाइपला ड्रिल करून ते भाग जोडून खुर्ची तयार करायची. एकदा त्या खुच्र्याच्या पॅकेजिंगमधून अहमदाबादच्या कंपनीचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक असलेलं लेबल आलं. तेवढय़ावरून सुलोचनाताई आणि त्यांचे पती अहमदाबादला जाऊन थडकले. तेव्हापासून त्यांच्या खुच्र्या अहमदाबादवरून यायला लागल्या. सुरुवातीला एकदा त्या पतीबरोबर डीलर्सकडे गेल्या, पण नंतर मात्र त्या एकटय़ाच प्रवास करायला लागल्या. तिथे जायला लागल्यामुळे त्यांची विविध घाऊक व्यापाऱ्यांशी ओळख झाली. कुठून कसलं सामान मिळतं याची माहिती मिळाली आणि मग मुंबई, राजकोट, मीरत, आग्रा, हैदराबाद अशा विविध ठिकाणांहून त्या सामान मागवायला लागल्या.

एव्हाना लेडीज पार्लरमधूनही त्यांना या सामानाची विचारणा व्हायला लागली. ती माहिती करून घेत आता त्या लेडीज पार्लरमधील सगळंच साहित्य, ब्रायडल ज्वेलरी अशा अनेक वस्तू पार्लर्सना पुरवायला सुरुवात केली. नंतर त्यांनी सोलापुरात सरकारी गाळे नव्याण्णव वर्षांच्या भाडेकराराने घेऊन तिथं ‘जय श्री गणेश मार्केटिंग’ हे दुकान थाटलं.

एकदा ‘उद्योगवर्धिनी’च्या चंद्रिकाताईंबरोबर खादी ग्रामोद्योगच्या अधिवेशनाला सांगोल्याला गेल्या असताना तिथे व्यवसायासाठी दहा लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात होतं. दोघींनी कुठला व्यवसाय उभा करता येईल याची रात्रभर चर्चा करून शेवटी सलूनला लागणाऱ्या खुच्र्याची बांधणी करण्याच्या व्यवसायासाठी सुलोचनाताईंनी कर्जाचा अर्ज केला. काही वर्षांपूर्वी केवळ पाच हजार रुपये कर्जासाठीही जामीन न मिळणाऱ्या सुलोचनाताईंचं हे कर्ज मान्यही झालं. कर्ज मिळालं पण कारखाना उभारायची जागाच ठरली नव्हती. बरीच शोधाशोध करून अटींची पूर्तता करणारी जागा पदरात पडली आणि कारखान्याची पायाभरणी झाली. तिथेही वीज जोडणी मिळण्यापासून अनेकविध अडचणींना तोंड देत कारखाना सुरू केला. आज सोलापूर जिल्हा आणि आसपास लागणाऱ्या पाइप खुच्र्या तिथेच बनतात आणि सलून व पार्लर्समध्ये पोहोचवल्या जातात. त्यांचे हे काम पाहून खादी ग्रामोद्योग मंडळाकडून त्यांना तीन लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ‘उद्योगजननी कमल पुरस्कार’, सावित्रीबाई फुले पुरस्कार’-सोलापूर म.न.पा., २००८ साली ‘बेस्ट आंत्रप्रनर’, दिल्ली, अशा सुमारे सतरा-अठरा पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवण्यात आले आहे.

आता त्यांची मुलं मोठी होऊन त्यांना व्यवसायात हातभार लावत आहेत. मात्र अजूनही सगळा प्रवास त्या स्वत:च करतात, बाजारात आलेला नवनवीन प्रकारच्या वस्तू बघून कुठल्या वस्तू आपल्याकडे खपेल याचा अंदाज त्यांना क्षणात येतो, त्यामुळे काय सामान घ्यायचा याची निवडही त्या करतात. वयाच्या अडतिसाव्या वर्षी कारखानदार झालेल्या सुलोचनाताईंना आपल्या व्यवसायातल्या खाचाखोचा अगदी व्यवस्थित ठाऊक आहेत. त्यामुळेच त्या इतका मोठा पल्ला गाठू शकल्या. आज सुमारे साडेतीन हजार सलून आणि दीड हजार पार्र्लसना ‘जय श्री गणेश मार्केटिंग’ माल पुरवते. इथून पुढे सलून आणि पार्लरविषयक सामानाचा तीन-चार मजली सुपर बाजार सुरू करायचं असं सुलोचनाताईंचं स्वप्न आहे आणि त्यांचं आजवरचं कर्तृत्व पाहता त्या लवकरच एखादे सुपरमार्केट उभारणार हे नक्की.

 

आयुष्याचा आणि करिअरचा मूलमंत्र
‘‘व्यवसायात प्रामाणिकपणा ठेवायचा, दिलेला शब्द राखायचा आणि आपल्या कामात सातत्य ठेवायचं तरच यश मिळतं.’’

उद्योगक्षेत्रात येणाऱ्यांसाठी सल्ला
‘‘अनेक उद्योग सुरू होतात पण ते त्याच्या पहिल्या वर्षांपर्यंतही तग धरत नाहीत. व्यवसायात अडीअडचणी येणारच त्यावर मात करा आणि त्यातून उभ्या राहा. तरच तिसऱ्या चौथ्या वर्षीपर्यंत तुमचा व्यवसाय म्हणजे रांगतं बाळ झालेलं असेल. तेव्हा ते यश मात्र नक्की साजरं करा.’’

सुलोचना भाकरे, सोलापूर
जय श्री गणेश मार्केटिंग, शॉप नं २,
वीर राणी कित्तूर चन्नम्मा शॉपिंग सेंटर,
पद्म टॉकीजसमोर, जोडभावी पेठ,
सोलापूर, ४१३ ००२
swapnalim@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2016 1:07 am

Web Title: woman entrepreneur sulochana bhakre
टॅग Chaturang
Next Stories
1 ‘खोटय़ा’ दागिन्यांची ‘खरी’ कहाणी
2 उद्योगवर्धिनी
Just Now!
X