पिसवांहून लहान विषाणूंच्या हल्ल्यापुढे हतबल होऊन एका राजिबडय़ा प्राणिवंशाच्या अस्तित्वासमोरच संकट उभे ठाकते, हा जीवघेणा प्रकार आणखी किती दिवस आपण केवळ पाहात राहणार आहोत? ..गुजरातच्या जुनागढ प्रांतातील गीर नावाचा एकच जेमतेम राखीव वनप्रदेश आता आशिया खंडात उरलेल्या वनराजाच्या हक्काच्या अधिवासासाठी उरलेला असताना, काही क्षुल्लक विषाणूंनी हल्ला करावा आणि १९ दिवसांत या गीरच्या जंगलातील २३ सिंहांनी प्राण सोडावेत ही घटना मन विदीर्ण करणारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गीरच्या जंगलातील सिंहांना आपल्या हक्काच्या अधिवासासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत या सिंहांची संख्या तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आणि वनराजासाठी राखून ठेवलेला साडेचौदाशे चौरस कि.मी.चा प्रदेश त्यांना पुरेनासा झाला, तेव्हा त्यांना मध्य प्रदेशात पर्यायी अधिवासाची सोय करावयास हवी अशी मागणी अनेक वन्यजीव अभ्यासकांनी केली होती. न्यायालयानेही तसा विचार बोलून दाखविला होता आणि त्यांच्या सुरक्षित जगण्याची हमी माणसाने घ्यावयास हवी असेही बजावले होते. कारण गीरचा सिंह ही केवळ गुजरातची वा भारताची नव्हे, तर उभ्या आशिया खंडाची शान ठरली आहे. असे असताना चिल्लर विषाणूंनी तब्बल २३ सिंहांचा सहजी घास घेऊन एका वन्यवंशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे करावे, हे तर निसर्गनियमालाही न शोभणारे कृत्य झाले. विकासाला वखवखलेल्या आणि निसर्गावर मात करण्याच्या वेडाने झपाटलेल्या माणसांच्या जगात आजकाल अनेक निसर्गनियम बेमूर्वतपणे पायदळी तुडविले जातात. त्याची किंमत मोजावी लागूनही माणूस नावाचा प्राणी निसर्गासमोर दंड थोपटून उभा असतो, पण निसर्गाशी नाते जडलेल्या मानवेतर सजीवांच्या जगाला अजूनही निसर्गाच्या नियमांची चाड आहे. या नियमांची चौकट ते तोडत नाहीत. सबळ प्राण्याने नाहक दुर्बळ प्राण्याच्या जिवावर उठू नये असा निसर्गाचा नियम असतो आणि कोणत्याही शिकवणी वर्गात न शिकता सारे मानवेतर प्राणी प्रामाणिकपणे तो नियम कसोशीने पाळत असतात. मग अचानक कुठल्या तरी पिसवासदृश कीटकांनी हल्ला करून जंगलांची शान असलेल्या या राजिबडय़ा प्राण्यांचा बळी घ्यावा, असे का झाले असावे? याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली, तर जबाबदारीचा ठपकाही माणसावरच येईल, याचे भय आहे.

गीरच्या जंगलातील सिंहांच्या पर्यायी अधिवासाच्या मागणीचे अर्जविनंत्यांचे फाइलबंद कागद गेल्या अनेक वर्षांपासून इकडून तिकडे टोलविले जात आहेत. याच पिसवांनी पसरविलेल्या विषाणूंमुळे पंधरा वर्षांपूर्वी टांझानियात तब्बल एक हजार सिंहांवर केवळ तीन आठवडय़ांत मृत्यूने घाला घातला होता. सावरण्यास जरादेखील संधी न देणारे हेच संकट गीरमध्ये केव्हाही दाखल होऊ शकते अशी भीती वन्यजीव अभ्यासकांनी पूर्वीच व्यक्त केलीही होती. अशा संकटापासून बचाव करण्यासाठी संकटाचे सावट असलेल्या परिसरापासून दूर पळणे हाच उपाय असल्याने गीरच्या सिंहांना प्रसंगी सुरक्षित जागी हलविता येईल अशी पर्यायी जागा मध्य प्रदेशात असावी अशी मागणी पूर्वीच झाली होती. पण पुढे काहीच झाले नाही. सिंह ही गुजरातची ओळख असली पाहिजे या मानवी अस्मितेच्या अट्टहासाची किंमत अखेर या वनराजांना भोगावी लागत असेल, तर त्या अस्मितेच्या पापाचे ओझेही माणसानेच शिरावर घ्यायला हवे..