09 April 2020

News Flash

इकडचे ५४, तिकडचे ४४..

इराणमध्ये सोमवारपासून करोनाचे ५४, तर दारूचे ४४ बळी गेले आहेत.

होळी हा एरवी कशाकशाचा सण, हे काही मुद्दाम सांगायला नको. तो आकडेमोडीचाही सण ठरावा, हे मात्र यंदाच घडले. होळीपासून आकडेमोड जी सुरू झाली, ती थांबेच ना. इकडे किती आणि तिकडे किती, यांचे किती आणि त्यांचे किती, आपले किती आणि परके किती, कायदेशीर किती आणि बेकायदा किती.. इटलीचे किती आणि मूळ भारतीय किती, प्रवास केलेले किती आणि घरीच राहिलेले किती.. किती किती प्रकारची ती आकडेमोड! होळी हा सण मूळचा भारतीय उपखंडातला. त्यामुळे भारतापुरते बोलायचे तर करोनाचे रुग्ण इटलीतून आलेले पाच आणि बाकीचे भारतीय, हे आता स्पष्ट झालेले आहे. अन्य प्रकारच्या आकडेमोडींपैकी काही आकडेमोड अद्याप पूर्ण व्हायची आहे. जयपूरचे किती आणि गुडगांवचे किती हे बुधवारी चित्रवाणी वाहिन्यांवरून सांगितले जात होते खरे, पण आकडय़ांनाही कशाकशाची बाधा होऊ शकते हेसुद्धा अगदी ऐन होळीच्या सणाला नव्हे, पण दोन दिवसांनी दिसून आले. त्याचा दोष होळीचा नव्हे, दोष राजकारणाचाच. होळी हा केवळ क्रोनोलॉजी समजावी म्हणून सांगितलेला तपशील. वाद राजकारणाचेच. त्या राजकारणाचा संस्कृतीशी काही संबंध जोडणे चुकीचेच.

इस्लामी संस्कृती टिकवणाऱ्या आणि शिया संस्कृतीनुसारच राजकारण चालवणाऱ्या इराण या देशातही अशीच आकडेमोड सुरू होती. इराण हा अगदी आतापर्यंत भारताचा मोठा तेलपुरवठादार आणि  मित्रदेश. ट्रम्प यांना इराण आवडत नाही आणि भारत-इराण मैत्रीदेखील ट्रम्प यांना रुचत नाही. म्हणून आता ‘मित्रदेश’ हा उल्लेख टाळलेला बरा, इतकेच. या इराणची चीनशी घट्ट मैत्रीच. इतकी की इराणची अण्वस्त्रेसुद्धा चिनी तंत्रज्ञान वापरणारी. ते तंत्रज्ञानही कुणा पाकिस्तानी अधिकाऱ्याने इराणला चोरून विकले होते म्हणतात. शस्त्रास्त्रे कुठल्याही देशाने कुठूनही मिळवावीत; पण एरवी इराणचे राजकारण कसे स्वच्छाग्रही.. सत्तेसाठी चढाओढ, फोडाफोडी, आमदारखरेदी वगैरेची एकही बातमी गेल्या ४० वर्षांत इराणमधून आलेली नाही. केवळ नेतेच नव्हे, लोकही कसे शुद्ध! दारूबंदी १०० टक्के, तीही गेल्या ४० वर्षांपासून. माणसे चुकतातच, तरीही वर्षांकाठी  फार तर साडेपाच टक्के इराणी दारू पितात, असा या देशाचा लौकिक. दारू न पिण्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, कौटुंबिक असे सारे फायदे इराणला साडेचौऱ्याण्णव टक्के तरी मिळतच असणार. याच इराणमध्ये करोना विषाणूने धुमाकूळ घालावा, हा निव्वळ दैवदुर्विलास म्हणायचा (तेच बरे, नाहीतर कारणे शोधावी लागतात). तो दुर्विलास इतका की, ‘हात धुण्याच्या द्रावणात अल्कोहोल असते- अल्कोहोलयुक्त द्रावणाने हात धुतल्यास करोना बाधेची शक्यता कमी होते- मग अल्कोहोल पिऊनच टाकले तर काय?’ असे अचाट त्रराशिक इराणमधल्या कुणीसे मांडले. कुठून-कुठून हातभट्टीची, गावठी, मिळेल ती दारू निव्र्यसनी लोकसुद्धा पिऊ लागले.. आणि यापैकी काही दारू विषारी असल्यामुळे, त्यापैकी ४४ जणांनी गेल्या दोन दिवसांत प्राण गमावले. होळी हा इराणमध्ये काही ‘पिण्याचा’ सण नव्हे. निव्वळ चांगले जगण्याच्या आशेनेच हे दारू-दिव्य काहींनी केले होते. त्यामुळे झाले असे की, इराणमध्ये सोमवारपासून करोनाचे ५४, तर दारूचे ४४ बळी गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:25 am

Web Title: 44 dead from drinking toxic alcohol in iran after coronavirus cure rumor zws 70
Next Stories
1 उरलो पर्यटनापुरते..
2 ‘मध्यवर्ती’ स्थळाचा महिमा..
3 मोनोच्या नाना कळा..
Just Now!
X