‘शालोम.. बहुत खुशी’.. ११ वर्षांच्या मोशे होल्झबर्गचे हे शब्द. आपल्या माता-पित्याचा दहशतवादी हल्ल्यात जेथे मृत्यू झाला, त्या मुंबईतील छाबड हाऊसला भेट देण्यासाठी तो आला होता. अवघ्या दोन वर्षांचा होता तो तेव्हा. वडील गॅव्हरिएल होल्झबर्ग हे राब्बी, ज्यू धर्मगुरू. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना आणि त्यांची पत्नी रिव्हका यांना मारले.. ते केवळ ज्यू आणि त्यातही इस्रायली नागरिक होते म्हणून. मोशे वाचला. त्याची भारतीय दाई सँड्रा सॅम्युअल हिने वाचवले त्याला. सारेच हृदयद्रावक. इतक्या वर्षांनी परवा तो त्याच ठिकाणी आला. आपले माता-पिता राहत होते ती खोली पाहिली त्याने. तेथेच तो रांगला होता, खेळला होता. पहिले बोबडे बोल त्याने तेथेच उच्चारले होते ती खोली, तेथील जुन्या खुणा हे पाहून काय वाटले असेल त्याला? तो मुंबई विमानतळावर आपल्या आजी-आजोबांसमवेत उतरला तेल अवीववरून येणाऱ्या विमानातून तेव्हा बाहेर जमलेल्या पत्रकारांनी त्याला विचारले, ‘कसे वाटतेय तुला?’ हा ठरलेला प्रश्न. कोणाचे काहीही होवो, कोणाला आनंद होवो की दु:ख, प्रश्न येतो तो हाच. ‘कसे वाटतेय तुम्हाला?’ मोशेला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘खूप आनंद आहे.’ खरोखरच त्याच्या मनात आनंद होता तेव्हा? त्याला हे काय चालले आहे हे समजत तरी होते का मुळात? तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, तर तुम्ही बाष्कळ आहात मित्रहो. तुम्हाला हे समजत नाही, की त्या अकरा वर्षांच्या बालकाच्या समजण्या-न समजण्याची, त्याच्या भावनांची पर्वा करण्याचे कोणालाच काही कारण नसते. ना त्या ‘अब आप को कैसे लग रहा है’ असे विचारणाऱ्या त्या बूमधारी माध्यमवीरांना, ना त्या भेटीचा ‘इव्हेन्ट’ रचणाऱ्यांना. आणि का असावी? अखेर मोशे हे त्यांनी रचलेल्या एका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय नाटकातील एक साधे पात्रच तर आहे. त्याची भूमिका ठरलेली आहे. तिचा हेतू एकच. भावनिक बंध तयार करणे. अशा नाटकांत माध्यमांनाही महत्त्वाची भूमिका दिलेली असते ती त्यासाठीच. जातीने उपस्थित होते विमानतळापासून ते छाबड हाऊसपर्यंत माध्यमप्रतिनिधी. क्षणाक्षणाच्या प्रतिमा टिपत होते ते. फार काय, इस्रायलमधून आलेले ओरेन रोझेनफेल्ड हे माहितीपट निर्मातेही हे सारे नाटय़ कॅमेराबद्ध करीत होते. या सगळ्यात त्या बालकाला फक्त वावरायचे तर होते. तो तसा वावरला. त्याच्या माता-पित्याच्या मृत्यूचा, त्या दहशतवादी घटनेचा अर्थही न कळता वावरला. आजी-आजोबा, काका अशी मंडळी सोबत होती त्याच्या. ती सांगत होती, ‘आम्ही प्रकाश आणि कृती याद्वारे दहशतवादाशी लढू.’ भावना योग्यच होती त्यांची. खरीखुरी. आणि ती व्यक्त करण्यासाठी तर मोशेचा वापर करण्यात आला होता. त्याला भावनांचा खेळ म्हणाल तुम्ही, तर तुम्ही दहशतवादाच्या बाजूचेच ठराल, मित्रहो. तेव्हा मोशे-भेटीच्या भावनिक इव्हेन्टीकरणाला अजिबात आक्षेप घ्यायचा नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भारतभेटीच्या आंतरराष्ट्रीय इव्हेन्टचा हा उपभाग भावनांनी चिंब होत पाहायचा नुसता.. मनात म्हणायचे बहुत खुशी..